उपराजधानीत ‘हिवसाळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 09:34 AM2018-12-18T09:34:36+5:302018-12-18T09:36:54+5:30

उपराजधानीतील हिवाळा म्हणजे कसा...हवीहवीशी थंडी अन् जोडीला ऊबदार ‘स्वेटर्स’ची मजा. मात्र हिवाळ्यात अंगात ‘स्वेटर’ घालायचे की ‘रेनकोट’, असा प्रश्न निर्माण झाला तर... !

rain and cold in Nagpur | उपराजधानीत ‘हिवसाळा’

उपराजधानीत ‘हिवसाळा’

Next
ठळक मुद्दे रेनकोट घालावा की स्वेटर? थंडी, पावसामुळे गारठले नागपूरकर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील हिवाळा म्हणजे कसा...हवीहवीशी थंडी अन् जोडीला ऊबदार ‘स्वेटर्स’ची मजा. मात्र हिवाळ्यात अंगात ‘स्वेटर’ घालायचे की ‘रेनकोट’, असा प्रश्न निर्माण झाला तर... ! एरवी ऊन-पावसाचा खेळ नेहमीच अनुभवणाऱ्या नागपूरकरांनी सोमवारी थंडी व पावसाची गारठविणारी युती अनुभवली. घराबाहेर निघताना ‘रेनकोट’ घालावा की ‘स्वेटर’, असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला होता. घसरलेला पारा, पाऊस आणि बोचरा वारा यामुळे शहरात ‘हिवसाळा’ हा नवाच ऋतू दिसून आला.

‘हिल स्टेशन’चा अनुभव
साधारणत: डिसेंबर महिन्यात उपराजधानीत पाऊस पडत नाही. मात्र सोमवारी पावसामुळे ‘हिल स्टेशन’चा अनुभव येत होता. विशेषत: फुटाळा तलाव परिसर, सेमिनरी हिल्स, सिव्हिल लाईन्ससारख्या भागांमध्ये तर वातावरणत तसेच झाले होते. सायंकाळनंतरच शहरातील विविध भागात शेकोट्या पेटविण्यास सुरुवात झाली. सोमवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते, शिवाय वारेदेखील वाहत होते. त्यामुळे हुडहुडी भरल्याचे जाणवून आले. दुपारी १च्या सुमारास शहरातील काही भागात तुरळक पाऊस झाला. त्यानंतर सायंकाळीदेखील पावसाच्या सरी कोसळल्या. वारे, पाऊस यांच्यामुळे दिवसभरात पारा खालावला. मात्र रात्री किमान तापमान ५.१ अंश सेल्सिअसने वाढल्याचे दिसून आले तर कमाल तापमान २६.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. हवामान खात्यानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र व फेथई चक्रीवादळामुळे मध्य भारतातील वातावरणात बदल झाला आहे. डिसेंबर असूनदेखील पारा हवा तसा खालावला नव्हता. मात्र वातावरणातील बदलाने गारठा भरला. या चक्रीवादळामुळे विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सायंकाळच्या सुमारास आर्द्रतेची पातळी ८० टक्क्यांपर्यंत पोहोचली. पुढील दोन दिवस अशीच स्थिती राहू शकते, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

रायपूरची पाच विमाने नागपूरकडे ‘डायव्हर्ट
सोमवारी छत्तीसगडमध्ये काँग्रेसने बहुमताने सरकार स्थापन केल्यामुळे भूपेश बघेल हे मुख्यमंत्रिपदाची शपथ ग्रहण करणार होते. पण हा सोहळा खराब हवामानामुळे काहीसा गोत्यात आल्यासारखा दिसला. कारण सोमवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विविध शहरातून रायपूरकडे जाणारी पाच विमाने लॅण्ड झाली. रायपूरमध्ये पसरलेल्या धुक्यांमुळे व्हिजिबिलिटी (दृश्यता) कमी झाल्यामुळे या विमानांना नागपूरकडे डायव्हर्ट करण्यात आले होते. सर्वच विमाने सोमवारी सकाळी ८.३० ते १० च्या दरम्यान विमानतळावर उतरली. यात इंडिगो एअरलाईन्सचे दिल्ली-रायपूर ६ ई २७५७ हे विमान ८.३० वाजता लॅण्ड झाले. हैदराबाद-रायपूर ६ ई ३८४ हे विमान ९ वाजता उतरले. जेट एअरवेजचे दिल्ली -रायपूर हे विमान ९ डब्ल्यू ७४६ सकाळी ८.३० वाजता नागपूर विमानतळावर उतरले. त्याचबरोबर जेटलाईटचे मुंबई-रायपूर एस २-३७७ हे तीन तास उशिरा उडल्यानंतरही सकाळी ९ वाजता नागपुरात उतरले. एअर इंडियाचे दिल्ली-रायपूर एआय ४६९ हे विमान सुद्धा नागपूर विमानतळावर उतरविण्यात आले. विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात येत आहे की, काही विमाने दिल्ली विमानतळावरूनच उडण्यास उशीर झाला. विशेष म्हणजे छत्तीसगडला भूपेश बघेल यांचा सोमवारी शपथविधी समारंभ होता. या समारंभासाठी दिल्ली येथून कॉँग्रेसचे दिग्गज नेतेगण पोहचणार असल्याचा अंदाज होता. पण नागपूर विमानतळावर डायव्हर्ट होऊन उतरलेल्या विमानातून कुणीही प्रवासी उतरले नाही. ही विमाने अर्धा तास थांबून राहिली. सकाळी १० नंतर काही मिनिटांच्या अंतरामध्ये नागपुरातून रायपूरकडे रवाना झाली.

१००० पेक्षा कमी होती व्हिजिबिलिटी
विमानतळ प्राधिकरणाच्या सूत्रानुसार सोमवारी सकाळी रायपूर विमानतळावरील हवामान खराब असल्याने व्हिजिबिलिटी १००० मीटरपेक्षा कमी झाली होती. त्यामुळे रायपूर विमानतळावर विमानांना उतरण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे विमानातील वैमानिकांनी जवळच्या नागपूर विमानतळावर लॅण्डींग करण्यास परवानगी मागितली होती.

११ रेल्वेगाड्याही लेट
सोमवारी ११ रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. प्रवाशांना उशिराने येणाºया रेल्वेगाड्यांची वाट पाहत रेल्वेस्थानकावर ताटकळत बसून राहण्याची पाळी आली. यामुळे वेटिंग रुम फुल्ल झाल्याचे दिसले. टाटानगरजवळ रेल्वे रुळाच्या देखभालीचे काम सुरू असल्यामुळे आणि धुक्यामुळे नागपुरातून जाणाºया ११ रेल्वेगाड्या सोमवारी आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत होत्या. दरम्यान उशिराने येणाºया रेल्वेगाड्यात हावडा-पुणे आझादहिंद, रक्सोल-हैदराबाद, हजरत निजामुद्दीन-विशाखापट्टणम दक्षिण एक्स्प्रेस, हावडा-अहमदाबाद, कटरा-चेन्नई अंदमान एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन-भुसावळ गोंडवाना, टाटानगर-लोकमान्य टिळक टर्मिनस लेट होती.

 

 

 

Web Title: rain and cold in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस