पोस्टमास्तरचा शेजारद्वेष डाक विभागाला भोवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 01:55 PM2018-09-01T13:55:11+5:302018-09-01T13:57:25+5:30

दोन शेजाऱ्यातील भांडण केव्हा, कुठल्या वळणावर जाईल याचा नेम राहिला नाही. पोलीस, कोर्ट, प्रसंगी हातापायीवर प्रकरण जाते. अशाच एका प्रकारात युवकाला नोकरीच्या संधीपासून दूर राहावे लागले, तर दुसरीकडे डाक विभागालाही दणका बसला.

Postal Department punished by Grahak manch | पोस्टमास्तरचा शेजारद्वेष डाक विभागाला भोवला

पोस्टमास्तरचा शेजारद्वेष डाक विभागाला भोवला

Next
ठळक मुद्देमुलाखतीच्या दिवशी दिले पत्रयुवकाची नोकरीची संधी हुकली

विलास गावंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दोन शेजाऱ्यातील भांडण केव्हा, कुठल्या वळणावर जाईल याचा नेम राहिला नाही. पोलीस, कोर्ट, प्रसंगी हातापायीवर प्रकरण जाते. अशाच एका प्रकारात युवकाला नोकरीच्या संधीपासून दूर राहावे लागले, तर दुसरीकडे डाक विभागालाही दणका बसला.
महागाव तालुक्याच्या कासोळा येथे झालेला प्रकार अचंबित करणारा आहे. या गावातील शाखा पोस्टमास्तरने आपल्या कर्तव्यात ‘वाद’ आडवा आणला. डाक विभागाची प्रतिमा मलीन केली. यवतमाळ जिल्हा ग्राहक न्यायालयाने या विभागाला दणका दिला आहे. तक्रारकर्त्याला सदोष सेवा, शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी २५ हजार रुपये आणि तक्रार खर्चाचे तीन हजार रुपये देण्याचा आदेश दिला आहे. मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे आणि सदस्य सुहास आळशी यांच्या उपस्थितीत सदर प्रकरण चालविण्यात आले.
कासोळा येथील आकाश देवराव पाईकराव यांनी फायरमन या पदासाठी अर्ज भरला होता. संबंधित विभागाने त्यांना रजिस्टर पोस्टाद्वारे मुलाखतपत्र पाठविले. रजिस्टर पोस्ट पुसद आणि तेथून शाखा डाकघर कासोळा येथे पोहोचले. शाखा पोस्टमास्तर आकाशचा शेजारी आहे. तेथेच सारा घोळ झाला. पाईकरावच्या नावाने असलेले पाकीट खालून फोडून तपासले गेले. त्यात असलेल्या कागदाचीही चाचपणी केली.
आकाशची मुलाखत २७ तारखेला नाशिक येथे होती. कासोळा शाखा डाकघरात २५ रोजीच रजीस्टर पोहोचले. आकाशच्या हाती मुलाखतीच्या दिवसावर पाकीट देण्यात आले. हा प्रकार जाणिवपूर्वक केल्याचे ग्राहक न्यायालयात चाललेल्या कारवाई दरम्यान सिध्द झाले. केवळ द्वेषामुळे आकाशला नोकरीच्या संधीपासून वंचित राहावे लागले. अधीक्षक डाकघर यवतमाळ, उपडाकरघर पुसद आणि बँ्रच पोस्टमास्तर कासोळा यांनी आकाश पाईकराव यांना नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे व सदस्य सुहास आळशी यांनी दिला.
शेजारी घरी नव्हता
आकाश पाईकराव यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात भरपाईसाठी तक्रार दाखल केली. प्रकरणावर कारवाई सुरू झाली. डाक विभागाने लेखी जवाब दाखल केला. आकाश घरी नव्हता, रविवार आला त्यामुळे पत्र देण्यास विलंब झाला, असे त्यात नमूद केले. शाखा पोस्टमास्तरने आकाशच्या कुटुंबातील लोकांना पत्र द्यावयास पाहिजे होते. या प्रकरणात पोस्टमारस्तरचा निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा सिध्द होत असल्याचे मंचने आपल्या निकालात म्हटले आहे. आकाश पाईकराव यांनी १८ लाख रुपये नुकसान भरपाई मागितली होती.

Web Title: Postal Department punished by Grahak manch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.