नागपुरातील पालकांच्या खिशाला कात्री; स्कूल बस-व्हॅनची दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 09:54 AM2018-06-19T09:54:22+5:302018-06-19T09:54:30+5:30

आता स्कूल बस व व्हॅन चालकांनी आपल्या शुल्कात १० ते १५ टक्क्यांनी वाढ केल्याने उपराजधानीतील पालकांचे कंबरडे मोडले आहे.

Scissors of parents in Nagpur; School Bus-van Rates | नागपुरातील पालकांच्या खिशाला कात्री; स्कूल बस-व्हॅनची दरवाढ

नागपुरातील पालकांच्या खिशाला कात्री; स्कूल बस-व्हॅनची दरवाढ

Next
ठळक मुद्देदरवर्षी १० ते १५ टक्क्यांनी वाढ नियमात तरतूदच नसल्याने पालकांची लूटकोण बसविणार चाप ?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील सर्वच मोठ्या व खासगी शाळांमध्ये बाजारभावापेक्षा जास्त किमतीत शालेय साहित्यांपासून ते गणवेशच नाही तर अलीकडे शूजही विकत घेण्याची वेळ पालकांवर आली आहे. यात आता स्कूल बस व व्हॅन चालकांनी आपल्या शुल्कात १० ते १५ टक्क्यांनी वाढ केल्याने पालकांचे कंबरडे मोडले आहे. विशेष म्हणजे, स्कूल बस नियमात प्रति किलोमीटरमागे किती शुल्क आकारायचे हा नियमच नाही. यामुळे पालकांची लूट होत असल्याचे चित्र आहे.
स्कूल बस व स्कूल व्हॅन उन्हाळ्यासह दिवाळी व नाताळाच्या सुट्यांचेही भाडे वसूल करते. शाळेत कुठला कार्यक्रम राहिल्यास विद्यार्थ्यांना सोडण्याची जबाबदारी पालकांवर टाकली जाते. शहरात सुमारे १८०० स्कूल बसेस आणि ७,७३७ स्कूल व्हॅन आहेत. अनधिकृत स्कूल बस व स्कूल व्हॅनची संख्या हजाराच्या घरात आहे. उपराजधानीतील बहुसंख्य शाळेतील सुमारे ४० टक्के विद्यार्थी स्कूल बस, ३० टक्के विद्यार्थी स्कूल व्हॅन तर १० टक्के विद्यार्थी हे आॅटोरिक्षांमधून प्रवास करतात. एवढ्या मोठ्या संख्येत विद्यार्थी वाहतूक करीत असल्याने या वाहतुकीला संवेदनशील वाहतूक म्हणून नोंद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन विशिष्ट नियमावली तयारी करण्यात आली आहे. यात स्कूल बस व स्कूल व्हॅनच्या रंगापासून ते आसनक्षमता व वेगावरील मर्यादाही आखून दिली आहे. परंतु प्रति किलोमीटर विद्यार्थ्यांकडून किती शुल्क आकारावे याबाबत कुठेच काही नियम नाहीत. धक्कादायक म्हणजे, शिक्षण विभाग व आरटीओ विभागही हेच कारण पुढे करून हात वर करीत असल्याने अवाजवी शुल्क आकारणाऱ्यांच्या विरोधात कुठे तक्रार करावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

बसमध्ये २०० ते ४०० रुपयांची वाढ
सूत्राच्या माहितीनुसार अनेक बसेस शाळा चालवीत नाही. त्यांनी कंत्राट दिले आहे. यामुळे कंत्राटदाराला मोठा पैसा प्रति विद्यार्थ्यांमागे शाळेलाही द्यावा लागतो. शिवाय डिझेलचे वाढलेले दर, चालक व वाहकांचे वेतन आणि आता बसच्या आतमध्ये सीसीटीव्हीपासून ते जीपीएस यंत्रणा लावावी लागत असल्याने शुल्क वाढलेले आहे. साधारण एका विद्यार्थ्यामागे २०० ते ४०० रुपयांची वाढ आहे.

व्हॅनमध्ये १०० ते २०० रुपयांची वाढ
शहरात सात किलोमीटर अंतरासाठी स्कूल व्हॅनचालक गेल्या वर्षी दरमहा १३०० रुपये आकारत होते आता यात १०० ते २०० रुपयांनी वाढ केली आहे. सरसकट १० ते १५ टक्क्यांनी वाढ केली आहे. विशेषत: व्हॅनची क्षमता ११ विद्यार्थ्यांची असताना १५ ते २० विद्यार्थी बसवितात. 

स्कूल बस किंवा स्कूल व्हॅनचे दर निश्चित करण्यासंदर्भात कुठले नियम नाहीत. आरटीओच्या अधिकारातही येत नाही.
-अतुल आदे,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

दरावर आमचे नियंत्रण नाही
विद्यार्थ्यांकडून किती दर आकारावे हे स्कूल बस किंवा स्कूल व्हॅन नियमावलीमध्ये नाही. स्कूल बस किंवा व्हॅन आमच्या अधिकाराखाली येत नसल्यामुळे त्यावर आमचे नियंत्रण नाही.
-सतीश मेंढे, शिक्षण उपसंचालक

स्कूल बसच्या तुलनेत व्हॅनचे दर कमीच
दरवर्षी पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर वाढतात. शिवाय वाहनाची देखभाल व आरटीओचे शुल्क आहेच. यामुळे स्कूल व्हॅनच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होते. परंतु आमचे शुल्क स्कूल बसच्या तुलनेत फार कमी आहे.
-हेमंत गजभिये, सचिव, स्कूल व्हॅन चालक-मालक संघटना

Web Title: Scissors of parents in Nagpur; School Bus-van Rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.