वसुलीभाई बनून आलेला पीएसआय लोखंडे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:55 AM2018-07-10T00:55:09+5:302018-07-10T00:56:46+5:30

क्रिकेट सट्ट्याची वसुली करण्यासाठी चंद्रपुरातील बुकींसोबत नागपुरात आलेला पीएसआय दिलीप मारुती लोखंडे (वय ३२) याला नागपुरात अटक झाल्याचे कळताच चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी निलंबित केले. दरम्यान, प्रतापनगर पोलिसांनी त्याला आणि त्याचे साथीदार रोहित लक्ष्मीचंद गुल्लानी (वय २३, फवारा चौक, मूल, जि. चंद्रपूर) तसेच रितिक हिम्मत मेश्राम (वय २३, रा. म्हारोडा, ता. मूल) यांना आज न्यायालयात हजर करून, त्यांचा ११ जुलैपर्यंत पीसीआर मिळवला.

PSI Lokhande suspended , who became Vasulibhai | वसुलीभाई बनून आलेला पीएसआय लोखंडे निलंबित

वसुलीभाई बनून आलेला पीएसआय लोखंडे निलंबित

googlenewsNext
ठळक मुद्दे११ जुलैपर्यंत पीसीआर : काडतूस, रिव्हॉल्व्हर जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्रिकेट सट्ट्याची वसुली करण्यासाठी चंद्रपुरातील बुकींसोबत नागपुरात आलेला पीएसआय दिलीप मारुती लोखंडे (वय ३२) याला नागपुरात अटक झाल्याचे कळताच चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी निलंबित केले. दरम्यान, प्रतापनगर पोलिसांनी त्याला आणि त्याचे साथीदार रोहित लक्ष्मीचंद गुल्लानी (वय २३, फवारा चौक, मूल, जि. चंद्रपूर) तसेच रितिक हिम्मत मेश्राम (वय २३, रा. म्हारोडा, ता. मूल) यांना आज न्यायालयात हजर करून, त्यांचा ११ जुलैपर्यंत पीसीआर मिळवला.
खामल्यातील सिंधी कॉलनीत राहणारा कन्हैया हरिशचंद करमचंदानी (वय २७) याच्याकडे गुल्लानी आणि मेश्राम या बुकींचे आयपीएल सट्ट्याचे १ लाख २० हजार रुपये शिल्लक होते. त्यातील ३५ हजार करमचंदानीने आरोपींना दिले. ८५ हजार रुपये मिळावे म्हणून गुल्लानी आणि मेश्रामने करमचंदानीच्या मागे तगादा लावला होता. तो रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे पाहून, गुल्लानी आणि मेश्राम या दोघांनी चंद्रपूरच्या कंट्रोल रूममध्ये असलेला पीएसआय दिलीप लोखंडे याला सुपारी दिली. त्यानुसार पीएसआय लोखंडे, गुल्लानी आणि मेश्राम हे तिघे भाड्याची झायलो कार एमएच ३४/ २६९८ मध्ये बसून रविवारी भल्या सकाळी नागपुरात आले. गुल्लानी आणि मेश्रामने करमचंदानीला घरातून कारजवळ आणले. कारमध्ये मागच्या सीटवर बसून असलेला पीएसआय लोखंडे याने सर्व्हिस रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तातडीने ८५ हजार रुपये मागितले. रक्कम दिली नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबातील सदस्यांना उडवून देईल, अशी धमकीही दिली. करमचंदानीने काही तासांची मुदत मागितल्यानंतर आरोपी नागपुरात दारू पीत फिरत राहिले. दरम्यान, ४ वाजेपर्यंत त्यांनी वारंवार करमचंदानीला फोन करून पैसे मागितले. धमक्याही दिल्या. तिकडे करमचंदानीने प्रतापनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. ठाणेदार राजेंद्र पाठक यांनी एपीआय शिर्के तसेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने करमचंदानीच्या माध्यमातून रक्कम घेण्याच्या बहाण्याने बोलवून पीएसआय लोखंडे तसेच गुल्लानी आणि मेश्रामच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्याकडून सर्व्हिस रिव्हॉल्व्हर, चार काडतूस आणि मोबाईलसह गुन्ह्यात वापरलेली झायलो कारही जप्त केली. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करून, त्यांचा ११ जुलैपर्यंत पीसीआर मिळवला.

चंद्रपुरात खळबळ
आरोपी पीएसआय मूळचा मूल येथील रहिवासी असून, तो पोलीस शिपाई म्हणून भरती झाला होता. त्याची पत्नीही पोलीस दलात कार्यरत आहे. विभागीय परीक्षा देत दिलीप लोखंडे पीएसआय बनला. मात्र, त्याच्या वर्तणुकीत बदल झाला नाही. लज्जास्पद वर्तन केल्यामुळे दोन महिन्यांपूर्वी त्याला निलंबित करण्यात आले होते. आठ दिवसांपूर्वीच त्याला कामावर घेत चंद्रपूरच्या पोलीस नियंत्रण कक्षात नियुक्ती देण्यात आली. गुल्लानी आणि मेश्राम मूलचे रहिवासी असून, बुकी तसेच अवैध दारूच्या व्यवसायात गुंतले आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत लोखंडेची सेटिंग होती. क्रिकेट सट्ट्याची वसुली करण्याची सुपारी घेत लोखंडे नागपुरात आला आणि पोलीस कोठडीत पोहचला. त्याला अटक झाल्याचे वृत्त स्थानिक अधिकाऱ्यांकडून चंद्रपूरच्या नियंत्रण कक्षात कळविण्यात आली. त्यामुळे चंद्रपूर पोलीस दलात एकच खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांना ते कळताच त्यांनी रविवारी रात्रीच लोखंडेला निलंबित करण्याचे आदेश दिले.

 

Web Title: PSI Lokhande suspended , who became Vasulibhai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.