सुनील केदार यांना ठेवले ओपन बऱ्याकमध्ये; कारागृहाच्या भेसूर वातावरणात रात्र जागून काढली

By नरेश डोंगरे | Published: December 29, 2023 09:06 PM2023-12-29T21:06:17+5:302023-12-29T21:11:02+5:30

मसूरची डाळ, वांग्याची भाजी भात अन पोळीचे जेवण

Sunil Kedar spends first night in Open Baryak; Surchi dal, rice, eggplant vegetable meal | सुनील केदार यांना ठेवले ओपन बऱ्याकमध्ये; कारागृहाच्या भेसूर वातावरणात रात्र जागून काढली

सुनील केदार यांना ठेवले ओपन बऱ्याकमध्ये; कारागृहाच्या भेसूर वातावरणात रात्र जागून काढली

नागपूर : ऐशो आरामात जीवन जगण्याची सवय असलेले माजी मंत्री सुनील केदार यांनी न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर  कारागृहाच्या भेसूर आणि गडद वातावरणात गुरुवारची रात्र जागून काढली.

सायरन वाजविणाऱ्या पोलिसांच्या गाड्यांच्या मध्ये आलिशान गाडीत प्रवास, मागेपुढे कार्यकर्त्याचा लवाजमा, चमचमीत लज्जतदार जेवण आणि फाईव्ह स्टार रूम मधील मुक्कामाची सवय असलेल्या माजी मंत्री सुनील केदार यांना न्यायालयाने बँकेतील घोटाळा प्रकरणी दोषी ठरवून पाच वर्ष कारावास आणि१२ लाख ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावल्यानंतर केदार यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर गुरुवारी डॉक्टरांनी केदार फिजिकली फिट असल्याचे प्रमाणपत्र पोलीस प्रशासनाला दिले. त्यानंतर गुरुवारी रात्री पोलिसांनी केदार यांची रवानगी येथील मध्यवर्ती कारागृहात केली.

या पार्श्वभूमीवर, केदार गुरुवारी रात्री मध्यवर्ती कारागृहात पोहोचले. मुख्य प्रवेशद्वारातून आत मध्ये घेतल्यानंतर त्यांना कारागृहातील कपडे तसेच ब्लॅंकेट चादर आणि दरी देण्यात आली. केदार यांच्या प्रकरणावर सर्वत्र नजर ठेवून असल्यामुळे कारागृह प्रशासनाने कोणत्याही प्रकारची रिक्स घेण्याचे टाळले आहे. त्यांना आज सकाळपासून रीतसरपणे कारागृहात दिला जाणारा चहा नाश्ता त्यानंतर सकाळी ११ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता मसूरची डाळ, वांग्याची भाजी, भात आणि पोळ्या असे जेवण देण्यात आले.

केदार यांना व्हीआयपी किंवा स्पेशल ट्रीटमेंट दिल्या जात असल्याचा आरोप किंवा आरडाओरड होऊ नये म्हणून कारागृह प्रशासनाने त्यांना ओपन बऱ्याकमध्ये ठेवले आहे. मध्यवर्ती कारागृहातील ओपन बऱ्याक मध्ये रोज साडेचारशे ते पाचशे बंदिवान असतात. दिवसा ठीक मात्र रात्री त्यांना इकडून तिकडे व्हायलाही जागा नसते. अगदी बाथरूमलाही जायचे असले तर हात वर करून प्रत्येकाला अनुक्रमांकानुसार बऱ्याक च्या बाहेर काढले जाते.

रविवारीच मिळते आवडीचे पदार्थ

मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी एक कॅन्टीन असते. येथे चिकन, मटन,आलूबोंडापासून समोस्यापर्यंत सर्व खाद्यपदार्थ उपलब्ध असतात. मात्र, ही कॅन्टीन रविवारी एकच दिवस असते. त्यामुळे कैद्यांना असे काही आवडीचे पदार्थ खायचे असल्यास त्याच दिवशी त्याला ते पैसे घेऊन उपलब्ध करून दिले जातात. दरम्यान केदार यांनी आज सकाळपासून सायंकाळपर्यंत कारागृह प्रशासनाकडे कोणत्याच प्रकारची मागणी नोंदवलेली नाही.

या संबंधाने कारागृह प्रशासनाशी संपर्क केला असता त्यांनी कोणतीही माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. प्रकरण संवेदनशील असल्यामुळे या संबंधाने काही बोलणे योग्य होणार नाही, असे येथील अधिकारी आणि कर्मचारी म्हणाले.

Web Title: Sunil Kedar spends first night in Open Baryak; Surchi dal, rice, eggplant vegetable meal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.