रेल्वेच्या विकास कामांचा प्रवाशांना फटका

By नरेश डोंगरे | Published: March 24, 2024 09:04 PM2024-03-24T21:04:14+5:302024-03-24T21:04:49+5:30

कोरोना काळात बंद झालेली दादाधाम एक्सप्रेस, आमला पॅसेंजर बंदच : नंदीग्राम एक्सप्रेस नागपूर ऐवजी अदिलाबादहून

Passengers affected by railway development works | रेल्वेच्या विकास कामांचा प्रवाशांना फटका

रेल्वेच्या विकास कामांचा प्रवाशांना फटका

नागपूर: प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जात आहेत. या विकासकामांमुळे अनेक रेल्वेगाड्यांची गती मंदावली असून, कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या काही गाड्या अद्याप सुरू न झाल्याने प्रवाशांना चांगलाच फटका बसत आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून हजारो कोटी खर्चाच्या अनेक परियोजना सर्वत्र राबविल्या जात आहे. काही ठिकानी अॅटोमेटिक सिग्नलिंगचे काम सुरू आहे. तर, काही ठिकाणी थर्ड आणि फोर्थ लाईन टाकली जात आहे. अजनी, नागपूर, गोधनी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम सुरू करण्यात आले आहे. हे करतानाच अनेक पॅसेंजर रेल्वेगाड्या कोविड काळात बंद झाल्या होत्या त्या सुरूच करण्यात आलेल्या नाही.

कोरोना काळात नागपूर-भुसावळ दादाधाम एक्सप्रेस बंद करण्यात आली होती. ती सुरूच करण्यात आली नाही. आमला पॅसेंजरचेही तसेच आहे. नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस नागपूर ऐवजी आदिलाबाद येथून चालविली जात आहे.

भारताचा मध्यबिंदू असलेल्या नागपुरातून काही ठिकाणी सुपरफास्ट गाड्या चालविल्या जाव्या, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. विशेष म्हणजे, नागपूरमध्ये रेल्वेच्या दोन महत्वपूर्ण विभागांचे अर्थात मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय मुख्यालय आहे. या दोन्ही कार्यालयाकडून आवश्यक मागण्या बोर्डाकडे पाठविल्या जातात. सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूर पासून पुण्यासाठी सुपरफास्ट ट्रेन चालविण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र, त्याकडे लक्ष दिले गेलेले नाही. सणासुदीत नागपूरातून प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढते. होळी निमित्तानेही विविध रेल्वेगाड्यांमध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे. रेल्वे प्रशासनाने विविध मार्गावर होळी स्पेशल ट्रेन सुरू केल्या. मात्र, नागपुरातून बाहेरगावी, परप्रांतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता येथून जाणाऱ्या ट्रेन अपुऱ्या पडत असल्याची चर्चा आहे.

विविध मार्गांवर नव्या गाड्यांची गरज
विविध मार्गावर सध्या तिसऱ्या आणि चाैथ्या रेल्वे लाईनची कामे वेगात सुरू आहे. अनेक मार्गावर हे काम पूर्णही झाले आहे. त्यामुळे नव्या मेमू गाड्यांसाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी मागणी आहे. खास करून वर्षभर प्रवाशांची मोठी वर्दळ राहणाऱ्या नागपूरहून छिंदवाडा, गोंदिया, नागभिड, अमरावतीसाठी नवीन मेमू ट्रेन चालविण्याची गरज आहे.

Web Title: Passengers affected by railway development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.