नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा फेरफटका आणि विद्यार्थ्यांचा रस्त्यावरच ‘क्लास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 11:29 AM2018-08-13T11:29:22+5:302018-08-13T11:32:25+5:30

कॉलेजियन्सचा घोळका बघून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यातील पालक जागा होतो. १५ ते २० मिनिटांचा हा रस्त्यावरचा क्लास विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण देणारा ठरतो.

Nagpur police commissioner's tour and students 'class' | नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा फेरफटका आणि विद्यार्थ्यांचा रस्त्यावरच ‘क्लास’

नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा फेरफटका आणि विद्यार्थ्यांचा रस्त्यावरच ‘क्लास’

googlenewsNext
ठळक मुद्देवळण देणारा धडाविद्यार्थ्यांचा संकल्पसूरआम्हालाही पोलीस बनायचेय!

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वायुसेना नगराचा परिसर... हिरवळ अन् स्वच्छंद तरुणाई ... थोड्या थोड्या अंतरावर प्रेमीयुगुल अन् काही ठिकाणी विद्यार्थी मित्रांचे घोळके. सहजसुलभ गप्पाटप्पा अन् गंमतजम्मत रंगात आलेली. तेवढ्यात पोलीस आयुक्तांचे वाहन तेथून जाते. कॉलेजियन्सचा घोळका बघून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यातील पालक जागा होतो. आपले वाहन थांबवण्याचा इशारा करून ते लगेच वाहनातून खाली उतरतात. त्यांच्या मागेपुढे असलेला पोलीस ताफाही उतरतो. डॉ. उपाध्याय विद्यार्थ्यांच्या घोळक्याकडे पावलं टाकतात. पोलिसांचा ताफा अन् शहर पोलीस दलाचे प्रमुख आपल्याकडे येताना बघून घोळक्यातील विद्यार्थी काहीसे कावरेबावरे झालेले. दडपणात आलेले. त्यांची ती अवस्था लक्षात घेत डॉ. उपाध्यात चिरपरिचित स्माईल देत विद्यार्थ्यांवरील दडपण दूर करतात. हाय, हॅलो करीत ‘तुम्ही कॉलेज सोडून इकडे काय करता’ वगैरे सहजपणे चौकशी करतात. फारसे उपदेशाचे डोज देण्याऐवजी हलकी फुलकी चर्चा करून आता वर्गाला दांडी मारली तर भविष्यात त्याचे दुष्परिणाम कसे होतील. आज शिकविल्या गेलेल्या ज्ञानापासून तुम्ही कसे वंचित झाला, ते प्रभावीपणे पटवून देतात. पोलीस दलाचा प्रमूख अगदी मित्रासारखा गप्पा करीत असल्याने विद्यार्थ्यांवरील दडपण कधीचेच पळालेले असते. शिवाय एक मार्गदर्शक लाभल्याची भावनाही त्यांच्यात रुजते. १५ ते २० मिनिटांचा हा रस्त्यावरचा क्लास आयुष्याला वळण देणारा ठरतो. एक वेगळा धडा मिळाल्याची विद्यार्थ्यांमधून तात्काळ प्रतिक्रिया उमटते. क्लास संपतो अन् एकसाथ सगळ्यांचा सूर निघतो... ‘सर, आम्हीही आता मन लावून शिकणार, तुमच्यासारखे पोलीस अधिकारी बनणार... !’ त्यांचा हा संकल्पसूर पोलीस आयुक्तांच्या चेहऱ्यावरील हास्य खुलविणारा ठरतो.

सेल्फी व्हायरलही झाली.
दहा दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त म्हणून रुजू झालेले डॉ. उपाध्याय रोज थोडा वेळ काढून शहरातील विविध भागांचा फेरफटका मारतात. शहरातील कायदा अन् सुव्यवस्थेची स्थिती बघण्याची त्यांची ही शैली आहे. दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे ते वायुसेना नगरातून निघाले अन् वर्गाला दांडी मारणाºया विद्यार्थ्यांचा त्यांनी चक्क रस्त्यावरच क्लास घेतला. पोलीस दिसला की दूर पळणाºया तरुणाईचा अशा पद्धतीने विश्वास जिंकण्याची डॉ. उपाध्याय यांची शैली विद्यार्थ्यांना प्रेमात पाडणारीही ठरली. नंतर सेल्फी झाली अन् ती व्हायरलही झाली.

Web Title: Nagpur police commissioner's tour and students 'class'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस