नागपूर विद्यापीठ कधी होणार ‘दिव्यांग फ्रेंडली’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:43 AM2018-10-24T11:43:03+5:302018-10-24T11:44:58+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दिव्यांग विद्यार्थीदेखील शिक्षण घेत आहेत. परंतु बहुतांश ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना दररोज परीक्षा द्यावी लागते.

Nagpur University will be 'Divya-friendly'? | नागपूर विद्यापीठ कधी होणार ‘दिव्यांग फ्रेंडली’?

नागपूर विद्यापीठ कधी होणार ‘दिव्यांग फ्रेंडली’?

Next
ठळक मुद्देप्रशासकीय इमारत, परीक्षा भवनात दिव्यांगांना अडचण विभागांमध्ये सुविधा हव्या

योेगेश पांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आजच्या घडीला पावणेसहाशेहून अधिक महाविद्यालये आहेत. यातील अनेक महाविद्यालयांत दिव्यांग विद्यार्थीदेखील शिक्षण घेत आहेत. परंतु बहुतांश ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना दररोज परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा असते महाविद्यालयांत पोहोचण्याची, लढा असतो वर्गखोल्यांत प्रवेश करण्याचा अन् संघर्ष असतो स्वत:चा आत्मविश्वास ढळू न देण्याचा. संलग्नित महाविद्यालयेच नव्हे तर विद्यापीठाची प्रशासकीय इमारत, परीक्षा भवन तसेच विद्यापीठाच्या विभागांमध्येदेखील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. शिक्षण मनुष्याला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम बनविते. परंतु अगोदरच दिव्यांग असलेल्या विद्यार्थ्यांना सुविधांचे पाठबळच नसल्याचे चित्र आहे. विद्यापीठ ‘दिव्यांग फ्रेंडली’ कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आरक्षण, शुल्क सवलती, शिष्यवृत्ती अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी प्रवेशदेखील घेतात. परंतु महाविद्यालयांत गेल्यावर मात्र त्यांना पायाभूत सुविधाच नसल्याचे लक्षात येते. पुण्यातील सीए करणारी आकांक्षा काळे नावाच्या दिव्यांग विद्यार्थिनीला महाविद्यालयात जाण्याची काही सुविधाच नव्हती. त्यामुळे ती दोन वर्षे परीक्षेलाच बसू शकली नाही. परंतु या मुलीने हार न मानता उच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. त्यानंतर न्यायालयाने सर्व विद्यापीठे तसेच महाविद्यालयांना दिव्यांगांसाठी प्राथमिक सुविधा पुरवण्याचे आदेश दिले होते. सोबतच केंद्र सरकारनेदेखील सरकारी कार्यालये, विद्यापीठातील कार्यालये, विद्यापीठ परिसर तसेच सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये ‘दिव्यांग फ्रेंडली कॅम्पस’ तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात विद्यापीठातच अशा प्रकारचे वातावरण नसल्याचे चित्र आहे.

प्रशासन कधी होणार गंभीर?
नागपूर विद्यापीठातील काही मोजक्या विभागात व संलग्नित महाविद्यालयांत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. परंतु काही अपवाद सोडले तर महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या व्हिलचेअरसाठी रँप, वरच्या मजल्यावरील वर्गात जाण्यासाठी लिफ्ट, व्हिलचेअरवरून वापरता येण्याजोगे स्वच्छतागृह अशा मूलभूत सुविधा निर्माण करण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसते. १९९५ पासून अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) अधिनियम अस्तित्वात असून,वारंवार सूचना, परिपत्रके काढूनही अपंग विद्यार्थ्यांसाठी सुविधाच निर्माण केलेल्या नाहीत व विद्यापीठ प्रशासनानेदेखील याची गंभीरतेने दखल घेतली नाही.

विद्यापीठ विभागांत निराशाजनक चित्र
केवळ संलग्नित महाविद्यालयांतच नव्हे तर अगदी विद्यापीठाच्या विभागांतदेखील निराशाजनक चित्रच आहे. अनेक विभागांमध्ये ‘रॅम्प’च उपलब्ध नाहीत. शिवाय वर्गदेखील तळमजल्यावर न घेता वरच्या मजल्यावर घेण्यात येतात. काही विभागांत तर तळमजल्यावर वर्गखोल्याच नाहीत. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यासंदर्भात महाविद्यालयांना सूचना केल्या आहेत की नाही यासंदर्भात विचारणा करण्यासाठी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Nagpur University will be 'Divya-friendly'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.