नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालय : नऊ महिन्यात २७ मनोरुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 08:22 PM2018-10-09T20:22:22+5:302018-10-09T20:23:28+5:30

प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णसेवेत १५ डॉक्टर कार्यरत आहे. त्यांच्या मदतीला मेडिकलचे तीन डॉक्टर आहेत. असे असताना, रुग्णाचे मृत्यूसत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने रुग्णालयाच्या कारभारावरच संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या नऊ महिन्यात २७ रुग्णांचे बळी गेले आहेत. विशेष म्हणजे, रुग्णांचे मृत्यू प्रकरण हिवाळी अधिवेशनात गाजले, त्यावर उपाययोजना सुचविण्यात आल्या, परंतु त्याचा फारसा काही उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे.

Nagpur Regional Mental Hospital: Death of 27 psychiatrists in nine months | नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालय : नऊ महिन्यात २७ मनोरुग्णांचा मृत्यू

नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालय : नऊ महिन्यात २७ मनोरुग्णांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देगेल्या दोन दिवसांत दोन मृत्यूची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णसेवेत १५ डॉक्टर कार्यरत आहे. त्यांच्या मदतीला मेडिकलचे तीन डॉक्टर आहेत. असे असताना, रुग्णाचे मृत्यूसत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने रुग्णालयाच्या कारभारावरच संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या नऊ महिन्यात २७ रुग्णांचे बळी गेले आहेत. विशेष म्हणजे, रुग्णांचे मृत्यू प्रकरण हिवाळी अधिवेशनात गाजले, त्यावर उपाययोजना सुचविण्यात आल्या, परंतु त्याचा फारसा काही उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे.
प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन मनोरुग्णांची गळा दाबून हत्या झाल्याची घटना २०१६ मध्ये ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती. यात उपचार घेत असलेले ४४ वर्षीय जयंत नेरकर व ६० वर्षीय मालती पाठक यांचा मृत्यू नैसर्गिक नसून गळा दाबून झाल्याचे शवविच्छेदन विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले होते. या घटनेला चौकशी समिती स्थापन झाली. परंतु पुढे काय झाले याची माहिती कुणालाच नाही. शिवाय, गेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने मानसिक आरोग्यविषयक धोरण प्रभाविपणे राबविण्यासाठी मानसिक आरोग्य प्राधिकरण समितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. यात अभ्यागत समितीच्या कार्यकक्षा वाढविण्यात आल्या. त्यानुसार समितीने मनोरुग्णालयाचे कामकाज पाहणे, कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत मानसिक शुश्रुषागृहांचा परवाना व नूतनीकरणाकरिता गठित केलेल्या समितीचा अहवाल तपासून राज्यस्तरावर शिफारस करणे, दर महिन्याला अभ्यागत समिती सदस्यांच्या बैठकीत मनोरुग्णालयातील बरे झालेल्या रुग्णांना ‘डिस्चार्ज’ व प्रमाणपत्र देणे, प्रादेशिक मनोरुग्णालयातील आंतररुग्णांच्या मृत्यूचे ‘डेथ आॅडिट’ करून अहवाल सादर करणे व मनोरुग्णालयाच्या तपासणीकरीत नियमित भेटी देणे आदी जबाबदाऱ्या समितीवर टाकण्यात आल्या. परंतु त्यानंतरही रुग्णालयातील रुग्णांचे मृत्यू थांबलेले नाहीत. ८ आॅक्टोबर रोजी रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक आठमध्ये नारायण विश्वास या ६० वर्षीय रुग्णाचा तर ५० वर्षीय अनोळखी रुग्णाचा मेडिकलमध्ये मृत्यू झाला. मृत्यूची संख्या या वर्षात २७ झाली आहे. यातील बहुसंख्य मृत्यू आजारापणामुळे झाले आहेत.
रुग्णालयात वर्ग एकचे एक डॉक्टर, वर्ग दोनचे १३ डॉक्टर, यातील नऊ मनोरुग्णालयातील आहेत. दोन डॉक्टर हे पदव्युत्तर विद्यार्थी तर दोन डॉक्टर हे ‘एनआरएचएम’चे आहेत. या शिवाय वर्ग तीनचे दोन डॉक्टर, असे एकूण डॉक्टरांची संख्या १५ आहे. धक्कादायक म्हणजे, ६००वर रुग्ण असताना त्यांना पहायला एकच फिजिशियन डॉक्टर आहे. त्यांच्या मदतीला एक दिवसाआड मेडिकलचे तीन डॉक्टर आहेत. परंतु रुग्णांवरील औषधोपचार वेळेवर होत नसल्याने रुग्ण आजारात गंभीर होऊन मृत्यूला सामोर जात असल्याचे येथील काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

मृत्यूला घेऊन तूर्तास काही बोलता येणार नाही
जिल्हा शल्यचिकित्सक या पदासोबतच नुकतीच प्रादेशिक मनोरुग्णालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे रुग्णाच्या मृत्यूवर रुग्णालयातच बसून चर्चा केल्यावर नेमकी माहिती मिळू शकेल. या वर्षात मृत्यू झालेल्या रुग्णाचा आकडा फुगवून सांगितला जात आहे. तूर्तास काही बोलता येणार नाही.

डॉ. देवेंद्र पातुरकर
प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर.

 

Web Title: Nagpur Regional Mental Hospital: Death of 27 psychiatrists in nine months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.