खायला अन्न नाही, पिण्यासाठी पाणी नाही! जुनापाणीच्या ग्रामस्थांनी एकत्रच काढली रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2022 07:52 PM2022-07-16T19:52:37+5:302022-07-16T19:53:10+5:30

Nagpur News गावातील घरात पुराचे पाणी शिरल्याने काहींचे अन्नधान्य भिजले तर काहींचे वाहून गेले. पाणीपुरवठ्याच्या विहिरीतही गढूळ पाणी शिरले. त्यामुळे खायला अन्न नाही अन् पिण्याला शुद्ध पाणी नाही, अशी जुनापाणीवासीयांची अवस्था झाली आहे.

No food to eat, no water to drink! The villagers of Junapani spent the night together | खायला अन्न नाही, पिण्यासाठी पाणी नाही! जुनापाणीच्या ग्रामस्थांनी एकत्रच काढली रात्र

खायला अन्न नाही, पिण्यासाठी पाणी नाही! जुनापाणीच्या ग्रामस्थांनी एकत्रच काढली रात्र

Next
ठळक मुद्देतलावातून पाण्याचा विसर्ग सुरूच

चंदू बोरकर

नागपूर: ५० वर्षे जुन्या तलावाचा बांध फुटल्याने गुरुवारी जुनापाणी गाव शुक्रवारी पाण्याखाली आले. पुरात होते- नव्हते सारे वाहून गेले. प्रशासन तातडीने मदत पोहोचेल अशी आस धरत जुनापाणीवासीयांनी अख्खी रात्री एकत्र काढली. गावातील घरात पुराचे पाणी शिरल्याने काहींचे अन्नधान्य भिजले तर काहींचे वाहून गेले. पाणीपुरवठ्याच्या विहिरीतही गढूळ पाणी शिरले. त्यामुळे खायला अन्न नाही अन् पिण्याला शुद्ध पाणी नाही, अशी जुनापाणीवासीयांची अवस्था झाली आहे.

मंगरूळ ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या ७० लोकांची वस्ती असलेल्या शुक्रवारी पहाटे संकट कोसळले होते. तलावाचा बांध फुटल्यानंतर तहसीलदार आशिष वानखेडे यांच्यासह महसूल यंत्रणा जुनापाणी येथे पोहोचली. मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी नुकसानीचा पंचनामा केला. शासकीय सोपस्कार झाल्यानंतर येथील ग्रामस्थांना मदतही मिळेल. मात्र, सध्या त्यांच्या जेवण्याचा आणि पिण्याचा प्रश्न तातडीने सोडविणे आवश्यक आहे. शनिवारीही तलावाच्या फुटलेल्या बांधातून पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे फुटलेल्या बांधाची तातडीने डागडुजी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. पुन्हा मुसळधार पाऊस झाल्यास गावावर पुन्हा संकट कोसळेल, अशी भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली. शुक्रवारी दुपारनंतर प्रशासनाकडून कोणतेही मदत मिळाली नसल्याने गावकऱ्यांनी ज्यांच्याकडे अन्न धान्य शिल्लक होते ते गोळा करून शिजविले. पुराचे पाणी गावात शिरल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका निर्माण झाल्याने गावातील पुरुष मंडळी रात्रभर जागले.

आता उदरनिर्वाह कसा करायचा?

शेतीसह बकरी, गाय आणि कोंबडी पालन हे जुनापाणीवासीयांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. मात्र, शुक्रवारच्या पुरात गावातील १८१ पाळीव जनावरे वाहून गेली. १३ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. अशात उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न रवी उईके, प्रतीक सुरपाम, रोशन लाखे, भाऊराव सूरपाम, शांता परतेकी, सुमित्रा उईके,चंद्राबाई सुरपाम यांच्यासह आदी ग्रामस्थांनी केला.

वाघोबाचीही भीती

गावाजवळच असलेल्या नाल्याजवळ वाघाने बैलाची शिकार केल्याने गावात वाघाची भीती निर्माण झाली आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाकडून जुनापाणी येथील पाणीपुरवठा विहिरीच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे. ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. तसेच, सोमवारी धान्य किट तयार करून ग्रामस्थांना देण्यात येईल.

व्यंकटेश निस्ताने, ग्रामसेवक, मंगरूळ,ग्रा.पं.

Web Title: No food to eat, no water to drink! The villagers of Junapani spent the night together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर