देशात २१३ घरफोड्या करणाऱ्या कुख्यात कुरेशीला हैदराबादमधून अटक, नागपूर पोलिसांची कारवाई

By योगेश पांडे | Published: April 9, 2024 10:19 PM2024-04-09T22:19:07+5:302024-04-09T22:19:18+5:30

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या घरीदेखील केली होती चोरी

Notorious Qureshi, who committed 213 burglaries in the country, arrested from Hyderabad | देशात २१३ घरफोड्या करणाऱ्या कुख्यात कुरेशीला हैदराबादमधून अटक, नागपूर पोलिसांची कारवाई

देशात २१३ घरफोड्या करणाऱ्या कुख्यात कुरेशीला हैदराबादमधून अटक, नागपूर पोलिसांची कारवाई

नागपूर: देशातील विविध राज्यांत तब्बल २१३ घरफोड्या करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. रामदासपेठेतील एका व्यावसायिकाच्या घरी चोरी केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्याच्यासह आतापर्यंत २२ गुन्हे दाखल असलेल्या साथीदारालादेखील अटक केली आहे. कुख्यात घरफोडयाने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनकडेदेखील घरफोडी केली होती.

मोहम्मद सलीम मोहम्मद हबीब कुरेशी (५१, रंगारेड्डी, हैदराबाद) व शाबीर उर्फ साबीर जमील कुरेशी (३२, रफीकनगर, गोवंडी, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ऋषभ राजेंद्र कामदार (४३, रामदासपेठ) यांचे आईवडील १७ मार्च रोजी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. कामदार नियमितपणे आईवडिलांकडे जाऊन पाहणी करत होते. २५ मार्च रोजी रात्री तेथे घरफोडी झाली व आरोपींनी १७.९० लाखांचा मुद्देमाल लंपास केला. कामदार यांच्या तक्रारीवरून सिताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हेशाखेच्या घरफोडी विरोधी पथकाकडून याचा समांतर तपास सुरू होता.

सीसीटीव्ही तसेच खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांना यात कुरेशी व शाबीर सहभागी असल्याची माहिती मिळाली. दोघेही ज्या लॉजमध्ये थांबले होते तेथून त्यांचा पत्ता मिळाला. पोलिसांच्या पथकाने हैदराबादला जाऊन अगोदर कुरेशी व नंतर शाबीरला अटक केली. दोघांनीही गुन्हा कबूल केला. त्यांच्या ताब्यातून कार, मोबाईल असा ९.२० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपासासाठी आरोपींना सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक किरण कबाडी, मयुर चैरसिया, राजेश देशमुख, रवि अहीर, प्रशांत गभने, श्रीकांत उईके, निलेश श्रीपात्रे, सुधीर पवार व प्रविण रोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

शाबीरवर मुंबईत २२ गुन्हे
५१ वर्षीय कुरेशीवर देशभरात चोरीचे २१३ गुन्हे दाखल आहेत तर शाबीरवर मुंबईत २२ गुन्हे दाखल आहेत. २००१ मध्ये कुरेशनीने तीन साथीदारांच्या मदतीने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या घरातून चोरी केली होती. या चोरीने मुंबई पोलीसही चक्रावून गेले. कुरेशी त्यानंतरच हैदराबादला पळून गेला.

महागड्या कारमध्ये फिरायचे आरोपी
कुरेशी महागड्या कारमध्ये फिरून चोरी करतो. मोठ्या शहरांमध्ये जाऊन पॉश अपार्टमेंट शोधल्यावर तेथील पार्किंगमध्ये कार पार्क करून बंद फ्लॅट शोधायचे. दारासमोर वर्तमानपत्र किंवा दुधाची पिशवी पाहून फ्लॅट मालक बाहेर गेल्याची माहिती ते काढायचे. स्क्रू ड्रायव्हर आणि टॉमीच्या साहाय्याने ते कुलूप किंवा कुंडी सहज फोडायचे. दोघेही आरोपी भाड्याच्या कारने नागपुरात आले व चोरी करून मुंबईला गेले. त्यांनी तेथील एका सराफा व्यापाऱ्याला दागिने विकले. कुरेशीला चैनीचे आयुष्य जगण्याची सवय आहे. तो विमानाने प्रवस करतो व पॉश हॉटेलमध्ये मुक्काम असतो. त्याला पाच मुले असून तो पोलिसांना चकमा देण्यासाठी कुटुंबापासून दूर राहतो.

Web Title: Notorious Qureshi, who committed 213 burglaries in the country, arrested from Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.