नागपूरच्या कृषी महाविद्यालयाची जागा दिवसेंदिवस होतेय कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 09:16 PM2018-10-11T21:16:05+5:302018-10-11T21:17:03+5:30

कृषी महाविद्यालय हे केवळ एक महाविद्यालय नसून ते नागपूर शहराची एक ओळख आहे. या महाविद्यालयातून भविष्यातील कृषी संशोधक, तज्ज्ञ, प्राध्यापक निर्माण होतात. परंतु अलीकडे मात्र या महाविद्यालयाकडे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी व संशोधनासाठी असलेली महाविद्यालयाकडील जागा हळूहळू कमी होत चालली आहे. परिणामी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिक्षण व संशोधनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी व मित्र परिवार चिंतित आहे.

The place of Nagpur's Agricultural College is to be reduced day by day | नागपूरच्या कृषी महाविद्यालयाची जागा दिवसेंदिवस होतेय कमी

नागपूरच्या कृषी महाविद्यालयाची जागा दिवसेंदिवस होतेय कमी

Next
ठळक मुद्देकृषी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम : आजी-माजी विद्यार्थ्यांना चिंता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कृषी महाविद्यालय हे केवळ एक महाविद्यालय नसून ते नागपूर शहराची एक ओळख आहे. या महाविद्यालयातून भविष्यातील कृषी संशोधक, तज्ज्ञ, प्राध्यापक निर्माण होतात. परंतु अलीकडे मात्र या महाविद्यालयाकडे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी व संशोधनासाठी असलेली महाविद्यालयाकडील जागा हळूहळू कमी होत चालली आहे. परिणामी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिक्षण व संशोधनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी व मित्र परिवार चिंतित आहे.
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत असलेले नागपूर कृषी महाविद्यालय शहराच्या अतिशय मोक्याच्या व मध्यभागी परिसरात आहे. महाविद्यालयाकडे मोक्याच्या ठिकाणी जवळपास ४४६.२१ हेक्टर जमीन होती. यात महाराजबागेचाही समावेश आहे. यापैकी ५९.३९ हेक्टर जमीन ही यापूर्वी वेगवेगळ्या शासकीय व निमशासकीय संस्थेला हस्तांतरित करण्यात आली. तर बजाजनगर, शंकरनगर, रामदासपेठ यासारख्या उच्चभ्रू लोकवस्तीत २९.६९ हेक्टर जमिनीवर अतिक्रमण आहे. त्यामुळे सध्या कृषी महाविद्यालयाच्या ताब्यात फक्त ३६०.१३ हेक्टर जमीन आहे.
आता महापालिकेने रामदासपेठ येथील व्हीआयपी रोडला लागून असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या जमिनीवर नवीन वॉकिंग ट्रॅक व सायकलिंग ट्रॅक तयार करण्याचे धोरण आखले आहे. यासाठी या जमिनीवरील जुने वृक्ष तोडले जाणार आहेत. त्यामुळे येथील आजी-माजी विद्यार्थी संतापले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घणारे ९२० विद्यार्थी, पदव्युत्तर शिक्षण घेणारे २२४ विद्यार्थी आणि कृषी व्यवस्थापनाचे शिक्षण घेणारे ६० असे एकूण १२०४ विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. कृषी महाविद्यालयाच्या मानकानुसार ६० विद्यार्थ्यांसाठी किमान १०० एकर जमिनीची आवश्यकता असते. त्यामुळे जवळपास दोन हजार एकर जागा महाविद्यालयाकडे असायला हवी. सध्या कृषी महाविद्यालयाकडे सध्या ८७७.५० एकरच्या जवळपास जमीन आहे. ती मुळातच कमी आहे. त्यामुळे ही जागा अशीच कमी होत गेली तर भविष्यात महाविद्यालयाची मान्यताच संकटात सापडू शकते.

अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रोइंजिनियर मित्र परिवाराचा पुढाकार
कृषी महाविद्यालयाची ही जागा वाचविण्यासाठी अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रोइंजिनियर मित्र परिवारने पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या मोहिमेत आजी-माजी विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीही सहभागी होत आहे. याअंतर्गत नवीन वॉकिंग ट्रॅक व सायकलिंग ट्रॅकच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

Web Title: The place of Nagpur's Agricultural College is to be reduced day by day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.