नागपूर रेल्वेस्थानक : वेटिंग रुम बंद असल्यामुळे महिलांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 09:47 PM2019-04-01T21:47:42+5:302019-04-01T21:49:51+5:30

नागपूर रेल्वेस्थानकावर उपस्टेशन कार्यालयाच्या शेजारी महिलांसाठी वेटिंग रुम आहे. परंतु मागील २२ दिवसांपासून देखभालीच्या कामासाठी ही वेटिंग रुम बंद असल्यामुळे महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे. आणखी या कामासाठी काही दिवस लागण्याची शक्यता असून रेल्वे प्रशासनाने ही वेटिंग रुम महिलांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

Nagpur Railway Station: Women's inconvenience due to the shutting down of the waiting room | नागपूर रेल्वेस्थानक : वेटिंग रुम बंद असल्यामुळे महिलांची गैरसोय

प्लॅटफार्म क्रमांक एकवर असलेल्या महिला वेटींग रुममध्ये असे देखभालीचे काम सुरु असल्यामुळे महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे

googlenewsNext
ठळक मुद्देप्लॅटफॉर्मवर बसून पहावी लागते रेल्वेगाड्यांची वाट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर उपस्टेशन कार्यालयाच्या शेजारी महिलांसाठी वेटिंग रुम आहे. परंतु मागील २२ दिवसांपासून देखभालीच्या कामासाठी ही वेटिंग रुम बंद असल्यामुळे महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे. आणखी या कामासाठी काही दिवस लागण्याची शक्यता असून रेल्वे प्रशासनाने ही वेटिंग रुम महिलांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालय आहे. या कार्यालयाच्या शेजारी स्लिपरक्लासने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी वेटिंग रुम आहे. या वेटिंग रुममध्ये गाडी येण्यासाठी वेळ असलेल्या महिला प्रवासी गाडीची वाट पाहत बसतात. एसी बसविणे, पीओपीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने ही वेटिंग रूम मागील २० दिवसांपासून बंद केली आहे. परिणामी रेल्वेस्थानकावर येणाऱ्या महिलांची कुचंबणा होत आहे. त्यांना गाड्यांची वाट पाहत प्लॅटफॉर्मवर बसण्याची पाळी येत आहे. यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर प्रवाशांची गर्दी पाहावयास मिळत आहे. महिला वेटिंग रुमच्या देखभालीचे काम करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने मंद हालचाली सुरू आहेत. त्यामुळे वेटिंग रुमचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे महिलांची गैरसोय पाहता रेल्वे प्रशासनाने तातडीने काम पूर्ण करून महिला प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.
सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिनही बंद
रेल्वे प्रशासनाने महिला प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील वेटिंग रुममध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन उपलब्ध करून दिली. यात पाच रुपये टाकले की महिलांना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होते. परंतु वेटिंग रुममधील ही मशिन देखभालीच्या कामासाठी काढून ठेवल्यामुळे महिलांची कुचंबणा होत आहे.
१५ दिवसात होणार सुरू
‘रेल्वेस्थानकावर महिलांसाठी असलेल्या वेटिंग रुमच्या देखभालीचे काम करण्यात येत आहे. आगामी १५ दिवसात हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर लगेच महिलांसाठी ती उपलब्ध करून देण्यात येईल.’
-एस.जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

Web Title: Nagpur Railway Station: Women's inconvenience due to the shutting down of the waiting room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.