नागपुरात धावतात तीन हजारावर ई-रिक्षा; नोंदणी मात्र ५०० चीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 10:31 AM2018-01-30T10:31:00+5:302018-01-30T10:31:41+5:30

नागपुरात सुमारे तीन हजारावर ई-रिक्षा धावत असताना केवळ ५०० वर ई-रिक्षांची नोंदणी झाली आहे.

Three thousand e-rickshaws run in Nagpur; Registration is only 500 | नागपुरात धावतात तीन हजारावर ई-रिक्षा; नोंदणी मात्र ५०० चीच

नागपुरात धावतात तीन हजारावर ई-रिक्षा; नोंदणी मात्र ५०० चीच

googlenewsNext
ठळक मुद्देअवैध ई-रिक्षांवर कधी होणार कारवाई?

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बॅटरीवर चालणाऱ्या ई-रिक्षाला मान्यता मिळून दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे. नागपुरात सुमारे तीन हजारावर ई-रिक्षा धावत असताना केवळ ५०० वर ई-रिक्षांची नोंदणी झाली आहे. विशेष म्हणजे, ई-रिक्षा (प्रवासी वाहन) व ई-कार्ट (मालवाहू वाहन) यांना मोटर वाहन कायदा व नियम लागू करून त्यांची एक महिन्यात नोंदणी करण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २४ जानेवारी रोजी राज्य शासनाला दिला. परंतु आठवडा होऊनही नोंदणीचा आकडा वाढला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहरातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी, पेट्रोल-डिझेलचा वापर टाळण्यासाठी आणि शहरवासीयांना स्वस्तात वाहतूक सुविधा मिळवून देण्यासाठी विजेवर चालणाऱ्या ई-रिक्षाला २०१६ मध्ये हिरवी झेंडी मिळाली. त्यापूर्वीही हजारावर ई-रिक्षा उपराजधानीत धावत होत्या. मंजुरी मिळाल्यानंतर यात दुपटीने वाढ झाली. सद्यस्थितीत आठवडाभरात दोन नव्या ई-रिक्षा रस्त्यावर येत आहे. दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. असे असताना ई-रिक्षाच्या नोंदणीविषयी उदासीनता दिसून येत आहे.

नोंदणीसाठी १९ अटी व शर्ती
मोटार वाहन कायद्यामधील तरतुदीनुसार ई-रिक्षासंदर्भातील परवाने देण्याचे निर्देश आहेत. परंतु परवाने मिळविण्यासाठी अर्जदाराकडे ई-रिक्षा चालविण्याचा वैध परवाना व सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याचे बॅज आणि लॅमिनेटेड स्वरूपात ओळखपत्र असण्याची पहिली अट आहे. याशिवाय पोलीस विभागात दखलपात्र गुन्ह्याची नोंद नसावी, शासन किंवा निमशासकीय सेवेत तो नसावा, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारच्या वाहनाचा परवाना नसावा, यासह प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या मार्गावरच ई-रिक्षा चालविण्यासह १९ अटी व शर्ती ठेवण्यात आल्या. या सर्वांचे पालन करीत ई-रिक्षाची नोंदणी करणे रिक्षाचालकांसाठी सोपे काम नाही. यामुळे नोंदणी होत नसल्याचे एका ई-रिक्षा चालकाने सांगितले.

अडीच हजारावर ई-रिक्षा अवैध
प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरमध्ये आतापर्यंत साधारण ५० तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूर येथे ४५० ई-रिक्षांची नोंदणी झाली आहे. यावरून सध्याच्या घडीला अडीच हजारावर ई-रिक्षा अवैधपणे रस्त्यावर धावत आहेत.

नोंदणी करा अन्यथा कारवाई
ई-रिक्षा नोंदणी करण्याचे आवाहन कार्यालयाने यापूर्वीही वारंवार केले आहे. परंतु नोंदणीला कमी प्रतिसाद पाहून मंगळवारपासून विशेष पथकाच्या मदतीने ई-रिक्षा तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. नोंदणी नसलेल्या ई-रिक्षांवर कारवाई करण्यात येईल.
-शरद जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर

Web Title: Three thousand e-rickshaws run in Nagpur; Registration is only 500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.