मानसिक आजाराच्या रुग्णांना मिळणार अद्ययावत उपचार, संशोधनही होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2023 08:00 AM2023-07-09T08:00:00+5:302023-07-09T08:00:07+5:30

Nagpur News एकाच ठिकाणी अद्ययावत यंत्राचा मदतीने निदान व उपचारासोबतच संशोधन होण्यासाठी ‘मेंटल हेल्थ लॅब टर्न की प्रोजेक्ट’ प्रस्तावित आहे. मनोविकृतीशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण (पीजी) असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही ‘लॅब’ स्थापन करण्याचा प्रयत्न आहे.

Mental illness patients will get the latest treatment, research will also be done! | मानसिक आजाराच्या रुग्णांना मिळणार अद्ययावत उपचार, संशोधनही होणार!

मानसिक आजाराच्या रुग्णांना मिळणार अद्ययावत उपचार, संशोधनही होणार!

googlenewsNext

सुमेध वाघमारे

नागपूर : रोजच्या आयुष्यातील ताणतणावामुळे मानसिक आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी अद्ययावत यंत्राचा मदतीने निदान व उपचारासोबतच संशोधन होण्यासाठी ‘मेंटल हेल्थ लॅब टर्न की प्रोजेक्ट’ प्रस्तावित आहे. मनोविकृतीशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण (पीजी) असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही ‘लॅब’ स्थापन करण्याचा प्रयत्न आहे.

‘मे लॉजिकमॅक्स टेक्नॉलॉजी प्रा.लि. पुणे’ यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला ‘मेंटल हेल्थ लॅब टर्न की प्रोजेक्ट’चा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाची गरज व उपयुक्तता तपासणीसाठी पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. नुकत्याच झालेल्या समितीच्या बैठकीत या सारख्या प्रकल्पाची गरज असल्याचे पुढे आले आहे. या ‘लॅब’मुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास, रुग्णसेवेचा दर्जा वाढविण्यास, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्याचे मनोविकृतीशास्त्र विभागातील शिक्षण व संशोधनास मदत होण्यास तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मनोविकृतीशास्त्र विभागांचे श्रेणीवर्धन होण्यास मदत होणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

- व्यसनाधीनतेपासून ते लैंगिक समस्या, निद्रानाशावर उपचार

‘मेंटल हेल्थ लॅब टर्न की प्रोजेक्ट’मध्ये १२ अद्ययावत यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. यात ‘ॲव्हर्शन थेरपी यंत्र’ याच्या मदतीने दारू, धूम्रपान, ड्रग्ज इत्यादी व्यसनी लोकांवर उपचार, ‘मल्टी बिहेवियर थेरपी यंत्र’च्या मदतीने मानसिकदृष्ट्या लैंगिक समस्यावर उपचार, ‘मेमरी ट्रेकिंग यंत्र’च्या मदतीने वाढते वय, स्मृतिभ्रंश, अल्झायमर, मेंदूला दुखापतीमुळे वाढलेल्या स्मृतिसंबंधातील समस्यांवर तर ‘इलेक्ट्रोस्लीप यंत्र’च्या मदतीने निद्रानाशावर उपचार करण्यात मदत होणार आहे. या शिवाय अनेक मानसिक व न्युरोलॉजिकल विकारांवर यंत्राच्या मदतीने उपचार करणे अधिक सोपे होणार आहे. समितीने या यंत्राचे प्रात्यक्षिक देण्याच्या सूचना संबंधित कंपनीला केल्या आहेत.

-प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प राबवा

ज्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मनोविकृतीशास्त्र विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू आहे, त्यांच्याकडे आवश्यक जागा, पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ आहे, अशा संस्थामध्ये सदरील प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवावे, असेही समितीने म्हटले आहे.

Web Title: Mental illness patients will get the latest treatment, research will also be done!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.