व्यापाऱ्यांचे २८ सप्टेंबरला भारत बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:37 PM2018-09-07T23:37:57+5:302018-09-07T23:40:47+5:30
वॉलमार्ट फ्लिपकार्ट डील आणि रिटेल व्यवसायात विदेशी गुंतवणुकीला विरोध करीत कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) २८ सप्टेंबरला भारत बंदचे आवाहन केले आहे. देशातील लहानमोठ्या सर्व बाजारपेठा या दिवशी बंद राहणार आहे. देशातील जवळपास सात कोटी व्यावसायिक बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वॉलमार्ट फ्लिपकार्ट डील आणि रिटेल व्यवसायात विदेशी गुंतवणुकीला विरोध करीत कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) २८ सप्टेंबरला भारत बंदचे आवाहन केले आहे. देशातील लहानमोठ्या सर्व बाजारपेठा या दिवशी बंद राहणार आहे. देशातील जवळपास सात कोटी व्यावसायिक बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
आंदोलनांतर्गत ‘कॅट’तर्फे दिल्लीच्या चांदनी चौकातून १५ सप्टेंबरपासून दिल्लीतून ९० दिवसीय डिजिटल रथयात्रा सुरू करणार आहे. रथयात्रा १६ डिसेंबरला दिल्लीत मोठ्या रॅलीत परावर्तित होणार आहे. या संदर्भात कॅटच्या व्यापाऱ्यांकडून संबंधित ज्वलंत विषयांवर एक व्यापारी चार्टर जारी करण्यात येणार आहे.
लहानमोठा व्यवसाय संपुष्टात येणार
‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, रथयात्रा देशाच्या २८ राज्यांच्या १२० प्रमुख शहरांतून जवळपास २२ हजार कि़मी.चा पल्ला गाठणार आहे. वॉलमार्ट फ्लिपकार्ट डील देशातील लहान व्यापाºयांसाठी अत्यंत घातक ठरणार आहे. कारण वॉलमार्ट फ्लिपकार्ट ई-कॉमर्स व्यासपीठाचा उपयोग करून देशातील रिटेल बाजारात जगभरातून खरेदी केलेल्या वस्तूंच्या विक्री करणार आहे. त्यामुळे व्यापारी आणि छोट्या उत्पादकांना फटका बसेल. एका वृत्तानुसार वॉलमार्टनंतर आता अॅमेझॉन आणि अलीबाबासुद्धा अशाच प्रकारच्या डीलसाठी प्रयत्नरत आहे. सरकारसुद्धा याकरिता अनुकूल आहे. त्यामुळे देशातील रिटेल बाजार केवळ ठराविक लोकांच्या हातात जाईल आणि भांडवलदारांचे वर्चस्व होईल. छोटे व्यापारी त्यांचा सामना करण्यास सक्षम नसतील.
ही भविष्यातील शक्यता ध्यानात ठेवून ‘कॅट’ने त्यांचा विरोध दर्शविण्यासाठी २८ सप्टेंबरला देशभरात व्यापार बंदचे आवाहन केले आहे. सरकारने या संदर्भात गांभीर्याने दखल देऊन वॉलमार्ट फ्लिपकार्टची डील रद्द करावी. ही डील सरकारच्या वर्ष-२०१६ च्या प्रेस नोट-३ चे उल्लंघन आहे.
आठ लाख केमिस्टांची दुकाने बंद राहणार
देशाच्या विविध राज्यातील बंदला समर्थन मिळत आहे. आॅल इंडिया केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत बंदला समर्थन दिले आहे. देशातील आठ लाख केमिस्ट या दिवशी दुकाने बंद ठेवणार आहे. तर दुसरीकडे आॅल इंडिया फेडरेशन आॅफ एफएमसीजी डिस्ट्रीब्युट्सनेसुद्धा भारत बंदचे समर्थन केले आहे.