नागपूर जिल्ह्याच्या सावंगी येथील संजय तभाने यांनी संत्रा उत्पादनातून साधली आर्थिक उन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 01:08 PM2017-12-11T13:08:10+5:302017-12-11T13:10:27+5:30

शेती व्यवसाय नफ्याचा की तोट्याचा हा विचार न करता काही शेतकरी जिद्दीने शेती कसतात व आपल्या मेहनतीने शेती व्यवसायालाही प्रतिष्ठा मिळवून देतात. असाच संत्रा उत्पादनातून उन्नती साधण्याचा यशस्वी प्रयत्न संजय तभाने यांनी केला आहे.

Sanjay Tabhane from Sawangi in Nagpur district established economic advancement from orange production | नागपूर जिल्ह्याच्या सावंगी येथील संजय तभाने यांनी संत्रा उत्पादनातून साधली आर्थिक उन्नती

नागपूर जिल्ह्याच्या सावंगी येथील संजय तभाने यांनी संत्रा उत्पादनातून साधली आर्थिक उन्नती

Next
ठळक मुद्देस्वखर्चाने २४४० झाडांची लागवड

विजय नागपुरे
आॅनलाईन लोकमत
नागपूर : शेती व्यवसाय नफ्याचा की तोट्याचा हा विचार न करता काही शेतकरी जिद्दीने शेती कसतात व आपल्या मेहनतीने शेती व्यवसायालाही प्रतिष्ठा मिळवून देतात. असाच संत्रा उत्पादनातून उन्नती साधण्याचा यशस्वी प्रयत्न संजय तभाने यांनी केला आहे. त्यांचा हा प्रयत्न परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
कळमेश्वर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सावंगी (तोमर) येथील तरुण शेतकरी संजय भाऊराव तभाने यांनी वडिलांचे निधन झाल्यानंतर वयाच्या १८ व्या वर्षी घरादाराची जबाबदारी सांभाळण्यासाठी बारावीनंतर शिक्षण न घेता वडिलोपार्जित शेती व्यवसायात लक्ष घातले. त्यांच्याकडे एकूण २० एकर शेती आहे. जेव्हा शेतीचा व्यवहार संजय यांनी हाती घेतला तेव्हा त्यांच्या शेतात २०० संत्रा झाडे होती. आज ३० वर्षांच्या काळात त्यांनी शासकीय योजनेचा लाभ न घेता २० एकरात २४४० संत्रा झाडांची लागवड केली आहे.
त्यांच्याकडे एक वर्ष वयाची ६००, ४ वर्षे वयाची ९४० तर १८ वर्ष वयाची ९०० संत्रा झाडे आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची कमतरता भासू लागते. या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करणे सुरू केले. तर शेतजमिनीचा पोत लक्षात घेता नागपुरी संत्रा कलमांची निवड केली.
मृग बहाराचे उत्पादन न घेता दरवर्षी अंबिया बहाराचे संत्रा उत्पादन घेतल्या जाते. अंबिया बहाराचे उत्पादन घेतले तर झाडांची स्थिती चांगली राहाते, असे संजय तभाने यांचा अनुभव सांगतो.

वर्षाकाठी आठ लाखांचा खर्च
संपूर्ण संत्रा बागेला दरवर्षी ४० ते ५० ट्रक कुजलेले शेणखत, ३० पोती रासायनिक खत सोबतच ५० ते ५५ हजारांचे जैविक खत टाकण्यात येते. तर कीड नियंत्रणासाठी वर्षाला पाच फवारण्या करण्यात येतात. मशागत, निंदण, सालदार व इतर मजुरीचा खर्च पकडता वर्षाकाठी जवळपास आठ लाखांचा खर्च होत असून यावर्षी ९०० संत्रा झाडांच्या बागेतून ४० टन संत्रा विकला व चार वर्षीय ९४० संत्रा झाडावर ७० ते ८० टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. या बागेतून उत्पादन घेण्याचे पहिलेच वर्ष असून संत्र्याच्या वजनाने फांद्या तुटू नये म्हणून बालाघाट येथून २ लाख १५ हजारांचे ५००० बांबू खरेदी केले. तसेच संत्रा तोडून विकण्यापेक्षा जागेवरूनच संत्रा व्यापाºयाला विकणे पसंत करीत असल्याचे तभाने यांनी सांगितले.

ठिबक सिंचन उत्तम पर्याय
संत्रा बाग टिकविण्यासाठी ठिबक सिंचन महत्त्वाचे असून दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत आहे. तरी कमी पाण्यात नियोजन करून संत्रा उत्पादन घेणे सोईस्कर होईल, याकरिता शासनाने ठिबक सिंचन संचावर ७५ टक्के अनुदान द्यावे. तसेच संत्रा उत्पादनात वाढ झाली तर संत्र्याच्या भावात मंदी येते व यावेळी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. यासाठी संत्रा प्रक्रिया प्रकल्प शासनाने उभारावे.
- संजय तभाने,
शेतकरी, सावंगी.

 

Web Title: Sanjay Tabhane from Sawangi in Nagpur district established economic advancement from orange production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.