१७ वर्षांपासून नागपुरातील शासकीय रुग्णालये ‘फोल्डेबल लेन्स’च्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 10:19 AM2018-02-16T10:19:49+5:302018-02-16T10:20:28+5:30

२००१ पासून राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये ‘फॅको’ उपकरणाद्वारे बिनटाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेला सुरुवात झाली, परंतु शासनाकडून घडी करता येणारे भिंग (फोल्डेबल लेन्स) उपलब्ध करून दिले जात नाही.

For the last 17 years government hospitals in Nagpur await 'foldable lenses' | १७ वर्षांपासून नागपुरातील शासकीय रुग्णालये ‘फोल्डेबल लेन्स’च्या प्रतिक्षेत

१७ वर्षांपासून नागपुरातील शासकीय रुग्णालये ‘फोल्डेबल लेन्स’च्या प्रतिक्षेत

Next
ठळक मुद्देमोतीबिंदू शस्त्रक्रियेत गरिबांशी भेदभाव

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साधारण २००१ पासून राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये ‘फॅको’ उपकरणाद्वारे बिनटाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेला सुरुवात झाली, परंतु १७ वर्षांचा कालावधी होत असताना शासनाकडून आवश्यक असलेले घडी करता येणारे भिंग (फोल्डेबल लेन्स) उपलब्ध करून दिले जात नाही. दुमडत नसलेले ‘रिजीड लेन्स’ दिले जात असल्याने एक किंवा दोन टाके लागतात. परिणामी, रुग्णालयात जास्त दिवस घालविण्यापासून ते चष्म्याचा वाढलेला नंबर मिळतो. ज्यांच्याकडे पैसा आहे तेच ‘फोल्डेबल लेन्स’ घेऊ शकत असल्याने मोतीबिंदू रुग्णांसोबत हा भेदभाव कधी थांबणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, शासन विकत घेत असलेल्या ‘रिजीड लेन्स’च्या तुलनेत ‘फोल्डेबल लेन्स’ साधारण ४०० रुपयांनी महाग आहे. नुकतेच सुरुवात झालेल्या ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मोहिमेच्या अनुषंगाने तरी गरीब रुग्णांना ‘फोल्डेबल लेन्स’ उपलब्ध होईल, अशी आशा गरीब रुग्ण बाळगून आहेत.
डोळ्यातील नैसर्गिक पारदर्शक भिंग अपारदर्शक झाल्यास त्याला मोतीबिंदू असं म्हणतात. पूर्णपणे पिकलेल्या अवस्थेत तो मोत्यासारखा दिसतो. म्हणून त्याला मोतीबिंदू हे नाव पडलंय. पूर्वी मोतीबिंदू शस्त्रक्रियेत डोळ्यात इंजेक्शन देऊन तो बधिर करून सुमारे १०-१२ मिमी इतका लांब छेद कॉर्नियाच्या परिघावर घेत असत. आतलं भिंग बाहेर काढून डोळ्याची जखम टाके घेऊन शिवून टाकत. या शस्त्रक्रियेनंतर, मस्तक जराही हलवू न देता हॉस्पिटलमध्ये सात दिवस सक्तीची विश्रांती आणि महिनाभर डोक्याला ड्रेसिंग असा कार्यक्रम असायचा. २००१ पासून फॅको उपकरण उपलब्ध झाल्याने ‘फॅकोमात्सिफिकेशन’ पद्धतीने शस्त्रक्रिया होऊ लागल्या. यात कॉर्नियाच्या परिघावर केवळ २ ते ३ मि.मी. इतका लहान छेद घेऊन ‘फोल्डेबल लेन्स’ बसविणे सुरू झाले. छेद लहान असल्याने तो आपोआप बरा होतो. , म्हणून याला बिनटाक्याची शस्त्रक्रियाही म्हटले जाते. परंतु आज १७ वर्षांचा कालावधी होत असतानाही आरोग्य विभागाकडून किंवा राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमा’कडून दुमडत नसलेला जुनाट ‘रिजीड लेन्स’ उपलब्ध करुन दिला जात असल्याने गरीब रुग्णांना गैरसोयीचे होत आहे. यात कॉर्नियाच्या परिघावर ६ ते ७ मि.मी आकाराचा छेद करावा लागत असून एक किंवा दोन टाके लागतात. परिणामी, रुग्णांना जिथे काही तास रुग्णालयांत घालवायचे असतात तिथे दोन दिवस घालवावे लागतात. चष्म्याचा नंबरही वाढत असल्याने त्यांच्या दैनंदिन कष्टाच्या कामकाजात समस्या निर्माण होतात.

Web Title: For the last 17 years government hospitals in Nagpur await 'foldable lenses'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.