नागपुरातील ‘स्लम सॉकर’च्या मुलांचा जपानी कोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:20 AM2019-04-09T11:20:07+5:302019-04-09T11:22:22+5:30

उगवत्या सूर्याच्या देशातून आलेला एक तरुण सध्या नागपुरातील स्लम वस्तीच्या मुलांना कोचिंग करीत आहे.

Japanese coach of 'Slum Soccer' kids in Nagpur | नागपुरातील ‘स्लम सॉकर’च्या मुलांचा जपानी कोच

नागपुरातील ‘स्लम सॉकर’च्या मुलांचा जपानी कोच

Next
ठळक मुद्दे२३ वर्षांचा ‘कोईची’ शिकवितो फुटबॉलचे तंत्र विजय बारसे यांचे कार्य विश्वस्तरावर

अंकिता देशकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उगवत्या सूर्याच्या देशातून आलेला एक तरुण सध्या नागपुरातील स्लम वस्तीच्या मुलांना कोचिंग करीत आहे. होय, जपानचा हा तरुण म्हणजे कोईची होशिशिन होय. गेल्या काही महिन्यांपासून हा तरुण स्लम सॉकरचे प्रणेते विजय बारसे यांच्या संस्थेशी जुळला असून, झोपडपट्टीच्या मुलांशी एकरूप होउन त्यांना फुटबॉलचे तंत्र शिकवतो आहे. त्याच्या मार्गदर्शनात ही मुले पुढे होणाऱ्या स्लम सॉकर वर्ल्ड कपचे धडे घेत आहेत.
जपानच्या चिबा प्रीफेक्चर येथे राहणारा कोईची हा तेथे फुटबॉलचा व्यावसायिक खेळाडू आहे. २३ वर्षांचा कोईची वयाच्या सहाव्या वर्षांपासून फुटबॉल खेळत आहे. सध्या तो पदवीचा विद्यार्थी असून, ‘स्पोर्ट्स सायकॉलॉजी’अंतर्गत ‘खेळाच्या माध्यमातून होत असलेला आंतरराष्ट्रीय विकास’ या विषयावर वैयक्तिकरीत्या अभ्यास करीत आहे. जपानच्या शिक्षण, संस्कृती, क्रीडा, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे तरुणांना विदेशात शिक्षण घेण्यासाठी टोबिटॅट स्कॉलरशीप प्रदान केली जाते. कोईची हा सुद्धा ही स्कॉलरशीप प्राप्त करून नागपूरला आला आहे. तो नागपूरच्या स्लम सॉकरशी जुळला कसा, हा सुद्धा प्रवासही अनोखा आहे. २०१७ ला ओस्लो, नॉर्वे येथे झालेल्या ‘होमलेस वर्ल्ड कप’मध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी विजय बारसे यांच्या स्लम सॉकरची टीम या स्पर्धेत सहभागी होती. तेव्हाच बारसे आणि कोईची यांची भेट झाली आणि २०१८ ला स्कॉलरशीप मिळताच कोईचीने नागपूर गाठले.
नागपूरच्या मुलांना सॉकरचे धडे देण्याच्या अनुभवाबाबत विचारले असता, हा विलक्षण अनुभव असल्याची भावना त्याने मांडली. ‘मी या मुलांना फुटबॉल खेळाचे तंत्र शिकवितो. ही मुले खेळायला येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मनस्वी आनंद असतो. या मुलांच्या घरी प्रचंड समस्या असल्याचे कुणी मला सांगतो. पण मैदानात आल्यावर या समस्या विसरून ते मनमुराद खेळत असतात. खेळामुळे होणारा हा बदल मला भावनिक करून जातो’, असे तो सांगतो. फुटबॉल हे त्यांच्या मनावरचा ताण कमी करणारे तंत्र आहे. विजय बारसे हे अभावग्रस्त मुलांना चांगले आयुष्य देण्याचे कार्य करीत आहेत आणि माझ्या संशोधनाचा विषयही तोच असल्याने मी ‘स्लम सॉकर’ची निवड के ल्याचे कोईची म्हणाला. २०१९ ला व्हेल्सच्या कार्डिफ शहरात होणाºया होमलेस फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये या मुलांसोबत सहभागी होण्याची भावना त्याने व्यक्त केली.
कोईची याने यावेळी त्याचा कंबोडिया येथील अनुभव सांगितला. तो यापूर्वी कंबोडियामध्ये जपानी व इंग्लिश भाषा शिकवायला गेला होता. ‘कंबोडिया हा अभावग्रस्त आहे, पण त्या मुलांमध्ये टॅलेंटची कमी नाही. संधी मिळाल्यास ती मुले उंच शिखर गाठू शकतात. आनंद हा पैशाने मोजता येत नाही’, असे तो सांगतो. प्रत्येकामध्ये काही ना काही दडलेले असते ज्यामध्ये त्याला १०० टक्के आनंद प्राप्त होतो. ती संधी त्याला मिळणे आवश्यक आहे.
जपानला परत गेल्यावर पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एनजीओ स्थापन करून अशाच अभावग्रस्त मुलांसाठी आणि समस्या असलेल्या लोकांसाठी काम करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.

कोईचीला हिंदी शिकायला सांगितले
बारसे स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे यांनी यावेळी कोईची याच्या कामाचे भरभरून कौतुक केले. कोईची सकाळच्या वेळी १६ व त्यावरच्या मुलांना शिकवितो. तो त्यांना फुटबॉल खेळातील बारीकसारीक तंत्राबाबत फिल्डवर मार्गदर्शन करतो. संध्याकाळी तो दिवसभर काम करणाºया या मुलांसोबत एकरूप होऊन आनंदाचे क्षण घालवतो. कोईची याला हिंदी शिकण्याची व या मुलांनाही प्राथमिक जपानी भाषा शिकविण्यास सांगितले असून तोही याबाबत प्रयत्न करीत असल्याचे बारसे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Japanese coach of 'Slum Soccer' kids in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.