फुफ्फुसाचा दुर्मिळ आजार; ११ वर्षाच्या मुलावर विना शस्त्रक्रियेने उपचार

By सुमेध वाघमार | Published: April 4, 2024 09:26 PM2024-04-04T21:26:05+5:302024-04-04T21:27:00+5:30

दोन वर्षांपासून श्वसनाचा त्रास, शरीरही निळे पडत होते

Rare lung disease; Non-surgical treatment of an 11-year-old boy at Nagpur | फुफ्फुसाचा दुर्मिळ आजार; ११ वर्षाच्या मुलावर विना शस्त्रक्रियेने उपचार

फुफ्फुसाचा दुर्मिळ आजार; ११ वर्षाच्या मुलावर विना शस्त्रक्रियेने उपचार

नागपूर : दोन वर्षांपासून ११ वर्षाच्या मुलाला श्वसनाचा त्रास होता. वारंवार शरीरही निळे पडत होते. परंतु आजाराचे निदान होत नव्हते. उपचारासाठी तो अमरावतीहून नागपुरात आला. येथील डॉक्टरांनी त्याचा आजाराचा अभ्यास केला. फुफ्फुसाचा अत्यंत दुर्मिळ आजार असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी आपले अनुभव व कौशल्याच्या बळावर विना शस्त्रक्रिया उपचार करून मुलाला नवे जीवन दिले.

अमरावती येथील चांदूर रेल्वे येथील ११ वर्षाचा मुलगा अजय (नाव बदलेले आहे) ‘पल्मोनरी आर्टिरिओव्हेनस फिस्टुला’ या  दुर्मिळ आजाराने पिडीत होता. ‘आर्टिरिओव्हेनस फिस्टुला’ म्हणजे धमनी आणि शिरा यांच्यातील एक असामान्य जोडणी होती. शुद्ध व अशुद्ध रक्त मिसळत होते. यामुळे मागील दोन वर्षापासून अजयचे वजन फारच मंद गतीने वाढत होते. श्वास घ्यायला त्रास होत होता. शरीरही वारंवार निळे पडत होते. त्याच्यावर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार झाले. परंतु आजाराच निदानच होत नव्हते.

-हृदय निकामी होण्याचा धोका होता
हृद्य रोग तज्ज्ञ डॉ. पंकज हरकुट म्हणाले, शरीर निळे पडणे हे हृद्यात शुद्ध व अशुद्ध रक्त मिसळण्याची लक्षणे आहेत. परंतु विविध हॉस्पिटलमध्ये त्याचा उपचार सुरू असताना काढलेल्या ‘इको’मध्ये हृद्याची समस्या दिसून येत नव्हती. त्यामुळे वयाच्या ११व्या वर्षीही आजाराचे निदान झाले नव्हते. आमच्याकडे रुग्ण आल्यावर त्याचा लक्षणांचा अभ्यास केला. अखेर सिटी अँजिओग्राफीमध्ये त्याला ‘पल्मोनरी आर्टिरिओव्हेनस फिस्टुला’ हा दुर्मिळ आजार असल्याचे निदान झाले.  डाव्या फुफ्फुसाच्या धमनीमधून उद्भवलेल्या आणि हृदयाशी विसंगतपणे जोडलेल्या असामान्य वाहिन्यामुळे शुद्ध व अशुद्ध रक्त फुफ्फुसात मिसळत होते. फुफ्फुसाच्या धमन्यांमधून अशुद्ध रक्त थेट हृदयाकडे जाते होते. ज्यामुळे रक्तातील आॅक्सिजनची पातळी कमी व्हायची. यामुळे हृदय निकामी होण्याचा धोका होता. 

-उपचार आव्हानात्मक होते
या रुग्णावरील उपचार आव्हानात्मक होते, कारण तेथे अनेक आणि मोठे फिस्टुले होते ज्यांना बंद करणे आवश्यक होते. यावर शस्त्रक्रिया केल्यास मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन मृत्यूची भिती होती. यामुळे रुग्णाच्या मांडीच्या वाहिन्यामधून कॅथेटर टाकून तीन डिव्हाईसच्यामदतीने फिस्टुला बंद करण्याचा निर्णय घेतला. यात डॉक्टरांचे अनुभव व कौशल्यामुळे ही उपचार पद्धती यशस्वी झाली, असेही डॉ. हरकुट म्हणाले. या प्रक्रियेत डॉ.मनीष चोखंद्रे, डॉ. योगेश कोळमकर, डॉ. पंकज हरकुट, डॉ. गौरव छाजेड यांचा सहभाग होता. शहरातील हे पहिले प्रकरण आहे. ज्यामध्ये २० किलोच्या मुलामध्ये उपकरणांचा वापर करून तीन मोठी विकृती बंद करण्यात यश आले. सध्या अजयची प्रकृती सुधारत असून त्याला नुकतेच रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याची माहिती डॉ. चोखंद्रे यांनी दिली.

Web Title: Rare lung disease; Non-surgical treatment of an 11-year-old boy at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.