ज्वारीचे पॉपकॉर्न अन् चविष्ट ‘मँगो जिंजर’ ; नागपुरात कृषी प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 10:30 AM2018-04-24T10:30:43+5:302018-04-24T10:30:56+5:30

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नागपूर, कृषी विभाग व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रीय शेतमाल विक्री व धान्य महोत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे.

Jowar's Popcorn and 'Mongo Ginger'; Agricultural exhibition in Nagpur | ज्वारीचे पॉपकॉर्न अन् चविष्ट ‘मँगो जिंजर’ ; नागपुरात कृषी प्रदर्शन

ज्वारीचे पॉपकॉर्न अन् चविष्ट ‘मँगो जिंजर’ ; नागपुरात कृषी प्रदर्शन

Next
ठळक मुद्देसेंद्रिय शेतीतील माल थेट ग्राहकांच्या हातीजेवणासोबत खायची हळद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुठलेही केमिकल, फवारणी नाही. सेंद्रीय शेतीतील पिकविलेले धान्य कुठल्याही दलालाच्या माध्यमातून नव्हे तर थेट शेतकऱ्याकडून ग्राहकांच्या हाती पडत आहे ते महाराजबाग रोडवरील कृषी प्रदर्शनात. सेंद्रीय शेतीतील गव्हाच्या मऊ चपात्या, ज्वारीपासून तयार केलेले पॉपकॉर्न अन् आम्लपित्त, कफ, दमा यापासून दिलासा देणारी जेवणासोबत खावयाची हळद खरेदीसाठी प्रदर्शनात नागरिकांची गर्दी होत आहे.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नागपूर, कृषी विभाग व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रीय शेतमाल विक्री व धान्य महोत्सव २०१८ चे आयोजन महाराजबाग मार्गावरील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात करण्यात आले आहे. प्रदर्शनात शेतकऱ्यांनी कुठलेही रासायनिक खते, केमिकल न वापरता सेंद्रीय शेती करून पिकविलेले धान्य थेट ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. निरोगी शरीरासाठी उपयुक्त असलेले हे धान्य खरेदीसाठी नागरिकांची एकच गर्दी प्रदर्शनस्थळी होत आहे.

गहू-ज्वारीच्या खरेदीला प्राधान्य
प्रदर्शनात सेंद्रीय शेतीत पिकविलेले किनोर, केसर, जुना श्रीराम, ६४७८ नावाचे गहू, तुरदाळ, मसाला, हळद, तिखट आदींच्या खरेदीसाठी ग्राहकांची प्रदर्शनात झुंबड होत आहे. शरीरासाठी अपायकारक नसल्यामुळे ग्राहक या सेंद्रीय शेतीतील धान्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहेत. रासायनिक खते वापरून पिकविलेल्या धान्याच्या तुलनेत हे धान्य चविष्ट असल्यामुळे या धान्याला नागरिकांची पसंती मिळत आहे.

ज्वारीचे पॉपकॉर्न
प्रदर्शनात कुही मांढळ येथील शेतीतील ज्वारीपासून तयार केलेले ज्वारीचे चवदार पॉपकॉर्न विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मेहुल भोसले या शेतकऱ्याने ज्वारीच्या पॉपकॉर्नबाबत माहिती देताना सांगितले की, मक्याचे पॉपकॉर्न तयार करतात तशाच मशिनमध्ये ज्वारीचे कणीस टाकायचे. मशिनमध्ये हे कणीस फुटते आणि त्याच्या लाह्या तयार होतात. त्यानंतर या लाह्यामध्ये चटणी, मीठ, मसाला चवीनुसार टाकून पॉपकॉर्न तयार होते.

फळ-फूलझाडांसाठी गांडुळखत, दशपर्णी अर्क
शहरात असंख्य नागरिक आपल्या घरी छोटीशी बाग तयार करतात. यात विविध फळ, फुलझाडे लावतात. ही झाडे वाढवित असताना त्यांना खत टाकणे गरजेचे आहे. त्यासाठी हमलापुरी येथील गंगाधर ठकरेले यांनी गांडुळखत तयार केले आहे. फक्त २० रुपये किलो दराने हे गांडुळखत विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर सीताफळ, कडुलिंब, पपई, रुई, गुळवेल, एरंडेलच्या पानापासून तयार केलेले दशपर्णी अर्क पिपरीया रामटेक येथील शेतकरी शेखर खंडाते यांनी उपलब्ध करून दिले आहे. यामुळे फळ, फूलझाडांना कीड लागत नसल्याचे त्यांनी सांगितले.

इडली, ढोकळ्याचे इन्स्टंट मिक्स
प्रदर्शनात इन्स्टंट मिक्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात खमंग ढोकळा, इडली, अप्पे, डोसा, चकली, लहान मुलांसाठी इन्स्टंट मिक्स पावडर उपलब्ध करून दिले आहे. चवदार, खमंग असल्यामुळे हे इन्स्टंट मिक्स खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याचे स्मिता घाटोळ यांनी सांगितले.

जेवणासोबत खायची ‘मँगो जिंजर’
आम्लपित्त, कफ आणि दमा असलेल्यांसाठी प्रदर्शनात ‘मँगो जिंजर’ ही कच्ची हळद उपलब्ध करून देण्यात आली आहे. समुद्रपूर, पवनगाव येथील शेतकरी ब्रह्मानंद पांगुळ यांनी या हळदबाबत माहिती देताना सांगितले की, ही हळद लोणचे, सलाद, भाजीत टाकल्यास तोंडाला चव येते. जेवण करताना ही कच्ची हळद खाताही येऊ शकते. निरोगी शरीरासाठी ही हळद उपयुक्त असल्याची माहिती त्यांनी दिली.

किरण टरबुजाला मागणी
सातनवरी येथील सहारा शेतकरी समूहाचे रोशन माथुरकर यांनी लंबुळक्या आकाराचे किरण जातीचे टरबूज प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. हे लाल आणि गोड असलेले टरबूज खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. हे टरबूज पिकविण्यासाठी सेंद्रीय खत आणि गोमुत्राचा वापर केल्याची माहिती माथुरकर यांनी दिली.

Web Title: Jowar's Popcorn and 'Mongo Ginger'; Agricultural exhibition in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती