२३८ ग्रा.पं.साठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:54 AM2017-10-16T00:54:28+5:302017-10-16T00:54:39+5:30

जिल्ह्यातील एकूण २३८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून, सोमवारी (दि. १६) मतदान होणार आहे. यावेळी पहिल्यांदाच सरपंचाची निवड थेट मतदारांमधून केली जाणार आहे.

Today's poll for 238 gms | २३८ ग्रा.पं.साठी आज मतदान

२३८ ग्रा.पं.साठी आज मतदान

Next
ठळक मुद्देहजारांवर मतदान यंत्रे : सर्वाधिक गावे सावनेर तालुक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील एकूण २३८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून, सोमवारी (दि. १६) मतदान होणार आहे. यावेळी पहिल्यांदाच सरपंचाची निवड थेट मतदारांमधून केली जाणार आहे. मतदान होत असलेली सर्वाधिक ३६ गावे सावनेर तालुक्यात असून, सर्वांत कमी चार गावे कुही तालुक्यातील आहे. त्याअनुषंगाने संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आली असून, ‘पोलिंग पार्टी’ संबंधित गावांमध्ये पोहचली आहे. शिवाय, त्या गावांमध्ये पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे.
निवडणुका होत असलेल्या एकूण २३८ ग्रामपंचायतींमध्ये नरखेड तालुक्यातील २२, काटोल २७, कळमेश्वर २४, सावनेर ३६, पारशिवनी २२, रामटेक ८, कामठी २७, मौदा २५, उमरेड ७, भिवापूर १०, कुही ४, हिंगणा ७ आणि नागपूर ग्रामीण तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये सोमवारी मतदान होणार असल्याने प्रचार तोफा थंडावल्या आहेत. उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेत आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान अधिकाºयांसह कर्मचाºयांना आधीच प्रशिक्षण देण्यात आले.
त्यांना संबंधित तहसील कार्यालयातून मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर त्यांना संबंधित गावांमध्ये पोहोचविण्याची व्यवस्थाही करण्यात आली. या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील २३ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधित गावात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यासाठी एकूण २००७ पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांची व राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) एक तुकडी तैनात केली आहे. हा पोलीस बंदोबस्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व अप्पर पोलीस अधीक्षक नरसिंग यांच्या नेतृत्वात सात पोलीस उपअधीक्षक (उपविभागीय पोलीस अधिकारी), २१ पोलीस निरीक्षक, ११६ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, १,२११ पोलीस कर्मचारी, ६५० गृहरक्षक दलाचे जवान (होमगार्डस्) आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या एका कंपनीचा समावेश आहे. जिल्ह्यात १३ ठिकाणी नाकाबंदीकरीता पोलीस केंद्र तयार करण्यात आले असून, संवेदनशील ठिकाणी सेक्टर पेट्रोलिंग व पेट्रोलिंग पथक नियुक्त केले आहे. सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांच्या नेतृत्वातील विशेष पथक गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती व त्यानंतर येणाºया विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या ग्रामपंचायत निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस यासह अन्य राजकीय पक्षाचे नेते या निवडणुकीवर बारीक नजर ठेवून आहे.
कामठी तालुक्यात ११७ मतदान केंद्र
कामठी तालुक्यात २७ ग्रामपंचायतींमध्ये मतदान होणार असून, २७ सरपंचपदांसाठी एकूण ९६ उमेदवार आणि २४७ ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी एकूण ६२१ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी ११७ मतदानकेंद्राची निर्मिती केली आहे. तालुक्यात ६१,२५६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यात ३१,८०१ पुरुष व २९,४५३ महिला मतदारांचा समावेश आहे. तालुक्यातील रनाळा, भिलगाव, आजनी, तरोडी येथील २२ मतदानकेंद्र संवेदनशील घोषित केले आहेत.
एक मतदार, चार मतदान
ग्रामपंचायतच्या प्रभागामध्ये (वॉर्ड) कमीतकमी दोन आणि अधिकाधिक तीन उमेदवार निवडून द्यावयाचे आहे. सोबतच सरपंचपदाच्या उमेदवारालाही यावेळी निवडून द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला तीन सदस्यांसोबत चौथे मत सरपंचपदाच्या उमेदवाराला द्यावे लागणार आहे. एक व्यक्ती एकाचवेळी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यपदाची निवडणूक लढू शकते. ती व्यक्ती सुदैवाने दोन्ही जागांवर विजयी झाल्यास तिला एका जागेचा राजीनामा द्यावा लागणारअसल्याने पोटनिवडणुकीची वेळ येऊ शकते.
नागलवाडीत सरपंच अविरोध
हिंगणा : तालुक्यात रायपूर, कवडस, नागलवाडी, वागधरा, खैरी (पन्नासे), उमरी (वाघ) आणि चिचोली (पठार) या सात ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. यापैकी नागलवाडी येथील सरपंच आणि सहा ग्रामपंचायत सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली. उर्वरित सहा सरपंचपदांसाठी १५ उमेदवार रिंगणात असून, ग्रामपंचायत सदस्यांच्या ६३ जागांसाठी एकूण १५९ उमेदवार भाग्य आजमावित आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये २७ मतदानकेंद्रांची निर्मिती केली असून, ७,८६७ पुरुष व ७,२३७ महिला असे एकूण १५,१०४ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
सावनेरात सरपंचपदाचे १२५ उमेदवार
सावनेर : तालुक्यातील सरपंचपदाच्या ३६ जागांसाठी एकूण १२५ आणि ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ८०५ उमेदवार रिंगणात आहे. या निवडणुकीत ४३,७८३ पुरुष आणि ३९,६६५ महिला असे एकूण ८३,४४८ मतदार मतदान करतील. मतदानासाठी १४९ मतदान केंद्र तयार केले असून, ८२५ कर्मचारी व ३०० पोलीस नियुक्त केले आहेत.

Web Title: Today's poll for 238 gms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.