इनोव्हाची उभ्या ऑटोरिक्षाला जोरदार धडक; अपघातात मेयोचे पाच डॉक्टर बचावले
By सुमेध वाघमार | Published: November 25, 2023 12:35 PM2023-11-25T12:35:11+5:302023-11-25T12:42:12+5:30
दिघोरी नाक्यावरील घटना, चार शाळकरी विद्यार्थी जखमी
नागपूर : उमेरड रोडवरील दिघोरी टोल नाक्यावर शनिवारी (दि. २५) सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान झालेल्या अपघातात मेयोचे पाच डॉक्टर बचावले. या अपघातात शाळेतील चार विद्यार्थी जखमी झाल्याचे समजते.
प्राप्त माहितीनुसार, केंद्र शासनाच्या अत्यंत महत्त्वकांशी ‘आयुष्यमान भव’ मोहिमेंतर्गत भिवापूर येथे शनिवारी सकाळी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) सात वरीष्ठ निवासी डॉक्टरांची ड्युटी लावण्यात आली. ने-आण करण्यासाठी सिव्हिल सर्जन कार्यालयातून दोन वाहनाची व्यवस्था करण्यात आली.
इनोव्हा या वाहनात पाच वरीष्ठ निवासी डॉक्टर तर इंडिका वाहनात चार महिला निवासी डॉक्टर बसले. इनोव्हा वाहन उमरेड रोडवरील दिघोरी टोल नाक्यावर आले असताना चालकाने उभ्या ऑटोरिक्षाला जोरदार धडक दिली. यामुळे ऑटोरिक्षा उलटली. डॉक्टरही एकमेकांवर आदळले. त्याचवेळी मागून येत असलेल्या टिप्परने ब्रेक लावल्याने अनर्थ टळला.
इनोव्हामधील पाचही डॉक्टर बचावले. परंतु ऑटो उलटल्याने त्यातील शाळेतील चार विद्यार्थी जखमी झाले. या घटनेने आजूबाजूचे लोक धावून आले. त्यांनी इनोव्हा चालकाला मारहाण केली. डॉक्टरांच्या अंगावरही लोक धावून गेले. डॉक्टर असल्याचे सांगत जखमी विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार दिले. परंतु लोकांमध्ये वाढता संताप पाहता पाचही डॉक्टरांनी तिथून पळ काढत एसटीने नागपूर गाठले.