मागासवर्गीय महिलांवरील अत्याचारात नागपूर आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 09:52 PM2018-04-10T21:52:38+5:302018-04-10T21:52:53+5:30

राज्याची उपराजधानी असलेले नाागपूर हे समरसता नांदणारे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, मागासवर्गीय महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी पाहता नागपूरची मान लाजेने खाली घालण्याची वेळ आली आहे. अनुसूचित जातीच्या माहिलांवरील अत्याचाराच्या घटनेत नागपूर आघाडीवर आहे.

Nagpur leads in the backward class women atrocity | मागासवर्गीय महिलांवरील अत्याचारात नागपूर आघाडीवर

मागासवर्गीय महिलांवरील अत्याचारात नागपूर आघाडीवर

googlenewsNext
ठळक मुद्देअनूसूचित जाती आयोगाच्या सदस्या स्वराज विद्वान यांची नाराजी२ वर्षात २६ महिलांवर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याची उपराजधानी असलेले नाागपूर हे समरसता नांदणारे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, मागासवर्गीय महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी पाहता नागपूरची मान लाजेने खाली घालण्याची वेळ आली आहे. अनुसूचित जातीच्या माहिलांवरील अत्याचाराच्या घटनेत नागपूर आघाडीवर आहे. २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षात बलात्काराच्या २६ घटना घडल्या़ असून अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत त्यात कारवाई सुरू आहे़, अशी माहिती अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्या स्वराज विद्वान यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात जिल्ह्यातील अनुसूचित जातींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा राष्ट्रीय आयोगाच्या सदस्या स्वराज विद्वान यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. श्रीमती कादंबरी बलकवडे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त विजय वाकुलकर, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. डॉ. स्वराज विद्वान यांनी जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेल्या वसतिगृहांना भेट देऊन पाहणी केली. तसेच येथे उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली. त्यानंतर विभाग प्रमुखांच्या बैठकीत विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सुविधा, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबद्दल सूचना दिल्यात.
यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, अनुसूचित जातीच्या महिलांवर होणारे अत्याचार वाढले आहे़ जातीय विद्वेषातून हत्याही होत आहेत़ हत्यांच्या घटना पुणे, मुंबई या भागात अधिक दिसून येतात़ आयोगाकडे पूर्वी ५१ हजार प्रकरणे प्रलंबित होती़ ती निकाली काढली जात आहे़ एका दिवसात किमान ५०० तक्रारी आयोगाकडे येत आहेत. वसतिगृहात सर्व सोईसुविधा उपलब्ध करून द्याव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाला दिले़ जातीय विद्वेषातून हत्येची दोन प्रकरणे नागपुरात घडली होती़ त्यांच्या कुटुंबातल एकाला नोकरी देण्याबाबत कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे स्वराज यांनी सांगितले़
वसतिगृहांची स्वच्छता नाही
 स्वराज विद्वान यांनी बी़ सी़ गर्ल्स होस्टेल, नांदा बॉईज होस्टेल, मुक्ताबाई गर्ल्स होस्टेल या तीन वसतिगृहांची पाहणी केली़ येथे अनेक सोईसुविधांचा अभाव असल्याचे आढळून आले़ नियमित स्वच्छता केली जात नसून जिमचे साहित्यही तुटलेले आढळले. वसतिगृहात पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याचेही दिसून आले. यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Web Title: Nagpur leads in the backward class women atrocity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.