नागपुरात प्लास्टिकबंदीत दीड लाखांवर दंडवसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 09:36 PM2018-06-23T21:36:27+5:302018-06-23T21:42:16+5:30

राज्य सरकारने प्लास्टिकबंदीचा निर्णय लागू करताच नागपुरात शनिवारपासून याची अंमलबजावणी करण्यात आली. महापालिकेने शनिवारी सकाळपासून प्लास्टिकविरोधात धडक मोहीम राबविली. दहाही झोनमध्ये नेमलेल्या पथकांनी धडक कारवाई करीत ५३८.९ किलो प्लास्टिक जप्त केले. एकूण १ लाख ५५ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. ३४ जणांना नोटीस बजावण्यात आली. कारवाई दरम्यान विक्रेत्यांनी पथकाला जबर विरोधही केला.

Over Hundred and a half lacs Rs. fine recovered during plastic ban in Nagpur | नागपुरात प्लास्टिकबंदीत दीड लाखांवर दंडवसुली

नागपुरात प्लास्टिकबंदीत दीड लाखांवर दंडवसुली

Next
ठळक मुद्दे५३८ किलो प्लास्टिक जप्त : ३४ जणांना नोटीस : एकावर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारने प्लास्टिकबंदीचा निर्णय लागू करताच नागपुरात शनिवारपासून याची अंमलबजावणी करण्यात आली. महापालिकेने शनिवारी सकाळपासून प्लास्टिकविरोधात धडक मोहीम राबविली. दहाही झोनमध्ये नेमलेल्या पथकांनी धडक कारवाई करीत ५३८.९ किलो प्लास्टिक जप्त केले. एकूण १ लाख ५५ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. ३४ जणांना नोटीस बजावण्यात आली. कारवाई दरम्यान विक्रेत्यांनी पथकाला जबर विरोधही केला. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत एका दुकानदाराने पथकाशी वाद घातला. त्यामुळे त्याच्या विरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
प्लास्टिकबंदीच्या घोषणेनंतर अंमलबजावणीच्या नियोजनासाठी महापालिकेने शुक्रवारीच अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांच्याअध्य़क्षतेखाली आढावा बैठक घेतली होती. तपासणी करून कारवाई करण्यासाठी प्रत्येक झोनसाठी एक असे एकूण १० पथक नेमण्यात आले होते. त्यानुसार पथकांनी शनिवारी सकाळपासून दुकानांमध्ये विक्री तसेच वापरण्यात येत असलेले प्लास्टिक शोधण्यास सुरुवात केली. कारवाई होणार या धास्तीने बहुतांश प्लास्टिक विक्रेत्यांनी दुकाने उघडलीच नसल्याचे आढळून आले. धरमपेठ झोन क्र. २ मध्ये १५० किलो प्लास्टिक जप्ती, सहा नोटीस आणि १० हजार दंड वसुली, हनुमाननगर झोन क्र. ३ मध्ये ३२ किलो प्लास्टिक जप्ती, पाच नोटीस आणि २३ हजार ५०० रुपयांची दंड वसुली, धंतोली झोन क्र. ४ मध्ये ५० किलो प्लास्टिक जप्ती, पाच नोटीस आणि २५ हजारांची दंडवसुली, नेहरूनगर झोन क्र. ५ मध्ये ४३ किलो प्लास्टिक जप्ती आणि २५ हजारांची दंड वसुली करण्यात आली. या झोनमध्ये एकही नोटीस देण्यात आली नाही. गांधीबाग झोन क्र. ६ मध्ये १३६ किलो प्लास्टिक जप्ती, पाच नोटीस आणि दहा हजारांची दंड वसुली, सतरंजीपुरा झोन क्र. ७ मध्ये ६.२०० किलो प्लास्टिक जप्ती, एक नोटीस आणि पाच हजार रुपयांची दंड वसुली, लकडगंज झोन क्र. ८ मध्ये २१.७०० किलो प्लास्टिक जप्ती, दोन नोटीस आणि १० हजार रुपयांचा दंड, आसीनगर झोन क्र. ९ मध्ये १८ किलो प्लास्टिक जप्ती, तीन नोटीस आणि १५ हजारांचा दंड तर मंगळवारी झोन क्र. १० मध्ये ८२ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आला. सात नोटीस बजावण्यात आल्या आणि ३२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
दुकानदारांचा तीव्र विरोध
 महापालिकेच्या १० पथकांनी शहरातील विविध दुकानांमध्ये जाऊन प्लास्टिकचा वापर व विक्री होत आहे का याची पाहणी करून दंडात्मक कारवाई केली. पथकाला बऱ्याच ठिकाणी दुकानदारांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. हजारो रुपयांचे प्लास्टिक आम्ही खरेदी केले आहे, ते कसे फेकून द्यायचे, याची नुकसान भरपाई सरकार देणार का, असे प्रश्न दुकानदारांनी पथकाला केले. काही दुकानदारांनी तर पथकावरच लाच घेण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचे आरोप केले. कारवाईमुळे दुकानदारांमध्ये अस्वस्थता पसरली असून या विरोधात दुकानदार व विक्रेते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
धरमपेठ व मंगळवारी झोनची धडक कारवाई
सर्वाधिक १५० किलो प्लास्टिकची जप्ती धरमपेठ झोन क्र. २ मध्ये करण्यात आली तर सर्वाधिक ३२ हजारांचा दंड मंगळवारी झोन क्र. १० मधून वसूल करण्यात आला. लक्ष्मीनगर झोन क्र. १ मध्ये एक नोटीस देण्यात आला नाही किंवा दंड वसुली झाली नाही.
प्लास्टिकबंदीसाठी पुढाकार घ्या
 नागपूर शहरात आज, शनिवारपासून प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. प्लास्टिक बाळगल्यास ५ पासून २५ हजारांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर बंद करा. याकरिता नागरिकांनी स्वत: पुढाकार घ्यावा.
 वीरेंद्र सिंह, मनपा आयुक्त

नियमित तपासणी होणार
 महापालिकेच्या पथकांनी शासन आणि प्रशासनाच्या दिशानिर्देशानुसार अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे ज्या प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिक वस्तूंवर बंदी आहे अशा प्लास्टिक विकणाऱ्या आणि वापरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली. पथकाद्वारे नियमित तपासणी सुरू राहील व प्लास्टिक आढळून आल्यास कारवाई केली जाईल.
 डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) 

Web Title: Over Hundred and a half lacs Rs. fine recovered during plastic ban in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.