Video: बीअर शॉपीच्या आतमध्ये ‘बार’; लोकमतच्या स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 07:03 AM2019-04-25T07:03:44+5:302019-04-25T07:05:57+5:30

गोधनी रोडवर सुरुय ‘ए- १’ गोरखधंदा; उत्पादन शुल्क विभाग, पोलिसांची डोळेझाक 

sting operation exposes illegal bar inside beer shop in nagpur | Video: बीअर शॉपीच्या आतमध्ये ‘बार’; लोकमतच्या स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक प्रकार उघड

Video: बीअर शॉपीच्या आतमध्ये ‘बार’; लोकमतच्या स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक प्रकार उघड

googlenewsNext

नागपूर : उत्पादन शुल्क विभागातर्फे शहराच्या विविध भागात वाईन शॉपच्या धर्तीवर बीअरच्या विक्रीसाठी ‘बीअर शॉपी’ सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. या शॉपीतून फक्त बीअरची विक्री करण्याची परवानगी आहे. ग्राहकाला तेथे बसून पिण्याची परवानगी नाही. असे असतानाही सर्व नियम धाब्यावर बसवून गोधनी रोडवरील झिंगाबाई टाकळी परिसरातील ‘ए-१ बीअर शॉपी’च्या आतमध्ये एकप्रकारे ‘बार’ सुरू करण्यात आला आहे. शॉपीचे दार उघडून ग्राहकांना आतमध्ये घेऊन बीअर पिण्याचा गोरखधंदा जोरात सुरू आहे. लोकमतने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये संबंधित बाब उघडकीस आली आहे. 

गोधनी रोडवरील ‘ए-१ बीअर शॉपीला उत्पादन शुल्क विभागाकडून फक्त ‘काऊंटर सेल’ करण्याची परवानगी आहे. मात्र, असे असतानाही येथे समोरचे दार उघडून ग्राहकांना आतमध्ये घेतले जाते व आतील भागात त्यांना बीअर पिण्याची मुभा दिली जात असल्याच्या तक्रारी ‘लोकमत’कडे आल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत ‘लोकमत’ने ‘स्टिंग ऑपरेशन’ केले असता तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले. ग्राहक बीअर खरेदीसाठी काऊंटरवर येतात. खरेदी केल्यावर  पिण्यासाठी आतमध्ये बसू देण्याची मागणी करतात. सुरुवातीला काऊंटरवरून नकार दिला जातो. मात्र, जरा आग्रह धरला व आपण नियमित ग्राहक असल्याचे सांगितले की खात्री पटवून गुपचूप समोरचे दार उघडले जाते व ग्राहकाला आतमध्ये घेतले जाते. या सेवेच्या बदल्यात जास्त रक्कमही आकारली जाते. या प्रकारामुळे संबंधित बीअर शॉपीला सध्या बारचे स्वरुप आले आहे. 

व्यावसायिकांना त्रास
- सुरुवातीला या बीअर शॉपीमधून नियमानुसार काऊंटर सेल व्हायचा. त्यामुळे ग्राहक येऊन खरेदी करून निघून जायचे. आता आतमध्ये बसून बीअर पिऊ लागले आहेत. याचा आजूबाजूच्या व्यावसायिकांना त्रास वाढला आहे. संबंधित व्यावसायिकांनीही या प्रकाराची तक्रार उत्पादन शुल्क विभागाकडे केली आहे.

टाकळीवासीयांचा बारला विरोध
- झिंगाबाई टाकळी, गोधनी रोड ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना मानणारी लोकवस्ती आहे. या परिसरात कुठलाही बार किंवा वाईन शॉप उघडून नये म्हणून नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केली आहे. सध्या सुरू असलेल्या ‘ए-१ बीअर शॉपी’पासून पुढे काही अंतरावरच तीन वर्षांपूर्वी एक बार सुरू होणार होता. तेव्हा परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले, आंदोलन केले व बेत हाणून पाडला. आंदोलनाला यश आले व बार सुरू होणार असलेल्या जागेवर कपड्याचे दुकान सुरू करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसानी नियमांचा आडोसा घेत संबंधित ‘ए-१ बीअर शॉपी’ सुरू झाली. आता या शॉपीचे रुपांतर बारमध्ये होऊ लागल्याचे निदर्शनास येताच या परिसरातील नागरिकांनी पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी चालविली आहे.

मानकापूर पोलिसांचे दुर्लक्ष 
- ‘ए-१ बीअर शॉपी’ मुख्य गोधनीरोडवर आहे. मानकापूर पोलीस ठाण्यात जाण्यासाठी याच रस्त्याने जावे लागते. दिवसभरात मानकापूर पोलिसांच्या गाड्या याच रस्त्याने ये-जा करतात. या शॉपीला आतमध्ये ‘बार’चे स्वरुप देण्यात आल्याची माहिती या परिसरातील व्यावसायिकांना व नागरिकांना आहे. मात्र, ही बाब गुप्तहेरांची यंत्रणा असलेल्या मानकापूर पोलिसांना कशी दिसत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या गोरखधंद्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे करण्याची तयारी नागरिकांनी चालविली आहे. 

उत्पादन शुल्क विभाग दखल घेईल का ?
- मद्यविक्री नियमबाह्य पद्धतीने होत असेल तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार उत्पादन शुल्क विभागाला आहेत. लोकमतच्या स्टिंग आॅपरेशनमध्ये ‘ए-१ बीअर शॉपी’ मध्ये सुरू असलेला गोरखधंदा उघडकीस आला आहे. आता उत्पादन शुल्क विभाग याची दखल घेऊन या प्रकाराला लगाम लावणार का, असा प्रश्न आहे.

Web Title: sting operation exposes illegal bar inside beer shop in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर