वेगाने घेतला दोघांचा बळी

By admin | Published: July 15, 2017 02:29 AM2017-07-15T02:29:53+5:302017-07-15T02:29:53+5:30

वेगाशी स्पर्धा करीत रस्त्याने धावणारी कार विजेच्या खांबाला धडकून बाजूच्या झाडावर आदळली. त्यामुळे

Rapidly taken victim's victim | वेगाने घेतला दोघांचा बळी

वेगाने घेतला दोघांचा बळी

Next

अनियंत्रित कार झाडावर आदळली मेट्रो रेल्वेच्या कार्यालयाजवळ अपघात एकाची प्रकृती चिंताजनक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
वेगाशी स्पर्धा करीत रस्त्याने धावणारी कार विजेच्या खांबाला धडकून बाजूच्या झाडावर आदळली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोन तरुण ठार झाले तर, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेट्रो रेल्वे कार्यालयाजवळ गुरुवारी मध्यरात्री हा भीषण अपघात घडला. अक्षय मल्हारी मस्के (वय २०) असे जखमीचे नाव असून, अभिजित ऊर्फ जोजो कच्चू पायलू (वय १८) आणि प्रणव महेश नायडू (वय १९) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही जिवलग मित्र होते. नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री ११.४० च्या सुमारास ते अंबाझरी, सिव्हिल लाईन भागात कारने (एमएच २०/ बीझेड ४७४७) फिरत होते. कार अक्षय मस्के चालवित होता. सिव्हिल लाईन्सकडे जात असताना कार चालविताना त्यांच्यात गंमतजंमत सुरू होती. कारचा वेग खूपच जास्त होता. मेट्रो रेल्वे कार्यालयाजवळचा भाग चढ-उताराचा असून तेथे धोकादायक पद्धतीचे वळणही आहे. कारचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्यामुळे अपघातस्थळी कार अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबाला धडक देऊन ती समोरच्या झाडावर आदळली. त्यामुळे कारच्या समोरच्या भागाची पुरती मोडतोड झाली. धडक जोरदार असल्यामुळे त्याचा मोठा आवाज झाला. बाजूलाच सदर पोलीस ठाणे असल्यामुळे बाजूची मंडळी धावून आली. त्या मार्गाने जाणाऱ्यांनी लगेच अपघाताची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले. वायरलेसवरून माहिती कळताच नाईट राऊंडवर असलेले पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी हेसुद्धा घटनास्थळी दाखल झाले. कारच्या समोरचा भाग पुरता मोडल्याने आतमधील अक्षय, अभिजित तसेच प्रणव तिघेही त्यात फसले. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्यांना बाहेर काढले. तिघांचीही प्रकृती चिंताजनक होती. त्यांना रुणालयात नेले असता डॉक्टरांनी अभिजित आणि प्रणवला मृत घोषित केले. दरम्यान, त्यांच्या मोबाईलवर फोन आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना या अपघाताची माहिती दिली.
अक्षय मस्के याच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे. विशेष म्हणजे, या अपघातात तिघांचाही मृत्यू झाल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती. सदर पोलीस ठाण्यात मंडळीदेखिल या वृत्ताला दुजोरा देत होते. रात्री या संबंधाने बोलताना सदरचे ठाणेदार सुनील बोंडे यांनी अक्षयची प्रकृती गंभीर असल्याचे स्पष्ट केले.

दोघांचे बळी घेणाऱ्या या अपघाताला कारचालकाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे पुढे आले आहे. कारचा वेग ताशी १०० किलोमीटरपेक्षाही जास्त असावा. कारण अपघात झाल्यानंतर वेगाचे संकेत देणाऱ्या कारमधील मीटरचा काटा १०० वर अडकून पडला होता. अक्षय मस्के कार चालवित होता. त्यामुळे सदर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचे वडील प्राध्यापक असून त्याच्या परिवारात बारावी पास झालेली बहीण तसेच आईवडील आहेत. तो अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी शनिवारी पुण्याला जाण्याच्या तयारीत होता. विशेष म्हणजे, अपघातात ठार झालेल्यांपैकी प्रणव हा कळमेश्वरच्या एका कंपनीत अ‍ॅप्रेंटिसशिप करीत होता. त्याचे वडील तेथेच मोठ्या पदावर कार्यरत असून आई गायत्री शिक्षिका आहेत. तो नियमित कंपनीत कामाला जात नव्हता. त्यामुळे त्याचे आईवडील त्याला नेहमीच टोकत होते. गुरुवारी रात्रीही त्याला घराबाहेर पडण्यासाठी आईने विरोध केला होता. मात्र, लगेच येतो, असे म्हणून तो घरून निघून गेला. अभिजितचे वडील दुबई येथे नोकरी करतात. तो बारावी शिकलेला होता. त्याला एक १० वर्षीय आर्यन नामक भाऊ आणि आई मीना आहेत. विशेष म्हणजे, प्रा. मल्हारी मस्के हे गेल्या वर्षी राज्यभर चर्चेत आले होते. कुख्यात गुंड सुमित ठाकूर याच्या टोळीतील गुंडांनी मस्केच्या घराला आणि कारला आग लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना धमक्याही दिल्या होत्या. त्यामुळे ते नागपूर सोडून पुण्याला गेले, अशी चर्चा होती. तेव्हा हे प्रकरण राज्यभर गाजले होते.

Web Title: Rapidly taken victim's victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.