मराठवाडा, विदर्भात मानसोपचार अभ्यासक्रमच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:48 AM2018-08-17T10:48:36+5:302018-08-17T10:58:12+5:30

रोजच्या आयुष्यातील ताणतणावामुळे मानसिक आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र त्या तुलनेत मानसोपचारतज्ज्ञाची संख्या फारच कमी आहे.

Marathwada, Vidharbha does not have any psychotherapy course | मराठवाडा, विदर्भात मानसोपचार अभ्यासक्रमच नाही

मराठवाडा, विदर्भात मानसोपचार अभ्यासक्रमच नाही

Next
ठळक मुद्देतीन लाखामागे एक मानसोपचारतज्ज्ञभारतात केवळ ६ हजार डॉक्टर

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रोजच्या आयुष्यातील ताणतणावामुळे मानसिक आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. २०२० पर्यंत हा आजार वाढून लोकसंख्येच्या तुलनेत पाच टक्के लोकांना गंभीर मानसिक आजार होण्याचा धोका आहे. मात्र त्या तुलनेत मानसोपचारतज्ज्ञाची संख्या फारच कमी आहे. तीन लाख लोकांमागे एक मानसोपचारतज्ज्ञ आहे, असे असताना वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या (डीएमईआर) १७ मधून केवळ दोनच वैद्यकीय महाविद्यालयात मानसोपचार विषयात पदव्युत्तर शिक्षण (पीजी) दिले जात आहे. यातही मराठवाडा, विदर्भातील महाविद्यालयाचा समावेश नाही. राज्यात डॉक्टरांची मोठी कमतरता भासत आहे. ग्रामीण भागात नावालाही मानसोपचार तज्ज्ञ नसल्याचे भीषण चित्र आहे.
जगात दरवर्षी ३० लाख लोक नैराश्येच्या गर्तेत सापडतात. यातील आठ लाख लोक आत्महत्या करतात. भारतात व्यसनाधीनता, परीक्षेतील अपयश, कौटुंबिक कलह, व्यवसायातील अडचणी, पिकांचे नुकसान, कर्जबाजारीपणा, प्रेमभंग, तीव्र नैराश्य अशा अनेक कारणांमुळ मानसिक आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यात २५ ते ४० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. या रुग्णांचा भार केवळ सहा हजार डॉक्टरांवर आहे.
एकट्या नागपूरमध्ये मेडिकल, मेयोच्या ओपीडीत रोज दीडशेहून अधिक रुग्ण तणावाशी निगडित तपासणीसाठी येतात. मनोरुग्णालयात रोजची ओपीडी २०० असते. प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या खाटांची क्षमता ६०० आहे. आज येथे ६५० रुग्ण भरती आहेत. यातही शहरात मोजकेच असलेले मानसोपचारतज्ज्ञ आणि त्यातच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये सामाजिक भीती, यामुळे मानसोपचारतज्ज्ञाकडे जाण्यास कुणी तयार होत नाही. राज्याच्या ग्रामीण भागात तर आजारी पडले, तरी आजारपणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे.

‘डीएमईआर’च्या दोनच महाविद्यालयात अभ्यासक्रम
राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या (डीएमईआर) मुंबई व ठाणे येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तर मुंबईच्या महानगरपालिकेच्या तीन व ठाणे महानगरपालिकेच्या एका महाविद्यालयांमध्ये पीजी अभ्यासक्रम सुरू आहे. धक्कादायक म्हणजे, विदर्भ व मराठवड्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रमच नाही. यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तर याच भागात मानसोपचारतज्ज्ञाची मोठी कमतरता भासत आहे. राज्यात दरवर्षी केवळ ३३ मानसोपचारतज्ज्ञ तयार होत आहेत. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महविद्यालयात (मेडिकल) २००९ मध्ये मानसोपचार विषयात पदव्युत्तर शिक्षण सुरू करण्याचा प्रस्ताव ‘भारतीय आयुर्विज्ञान परिषदे’कडे (एमसीआय) पाठविला होता. परंतु त्यावेळी या विषयाचे प्राध्यापक हे पदच नसल्याने ते बारगळले. २०१४ मध्ये प्राध्यापक व इतरही पदे मिळाली. मात्र, अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्नच झालेला नाही.

अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी याची आवश्यकता
एक प्राध्यापक
एक सहयोगी प्राध्यापक
एक सहायक प्राध्यापक
एक निवासी डॉक्टर
३० खाटांचा वॉर्ड.

मेयो व मनोरुग्णालय मिळून अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) व प्रादेशिक मनोरुग्णलय मिळून हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे. या संदर्भात नुकतेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी बैठक घेऊन यावर चर्चा केली. यात मेयोचे डॉक्टर तर मनोरुग्णालयाचा वॉर्ड असे मिळून अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. याला राज्य शासनाचे आवश्यकता प्रमाणपत्र मिळाले आहे. मात्र अद्यापही दोन्ही रुग्णालयांमध्ये करार झालेला नाही.

Web Title: Marathwada, Vidharbha does not have any psychotherapy course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य