सारो राजस्थान नागपूर में

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:27 AM2018-12-23T00:27:49+5:302018-12-23T00:30:45+5:30

राजस्थानमध्ये झालेल्या सत्ताबदलाचे वारे नुकतेच नागपूरकरांनी अनुभवले. राजकारणाचे हे वारे ओसरत असताना लगेच नागपूरकरांना मिनी राजस्थान अनुभवायला मिळत आहे. राजस्थानचे प्रसिद्ध मंदिर, तेथील पेहराव, संगीत, नृत्य, खाद्य, उंटाची सवारी असा एक रंगतदार माहौल दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात रंगला आहे. हा अनुभव घेतल्यावर नागपूरकरही म्हणताहेत सारो राजस्थान नागपूर में...

Saro Rajasthan in Nagpur | सारो राजस्थान नागपूर में

सारो राजस्थान नागपूर में

Next
ठळक मुद्देराजस्थानी महोत्सवात पारंपरिक लोकनृत्य, आभूषण, खाद्य संस्कृतीचे विशेष आकर्षण

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : राजस्थानमध्ये झालेल्या सत्ताबदलाचे वारे नुकतेच नागपूरकरांनी अनुभवले. राजकारणाचे हे वारे ओसरत असताना लगेच नागपूरकरांना मिनी राजस्थान अनुभवायला मिळत आहे. राजस्थानचे प्रसिद्ध मंदिर, तेथील पेहराव, संगीत, नृत्य, खाद्य, उंटाची सवारी असा एक रंगतदार माहौल दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात रंगला आहे. हा अनुभव घेतल्यावर नागपूरकरही म्हणताहेत सारो राजस्थान नागपूर में... 


श्री बीकानेरी माहेश्वरी पंचायत युवा समिती व मारवाडी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २६ डिसेंबर दरम्यान राजस्थानी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी द.म.क्षे.सा. केंद्र आकर्षकरीत्या सजविण्यात आले आहे. मसकवादनाची गूंज अख्ख्या महोत्सवात पसरली आहे. प्रवेशद्वारावर राजस्थानी पेहराव केलेल्या मंडळींकडून मोठ्या अदबीने स्वागत होत आहे. राजस्थानच्या लोकांचे श्रद्धेय असलेले सालासर, खाटुमल, राणीसती, रामदेवबाबा यांच्या मंदिराची प्रतिकृती सोबतच महाराष्ट्रातील विठ्ठल रुक्मिणी व व्यंकटेश बालाजी मंदिराची प्रतिकृती येथे उभारली आहे. त्याचबरोबर राजस्थानचे हॅण्डीक्राफ्ट, टेराकोटाचे आकर्षक साहित्य, राजस्थानी बंदेज, राजस्थानी जुती, राजस्थानी डिजाईनमध्ये इंटेरिअर डेकोरेशन, मयुरसिंग राठोड यांची स्टोन व क्लॉथ पेंटींग, गिरीराज प्रसाद वैष्णव यांनी देवांसाठी तयार केलेले आकर्षक पोशख आकर्षण ठरत आहे. त्याचबरोबर महिलांकडून राजस्थानी ज्वेलरीची मागणी होत आहे. चौकर, चुडला, बोर, पैंजार, गोखरू राजस्थानमध्ये प्रचलित या ज्वेलरीला महिलांकडून पसंती मिळत आहे. उंटाची सवारी लहानग्यांसाठी चांगलीच आनंददायी ठरते आहे. या सर्वात विशेष म्हणजे राजस्थानी खाद्य संस्कृतीचे वेगळेपण अनुभवण्यासाठी नागपूरकरांच्या उड्या पडत आहे. दालवाटी चुरमा, प्याज कचौरी, रबडी, मालपोहा, कुल्लड दूध, गट्याची भाजी, सांगरी भाजी हे सर्व येथे आहे.
 कठपुतली नाट्यसोबत राजस्थानी घुमर व लोकसंगीत

राजस्थानी संस्कृतीत कठपुतली नाट्य नेहमीच खास राहिले आहे. महोत्सवात कठपुतली नृत्याचा आनंद लुटता येत आहे. अख्ख्या बॉलिवूडला वेड लावलेल्या घुमर नृत्याची प्रस्तुती येथे होत आहे. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे १०५ कलावंतांकडून येथे कालबेलिया, मयुर, चरी, चकरी, तेराताल, चंग या लोकनृत्याचे आकर्षक सादरीकरण येथे करण्यात येत आहे. भपंग व मसक वादनाचा आनंद येथे लुटता येत आहे. 

 नागपूरकरांसाठी हा एक अनोखा महोत्सव आहे. संपूर्ण राजस्थानचे मिनी मॉडल येथे मांडले आहे. हा महोत्सव नागपूरकरांसाठी एक आगळावेगळा अनुभव ठरतो आहे.
प्रतीक बागडी, प्रकल्प संयोजक, राजस्थानी महोत्सव

Web Title: Saro Rajasthan in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.