नागपुरात ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ची हवा निघाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 10:49 AM2019-04-30T10:49:16+5:302019-04-30T10:51:28+5:30

नागपुरात पारा ४५ अंशावर असतानाही हिट अ‍ॅक्शन प्लॅनची हवा निघाल्याचे चित्र आहे.

Nagpur 'hit action plan' is failed! | नागपुरात ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ची हवा निघाली!

नागपुरात ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ची हवा निघाली!

Next
ठळक मुद्देउन्हाच्या तडाख्यात कुठेही अंमलबजावणी नाहीभर उन्हात मजुरांचे शोषण

राजीव सिंह।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रखर उन्हापासून लोकांचा बचाव व्हावा, यासाठी नागपूर महापालिकेने‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’तयार केला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी उद्याने खुली ठेवणे, ठिकठिकाणी प्याऊ लावणे, ग्रीन नेटची व्यवस्था करण्याची घोषणा करण्यात आली. पारा ४५ अंशावर असतानाही हिट अ‍ॅक्शन प्लॅनची हवा निघाल्याचे चित्र आहे. औपचारिकता म्हणून आरोग्य विभागाने महापालिकेच्या रुग्णालयात ग्रीन नेट व प्याऊ ची व्यवस्था केली आहे. परंतु शहरातील प्रमुख मार्गावर प्याऊ वा प्रमुख चौकात ग्रीन नेट लावलेले दिसत नाही.
गुजरातच्या काही शहरातील धर्तीवर नागपुरात वर्ष २०१६ पासून हिट अ‍ॅक्शन प्लॅन राबविण्याला सुरुवात करण्यात आली. पहिल्या वर्षात चौकात ग्रीन नेट लावण्यात आले होते. प्रमुख मार्गावर प्याऊ लावण्यात आले होते.
दुपारी १२ ते ४ या दरम्यान मजुरांकडून काम करून घेण्याला बंदी घालण्यात आली होती. उष्माघातापासून बचाव व्हावा, यासाठी या स्वरूपाच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. सध्या हिट अ‍ॅक्शन प्लॅनच्या नावाखाली शहरातील उद्याने उघडी ठेवण्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही उपाययोजना के लेल्या नाहीत.
हिट अ‍ॅक्शन प्लॅनशी संबंधित महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले की, महापालिकेतर्फे एसटी महामंडळ व महापालिका परिवहन विभागाच्या बसेसला पडदे लावणे, बसस्थानकावर ग्रीन नेट लावणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिका फक्त आवाहन करू शकते. प्लॅनच्या अंमलबजावणीची जबाबदारी सहायक आयुक्तांची आहे. त्यांच्या स्वाक्षरीने सेवाभावी संस्थांना प्याऊ लावणे, उद्यान उघडे ठेवण्याचे पत्र जारी करण्यात आले आहे
अनेक उद्यानांना कुलूप
महापालिकेची ११८ व नासुप्रची ५६ उद्याने दुपारी नागरिकांसाठी उघडी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात पत्र जारी करण्यात आले आहे. परंतु त्यानंतरही अनके उद्याने दुपारी बंद असतात. वाटसरूंना सावलीसाठी शोध घ्यावा लागतो. काही उद्यानात दुपारच्या सुमारास असामाजिक कृत्य घडतात. अनेकदा पोलिसात तक्रार केली. त्यामुळे दुपारच्या सुमारास उद्याने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिके च्या आरोग्य विभागाने दिली.
चौकात ग्रीन नेट लावण्याला आरटीओचा विरोध
हिट अ‍ॅक्शन प्लॅन अंतर्गत अधिक वर्दळीच्या चौकात ग्रीन नेट लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वर्ष २०१६ मध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली. रिझर्व्ह बँकेसह अन्य चौकात ग्रीन नेट लावण्यात आली होती. परंतु अपघाताची शक्यता विचारात घेता आरटीओनी ग्रीन नेट लावण्याला मनाई केली आहे. त्यामुळे मनपाने नेट लावलेल्या नाही. यावेळी अशोक चौकात काही भागात ग्रीन नेट लावण्यात आली. यामुळे दुपारी वाहनचालकांना दिलासा मिळतो. येथे काही जागरुक नागरिक वाटसरूंना पाणी पाजताना दिसतात.
दूर-दूरपर्यंत प्याऊ चा पत्ता नाही
हिट अ‍ॅक्शन प्लॅन अंतर्गत प्रमुख रस्ते, चौक, वस्त्यात प्याऊ लावणे अपेक्षित आहे. यामुळे उन्हात नागरिकांना दिलासा मिळतो. यासाठी महापालिका प्रशासनाने सेवाभावी संस्थांना आवाहन केले आहे. परंतु आवाहनाला प्रतिसाद दिसत नाही. ज्या ठिकाणी दरवर्षी प्याऊ लागत होते तेही यावेळी दिसत नाही. झोन कार्यालये व रुग्णालयात लावण्यात आलेल्या प्याऊं ची नियमित स्वच्छता ठेवली जात नाही. धार्मिक स्थळे तोडण्यात आल्याने यावर्षी प्याऊ दिसत नसल्याचे जाणकारांनी सांगितले. धार्मिक स्थळाच्या ठिकाणी प्याऊ ची व्यवस्था केली जात होती. आता धार्मिक स्थळ हटविल्याने प्याऊ लागलेले नाही.

Web Title: Nagpur 'hit action plan' is failed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.