नागपुरात बनावट औषधांची निर्मिती व विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:22 AM2018-09-27T00:22:08+5:302018-09-27T00:22:57+5:30

अप्रमाणित आयुर्वेदिक औषधांचे बेकायदेशीरीत्या रिपॅकिंग व रिलेबलिंग करून रुग्णांना विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने धाडी टाकून विश्लेषण अहवालाच्या आधारे जरीपटका आणि प्रतापनगर ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

In Nagpur, FIR registered against the manufacturer and seller of counterfeit drugs | नागपुरात बनावट औषधांची निर्मिती व विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल

नागपुरात बनावट औषधांची निर्मिती व विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देअन्न व औषधी प्रशासन विभागाची कारवाई : आयुर्वेदिक औषधांचे बेकायदेशीर रिपॅकिंग व रिलेबलिंग

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : अप्रमाणित आयुर्वेदिक औषधांचे बेकायदेशीरीत्या रिपॅकिंग व रिलेबलिंग करून रुग्णांना विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने धाडी टाकून विश्लेषण अहवालाच्या आधारे जरीपटका आणि प्रतापनगर ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाने प्राप्त माहितीच्या आधारे डॉ. सुरेश कन्हैयालाल पशिने यांचे कामठी रोड, भिलगाव नाका नं.२, एमएचकेएस पेट्रोल पंपाजवळील श्री गायत्री आयुर्वेदिक औषधालय आणि हिंगणा टी-पॉर्इंट, गोदावरी कॉम्प्लेक्स येथील मॉ गायत्री रिटेल, गायत्री आयुर्वेदिक चिकित्सालय तसेच अयोध्यानगर, संत नामदेवनगर, साई मंदिरामागे योगेश राऊत यांच्या घरी धाडी टाकल्या. या धाडीत तिन्ही ठिकाणी प्लास्टिकच्या पाऊचमध्ये प्रत्येकी ३० कॅप्सूल रिपॅक व रिलेबलिंग करून रुग्णांना विक्री करीत असल्याचे आढळून आले. चौकशीअंती या वात रोगासाठी आर्थलजिन कॅप्सूल असल्याचे लक्षात आले. योगेश राऊत यांच्या घरून कॅप्सूल निर्मितीसाठी लागणारी एक कॅप्सूल फिलिंग मशीन, कच्चा औषधी माल, तयार औषधी व रिकाम्या कॅप्सूल, पाऊच सिलिंग मशीन इत्यादी साहित्य आढळले. चौकशी पथकाने या तिन्ही ठिकाणी सापडलेल्या आयुर्वेदिक औषधांचे नमुने विश्लेषणासाठी घेतले आणि उर्र्वरित साठा जप्त केला होता. ही औषधे बनावट व मिथ्याछाप अप्रमाणित असल्याचे विश्लेषण अहवालात नमूद करण्यात आले आहे.
चौकशीदरम्यान डॉ. पशिने यांना विचारणा केली असता त्यांनी ही औषधे महाल येथील प्रथमेश आयुर्वेदिक एजन्सी येथून खरेदी केल्याचे सांगितले. पुढील चौकशीत प्रथमेश आयुर्वेदिक एजन्सीने ही औषधे गोंदिया, तिरोडा येथील आदित्य फार्मास्युटिकल्स यांच्याकडून प्राप्त झाल्याचे सांगितले. पण आदित्य फार्मास्युटिकल्सने या औषधाचे उत्पादन त्यांचे नसल्याचे प्रशासनाला कळविले. या प्रकरणात डॉ. पशिने यांच्याकडे आयुर्वेदिक कॅप्सूलचे रिपॅकिंग व रिलेबलिंग होत असल्याचे व त्यांचे कम्पाऊंडर योगेश राऊत यांच्याकडे आयुर्वेदिक औषधांचे विनापरवाना उत्पादन होत असल्यामुळे औषधे व सौंदर्य प्रशासन कायद्याचे स्पष्ट उल्लंघन होत असल्याचे आढळून आले. त्याअंतर्गत त्यांच्याविरुद्ध औषधे व सौंदर्य प्रशासन कायद्यानुसार जरीपटका व प्रतापनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (औषध) डॉ. राकेश तिरपुडे आणि सहायक आयुक्त (औषध) पी.एन. शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक डॉ. पी.एम. बल्लाळ, नीरज लोहकरे, सतीश चव्हाण, महेश गाडेकर, मोनिका धवड, स्वाती भरडे या पथकाने केली.

Web Title: In Nagpur, FIR registered against the manufacturer and seller of counterfeit drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.