व्यापाऱ्याची रोकड लुटणारे जेरबंद : शानशौकासाठी गुन्हेगारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:13 AM2019-06-15T00:13:09+5:302019-06-15T00:13:47+5:30

स्टील व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून अडीच लाखांची रोकड लुटून नेणाऱ्या तीन अल्पवयीन दरोडेखोरांसह पाच जणांना अटक करण्यात लकडगंज पोलिसांनी यश मिळवले.

Merchandiser's robbery, arrested: Crime for Shanshouk | व्यापाऱ्याची रोकड लुटणारे जेरबंद : शानशौकासाठी गुन्हेगारी

व्यापाऱ्याची रोकड लुटणारे जेरबंद : शानशौकासाठी गुन्हेगारी

googlenewsNext
ठळक मुद्देतीन अल्पवयीन आरोपींचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्टील व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून अडीच लाखांची रोकड लुटून नेणाऱ्या तीन अल्पवयीन दरोडेखोरांसह पाच जणांना अटक करण्यात लकडगंज पोलिसांनी यश मिळवले.
सीताबर्डीच्या महाजन मार्केटमध्ये असलेल्या स्वानंद ट्रेडिंग कंपनीत कामाला असलेल्या जयंत नारायणराव मडावी (वय ३१, रा. पिंपळगाव आर्वी, जि. वर्धा) या पल्सरस्वाराला चाकूचा धाक दाखवून पाच दरोडेखोरांनी २ लाख, ४५ हजार, ५७६ रुपये लुटून नेले होते. गुरुवारी दुपारी ३.३० ला जलाराम मंदिराजवळ गोकुळ भवनसमोर ही घटना घडली होती.
भरदुपारी वर्दळीच्या मार्गावर ही घटना घडल्याने व्यापारी वर्तुळासह पोलिसांतही प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. पोलिसांनी लुटारूंच्या शोधासाठी आजूबाजूच्या सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले. त्यातून धागेदोरे जोडत शनिवारी सकाळी या लुटमारीचा मुख्य सूत्रधार मोहम्मद रिजवान मोहम्मद रफी (वय १८, रा. छोटा लोहारपुरा, गांधीबाग) आणि नियाज गुलाम मुस्तफा (वय १९, राजीव गांधीनगर, यशोधरानगर) या दोघांना तसेच त्यांच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. रिजवान याने आयटीआय केले असून तो एसी (एअर कुल्ड) उपकरण दुरुस्तीचे काम करतो. तर नियाजने बारावीपासून शिक्षण सोडले असून, त्यांचे अल्पवयीन साथीदारही विद्यार्थीच आहेत. ते सर्व शानशौकिन करण्यासाठी गुन्हेगारीकडे वळल्याचे समजते. त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेतील १ लाख, ६९ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा तीन दिवसांचा पीसीआर मिळवण्यात आला. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त राहुल माकणिकर यांच्या मार्गदर्शनाखाली लकडगंजचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या नेतृत्वात लकडगंजच्या पोलीस पथकाने ही कामगिरी बजावली.
पेट्रोल पंपापासून पाठलाग
भरदुपारी वर्दळीच्या ठिकाणावर दरोडा घालण्याची योजना आरोपींनी गुन्हा करण्याच्या काही वेळेपूर्वी एका पेट्रोल पंपावर आखली. जयंताने पल्सरमध्ये पेट्रोल भरल्यानंतर रोकड असलेल्या बॅगमधून काही नोटा काढल्या आणि पेट्रोलचे पैसे दिल्यानंतर त्या पुन्हा बॅगेत कोंबल्या. यावेळी आरोपी रिजवान आणि नियाज बाजूलाच होते. त्याच्या बॅगमध्ये मोठी रोकड असल्याची कल्पना आल्यामुळे लुटण्याचा कट रचला. जयंतचा पाठलाग करून संधी मिळताच रोकड लुटल्याचे या दोघांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते.

Web Title: Merchandiser's robbery, arrested: Crime for Shanshouk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.