काेराडी वीज प्रकल्पात प्रदूषणाच्या नरकयातना; हजाराे हेक्टर शेती, मानवी आराेग्य धाेक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2023 08:00 AM2023-05-17T08:00:00+5:302023-05-17T08:00:12+5:30

Nagpur News काेराडी वीज प्रकल्पातून निघणाऱ्या प्रदूषणामुळे परिसरातील हजाराे हेक्टरमधील शेतीचे नुकसान आणि जीवघेण्या आजारांच्या विळख्याने नरकयातना भाेगणाऱ्या नागरिकांना पुन्हा १३२० मेगावॅटचा शाॅक देण्याची तयारी सुरू आहे.

Pollution Ordeal at Keradi Power Plant; Thousands of hectares of agriculture, human health in danger | काेराडी वीज प्रकल्पात प्रदूषणाच्या नरकयातना; हजाराे हेक्टर शेती, मानवी आराेग्य धाेक्यात

काेराडी वीज प्रकल्पात प्रदूषणाच्या नरकयातना; हजाराे हेक्टर शेती, मानवी आराेग्य धाेक्यात

googlenewsNext

निशांत वानखेडे/ दिनकर ठवळे

नागपूर : काेराडी वीज केंद्रात नव्याने ६६० मेगावॅटचे दाेन नवे युनिट उभारण्याचे प्रस्तावित आहे. याला पर्यावरणप्रेमी आणि आसपासच्या गावकऱ्यांचा विरोध आहे. असे असताना वीज प्रकल्पातून निघणाऱ्या प्रदूषणामुळे परिसरातील हजाराे हेक्टरमधील शेतीचे नुकसान आणि जीवघेण्या आजारांच्या विळख्याने नरकयातना भाेगणाऱ्या नागरिकांना पुन्हा १३२० मेगावॅटचा शाॅक देण्याची तयारी सुरू आहे.

गेल्या वर्षी तीन संस्थांनी काेराडी व खापरखेडा विद्युत निर्मिती प्रकल्पाच्या आसपासच्या २५ गावांमध्ये प्रदूषणाच्या परिस्थितीचा अभ्यास केला. तिन्ही ऋतूंमध्ये परिसरातील पृष्ठभागावरील पाणी आणि भूजलाचे नमुने गाेळा करून प्रयाेगशाळेत चाचणी करण्यात आली. २५ ठिकाणांहून पाण्याचे नमुने, ५ ठिकाणची फ्लायॲश, २१ गावांमध्ये तपशीलवार सर्वेक्षण करण्यात आले. ११ ठिकाणी नद्यांवरील व १४ गावातील विहिरी, कूपनलिका, वाॅटर एटीएम व जल प्रक्रिया केंद्रातील पाण्याच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यातून धक्कादायक वास्तव समाेर आले.

सर्वेक्षणातून पुढे आले धक्कादायक वास्तव

- वीज केंद्राची राख ३०, ४० किमीच्या परिघात उडते व परिसरातील पिके, पाल्याभाज्यांवर बसते. या पालेभाज्या माणसे, जनावरेही खातात.

- खैरी गावानजीकच्या विहिरीचे पाणी घरगुती व इतर कामे आणि शेतीसाठी वापरले जाते. यामध्ये मर्क्युरीची पातळी विहित पातळीपेक्षा ५१ पटींनी अधिक, आर्सेनिकची पातळी १३ पटींनी अधिक आणि सेलेनिअम १० पटींनी अधिक आहे. लेड, मँगनीज आणि लिथियम यांचे प्रमाणदेखील अधिक मात्रेत आढळले.

- म्हसाळा गावात बोअरवेलच्या पाण्यामध्ये मॉलिबडेनम, फ्लोरॉइड, मॅग्नेशिअम, कॉपर, मर्क्युरी, ॲल्युमिनिअम, लिथिअम हे घटक मोठ्या प्रमाणात दिसून आले. मर्क्युरीची पातळी विहित नमुन्यापेक्षा पाच पटींनी अधिक आढळली.

- खैरी गावाच्या नजीक वाहणारा पाण्याचा ओढा आर्सेनिक, मर्क्युरी, मॉलिबडेनम, सेलेनिअम, बोरोन, फ्लोरॉइड, लिथिअम, ॲल्युमिनिअम आणि मॅग्नेशिअम, अशा रासायनिक घटकांचे प्रमाण अत्याधिक हाेते.

