नवभारत साक्षरता कार्यक्रमावर शिक्षकांचा बहिष्कार
By गणेश हुड | Published: November 2, 2023 03:55 PM2023-11-02T15:55:30+5:302023-11-02T15:56:27+5:30
मध्यंतरी ११ ऑक्टोबर पासून तीन दिवस आयोजित केलेल्या प्रशिक्षणावर सुद्धा बहिष्कार घालण्यात आला होता
नागपूर : नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षर सर्वेक्षण प्रशिक्षण व इतर कामावर शिक्षक संघटनांनी आधिच बहिष्कार घोषित केला आहे. त्यानुसार नागपूर, रामटेक व कुही तालुक्यात आयोजित साक्षरता कार्यक्रमावर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी बहिष्कार घातला. परिणामी बुधवारी प्रशिक्षण वर्गात खाली खुर्च्या होत्या. यापुढेही बहिष्कार कायम राहील. अशी भुमिका शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेसोबत झालेल्या प्रतिनिधी सभेत मांडली.
नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत २०११ च्या जनगणनेवर १५ वर्षावरील निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याबाबतचा कार्यक्रम ऑगस्ट महिण्यापासून सुरू करण्यात आला होता. हे काम अशैक्षणिक स्वरूपाचे आहे असे सांगत शिक्षक संघटनांनी राज्यभरात या कार्यक्रमावर बहिष्कार घोषित केला होता, मध्यंतरी ११ ऑक्टोबर पासून तीन दिवस आयोजित केलेल्या प्रशिक्षणावर सुद्धा बहिष्कार घालण्यात आला होता.
या बहिष्कारासबंधाने नुकतीच ३१ ऑक्टोबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी शिक्षक संघटना प्रतिनिधींची सभा आयोजित केली होती, यासभेत नवभारत साक्षरता कार्यक्रमावरील बहिष्कार मागे घ्यावा, असे आवाहन शर्मा यांनी केले, परंतू शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी मात्र आपली बहिष्काराची भूमिका कायम असल्याचे सांगितले.
प्राथमिक शिक्षणाचा स्तर हा इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतचा असून हा वयोगट ६ ते १४ वर्ष वयोगटाचा आहे , शिवाय या सर्वेक्षणात बांधकाम मजूरांबाबतची संपुर्ण माहिती संकलीत करायची आहे. या कार्यक्रमांतर्गत करावयाचे सर्वेक्षण १५ वर्षावरील निरक्षरांचे असल्याने ती प्राथमिक शिक्षकांची जबाबदारी ठरू शकत नाही. शिवाय बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार राष्ट्रीय दशवार्षिक जनगणना, निवडणूक व आपत्ती व्यवस्थापन याव्यतिरीक्त कोणतीही अशैक्षणिक कामे शिक्षकांना देता येणार नाही. अशी स्पष्ट तरतुद असताना या कामाची शिक्षकांना सक्ती करणे ही बाब या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणारी आहे, त्यामुळे निरक्षर सर्वेक्षणाची सक्ती करण्यात येवू नये अशी भुमिका शिक्षक संघटनांनी मांडली.
बुधवारच्या सभेला लीलाधर ठाकरे, धनराज बोडे, शरद भांडारकर, राजकुमार वैद्य, रमेश गंधारे, लीलाधर सोनवाने, प्रमोद लोन्हारे, सुनिल पाटील, विरेंद्र वाघमारे, संजय धाडसे, शुद्धोधन सोनटक्के, बाळू वानखेडे, राम धोटे, गजेन्द्र कोल्हे, जुगलकिशोर बोरकर, मुरलीधर काळमेघ, श्रीहरी नागपुरे, भिमराव सालवनकर आदी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
नवभारत साक्षरता कार्यक्रम पुर्णता अशैक्षणिक स्वरूपाचा असताना त्यासंबंधीत कामाची सक्ती करणे सोबतच कारवाईची भाषा बोलणे ही बाब जाणीवपुर्वक प्रशासकीय दहशतसदृश्य वातावरणाची निर्मिती करणारी आहे , त्यामुळे शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होतअसल्याचे संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.