-तर देशाची फाळणी झाली असती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:29 AM2017-11-20T01:29:46+5:302017-11-20T01:30:05+5:30

१९७९ मध्ये इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या. त्यावेळी पंजाबमध्ये  दहशतवादी  जर्नेलसिंह भिंद्रानवाले याची दहशत निर्माण झाली होती.  वेगळे  खलिस्तान राज्य स्थापन करण्याचा त्याचा डाव होता.

Otherwise the country would have been partitioned | -तर देशाची फाळणी झाली असती 

-तर देशाची फाळणी झाली असती 

Next
ठळक मुद्देसुरेश द्वादशीवारांनी उलगडला जीवनपट : इंदिरा गांधी जन्मशताब्दी सांगता सोहळा

ऑनलाईन लोकमत 
नागपूर : १९७९ मध्ये इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या. त्यावेळी पंजाबमध्ये  दहशतवादी  जर्नेलसिंह भिंद्रानवाले याची दहशत निर्माण झाली होती.  वेगळे  खलिस्तान राज्य स्थापन करण्याचा त्याचा डाव होता. परंतु इंदिरा गांधी  यांनी  आॅपरेशन ब्ल्यू स्टारचा निर्णय  घेतला व भारतीय सैन्यास कारवाईचे आदेश दिले. मंदिरातील ‘अकालतख्त’ लष्कराने उद्ध्वस्त केले.  लष्करी कारवाईचा धाडसी निर्णय घेतला नसता तर देशाची फाळणी झाली असती, असे प्रतिपादन लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी रविवारी येथे केले.
नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्यावतीने सिव्हील लाईन येथील चिटणवीस सेंटरच्या मैदानावर  आयोजित माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी सांगता सोहळ्यात ‘इंदिराजींचा क्रांतिकारी जीवनपट’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलताना द्वादशीवार म्हणाले,  देश एकसंघ ठेवायचा असेल तर इंदिरा गांधी यांच्या मार्गावरून जाण्याची गरज आहे.  आणीबाणीत इंदिराजींच्या तुरुंगात मी होतो. विरोधी पक्षाचेही नेते होते. सहा महिन्यांनी इंदिराजी आनंदवनात आल्या. त्यांचे स्वागत करताना अंध मुलाने त्यांना दिवा दिला. त्यावर ‘जिसके आँखो में रोशनी नही, उसने दिया दिया’. असे सूचक उद्गार काढले. हे मातृत्वाचे लक्षण आहे. २००२ मध्ये बीबीसीने सहस्रातील सर्वश्रेष्ठ महिला म्हणून  इंदिरा गांधी यांच्यावर शिक्कामोर्तब केले तर अमेरिकेतील एका नियतकालिकाने महात्मा गांधी यांचा जगातील सर्वात मोठी व्यक्ती म्हणून उल्लेख केला. जगातील सर्वात मोठे पुरुष व आई आपल्या देशात आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे द्वादशीवार म्हणाले. 
इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचा नारा दिला होता. खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करून त्यावर गरीब माणसांचे नियंत्रण आणले होते. आता सत्ताधारी गरिबांनाच हटवत आहेत. बांगला देशाला स्वातंत्र्य बहाल करून पाकिस्तानचे दोन तुकडे केले. इंदिरा गांधी यांना देशाचा इतिहास माहीत होता. नेहरूजींनी त्यांना इतिहासाचे दोन हजार पानांचे पुस्तक दिले होते, असे द्वादशीवार म्हणाले.  कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते बाबुराव तिडके, एस.क्यू. जामा, अनंतराव घारड, केशवराव शेंडे, धनंजय धार्मिक, शेख हुसैन, अ‍ॅड. अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, संजय महाकाळकर यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. बाळ कुळकर्णी यांनी संचालन  तर आभार विशाल मुत्तेमवार यांनी मानले. सूर संगमच्या पथकाने देशभक्तीपर गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
देशात अघोषित आणीबाणी
इंदिरा गांधी यांनी घटनेतील कायद्यानुसार आणीबाणी आणली होती. परंतु आता दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडून  त्यांना ठार केले जाते. गाईचे मांस आहे, म्हणून मारले जाते. लाजेखातर आरोपीवर बक्षीस जाहीर केले जाते पण आरोपीं मिळत नाही. देशात अशी अघोषित आणीबाणी आहे. असे राज्यकर्ते इंग्रजही नव्हते. लोकशाहीवाद्यांनी या विरोधात लढा उभारण्याची गरज असल्याचे सुरेश द्वादशीवार म्हणाले.

Web Title: Otherwise the country would have been partitioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.