- सर्वेक्षण केलेल्या २१ पैकी १८ गावांतील पाण्याची ठिकाणे, घरे, शेते, मोकळ्या जागा आणि वाहनांवर राख साठून राहत असल्याचे दिसले. ६७ टक्के गावांत, फ्लाय ॲश पाण्यावर साचते आणि पाणी दूषित करते. १४ गावांमधील शेतांवरदेखील फ्लाय ॲशचा परिणाम जाणवतो.

- खैरी गावातील ओढ्यात अतिशय विषारी प्रदूषणकारी घटक असलेल्या आर्सेनिकचे प्रमाण विहित निकषाच्या तीनपट आढळून आले आहे.

शेती, जनावरे, मानवी आराेग्यावर गंभीर परिणाम

- २० नोंदींपैकी १६ ठिकाणी संपूर्ण क्षेत्रावर, तर तीन ठिकाणी काही भूभागावर परिणाम झाल्याचे नोंदवले, तर १७ नोंदींमध्ये फ्लाय ॲशमुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाल्याचे आढळले.

- ८ ठिकाणी पिकाचे उत्पादन कमी झाल्याचे आणि ८ ठिकाणी जमिनीच्या सुपीकतेवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे नमूद केले.

- राखमिश्रित नदी, ओढ्याच्या प्रवाहातील पाणी गुरे-ढोरे धुणे/अंघोळ, गुरा-ढोरांना पिण्यासाठी, मासेमारी, लोकांच्या अंघोळीसाठी, सिंचन इ. कारणांसाठी वापरले जाते.

- शेतकऱ्यांनी गायी-गुरांच्या दुग्धोत्पादनात घट झाल्याचे, जनावरांच्या तब्येतीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे नोंदवले.

- गुरा-ढोरांच्या हाडांच्या सांगाड्यांवर याचा प्रभाव दिसत आहे. हाडाच्या सांगड्यांतील आजार हा फ्लोरॉइडच्या प्रदूषणाशी निगडित आहे.

- शेतकरी आणि शेतात काम करणारे मजुरांच्या आरोग्यावरदेखील परिणाम झाल्याचे अनेकांनी नोंदवले. यामध्ये श्वसनासंबंधी तक्रारी, घशाचा संसर्ग, डोळ्यांना त्रास आणि त्वचेसंबंधी तक्रारी वाढल्या.

- काही गावांतील नागरिकांनी हृदय, यकृत आणि किडनविषयक आजार असल्याची माहिती दिली.

- अस्थमाचा त्रास अनेक ठिकाणी दिसत असून, दातांची अविकसित वाढदेखील दिसून येते.

- लोकांना हाडाच्या अशक्ततेचा सामना करावा लागत असून, एखादी व्यक्ती पडल्यास सहजपणे हाड मोडण्याच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत.

- २१ पैकी ९ गावांत श्वसनात अडथळे, ५ गावांत ब्रॉन्कायटिस आणि अस्थमासारखे श्वसनाचे विकार, वारंवार खोकला- सर्दी, घशाला संसर्ग आणि ७ गावांमध्ये डोळे चुरचुरणे आणि डोळ्यांना संसर्ग, अशा आरोग्य तक्रारींचा समावेश होतो.

- आईच्या दुधात मर्क्युरी : प्रदूषणाविराेधात लढा देणारे प्रताप गाेस्वामी यांनी वीज केंद्राच्या आसपास राहणाऱ्या स्तनदा मातांच्या दुधात मर्क्युरी आढळल्याची नाेंद केली हाेती.

जगभरात काेळशावर आधारित वीज केंद्रे बंद केली जात असताना भारतात ती वाढविली जात आहेत. नागपुरात आधीच गरजेपेक्षा अधिक वीज प्रकल्प असताना त्यात आणखी भर घातली जात आहे. याचे गंभीर परिणाम स्थानिक नागरिकांना भाेगावे लागत आहेत.

-लीना बुद्धे, संयाेजिका, सेंट्रल फाॅर सस्टेनेबल डेव्हलपमेंट

Web Title: Pollution Ordeal at Keradi Power Plant; Thousands of hectares of agriculture, human health in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.