‘पीएचडी’ची बजबजपुरी थांबली

By admin | Published: May 11, 2017 02:46 AM2017-05-11T02:46:27+5:302017-05-11T02:46:27+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ची ‘खैरात’ वाटल्या जाते, असे आरोप करण्यात यायचे.

Ph.D. did not stop | ‘पीएचडी’ची बजबजपुरी थांबली

‘पीएचडी’ची बजबजपुरी थांबली

Next

नागपूर विद्यापीठ : यंदा केवळ १३८ उमेदवार नोंदणीसाठी पात्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ची ‘खैरात’ वाटल्या जाते, असे आरोप करण्यात यायचे. परंतु यंदापासून नियमावली कडक केल्यामुळे फारशी तयारी न करता नोंदणीसाठी सामोरे गेलेल्या उमेदवारांना फटका बसला आहे. ‘पेट’साठी अर्ज दाखल केलेल्यांपैकी केवळ साडेतीन टक्के उमेदवारच प्रत्यक्ष नोंदणीसाठी पात्र ठरले आहेत. विद्यापीठाने चाळणी प्रक्रिया नियमानुसार राबविल्यामुळे यंदा उमेदवारांची संख्या कमी झाली असली तरी दर्जा मात्र वाढला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा मिळाल्यामुळे ‘पीएचडी’च्या स्तरातदेखील वाढ करण्याची प्रशासनाला आवश्यकता वाटत होती. या सुधारणांसाठी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. या समितीने नवे दिशानिर्देश तयार केले. यानुसारच ‘पीएचडी’ नोंदणीसाठी उमेदवारांची चाळणी करण्यात आली. यंदा ३७७१ उमेदवारांनी ‘पेट-१’ ही परीक्षा दिली. यापैकी ८९७ उमेदवार ‘पेट-२’साठी पात्र ठरले. यातील अवघे ३६९ उमेदवार उत्तीर्ण झाले. मागील दोन महिन्यांत ‘आरआरसी’च्या बैठका चालल्या. ‘आरआरसी’साठी २९१ उमेदवारांनी ‘आॅनलाईन’ नोंदणी केली होती.
यातील २३६ उमेदवार ‘आरआरसी’ला सामोरे गेले. यातील केवळ १३८ उमेदवारांना नोंदणीसाठी हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. उर्वरित उमेदवारांना विविध नियमांची पूर्तता होत नसल्याने किंवा ‘सिनॉप्सिस’चे सादरीकरण प्रभावी नसल्यामुळे बाद करण्यात आले आहे.
नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ करणे फार सोपे असल्याचा अनेकांमध्ये समज आहे. परंतु नव्या नियमांमुळे हा समज मोडीत निघणार आहे. आम्हाला ‘पीएचडी’ची संख्या नव्हे तर दर्जा वाढवायचा आहे, असे मत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केले.

विज्ञान-तंत्रज्ञानमध्ये सर्वाधिक नोंदणी
‘आरआरसी’नंतर पात्र असलेल्या उमेदवारांमध्ये सर्वात जास्त प्रमाण विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेत आहे. या शाखेतील ७३३ उमेदवार नोंदणीसाठी पात्र ठरले आहेत. वाणिज्य आणि व्यवस्थापन विज्ञान विद्याशाखेतून ५१ उमेदवार नोंदणीसाठी पात्र ठरले आहेत.

 

Web Title: Ph.D. did not stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.