हॅलो, विश यू व्हेरी हॅपी बर्थ डे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:37 PM2018-03-06T13:37:44+5:302018-03-06T13:38:01+5:30

नागपुरातील अजय मनोहर मुंजे हे एका अफलातून वल्लीचं नाव आहे. त्यांचं व्यसन हे की जी व्यक्ती त्यांच्या संपर्कात येईल, किंवा ज्या व्यक्तीशी त्यांची ओळख होईल, त्यांच्या वाढदिवसाची तारीख विचारायची, त्याची नोंदवहीत नोंद करून ठेवायची आणि त्यांना फोन करीत शुभेच्छा द्यायच्या.

Hello, Wish You're Happy Birthday ... | हॅलो, विश यू व्हेरी हॅपी बर्थ डे...

हॅलो, विश यू व्हेरी हॅपी बर्थ डे...

googlenewsNext
ठळक मुद्देअडीच हजार जणांना देतात वाढदिवसाच्या शुभेच्छा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: इतरांच्या आनंदात आनंद मानण्याचा धर्म घेऊनच काही माणसं जन्माला आलेली असतात. संपर्कात येईल त्यांच्या आयुष्यात आनंद पेरण्याचं व्यसन त्यांना जडलेलं असतं... अशी माणसं याआधी काय, आज काय किंवा उद्या काय काळ कोणताही असो तशी संख्येने कायम कमी आणि दुर्मिळ असतात. पण असतात मात्र नक्की. आणि अशा माणसांचा आपल्या अवतीभवतीचा वावर आपलं जगणं समृद्ध करून टाकतात.
नागपुरातील अजय मनोहर मुंजे हे अशाच एका अफलातून वल्लीचं नाव आहे. त्यांचं व्यसन हे की जी व्यक्ती त्यांच्या संपर्कात येईल, किंवा ज्या व्यक्तीशी त्यांची ओळख होईल, त्यांच्या वाढदिवसाची तारीख विचारायची, त्याची नोंदवहीत नोंद करून ठेवायची आणि त्यांना फोन करीत शुभेच्छा द्यायच्या. कोणी कधी प्रवासात भेटतं, ओळख होते, किंवा समारंभांमध्ये नाती जुळून जातात, जागोजागच्या आॅफिसमधले सहकारी-  मुंजे त्या व्यक्तीची जन्मतारीख विचारतात, त्याची आपल्या डायरीत त्या महिन्याच्या पानावर नोंद करतात. बरं त्या व्यक्तीची जन्मतारीख विचारून थांबत नाहीत, त्याच्या अख्ख्या कुटुंबीयांच्या जन्मतारखा, त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीख अशी सारी माहिती हा माणूस आपल्या डायरीत नोंदवून ठेवतो. नुसतं नोंदवून मोकळा होत नाही, तर त्या त्या दिवशी त्या त्या व्यक्तींना ते आवर्जून फोन करतात, अन शुभेच्छा देतात...
एखादी व्यक्ती कितीही स्थितप्रज्ञतेचा आव आणणारी असली, तरी वाढदिवसाला शुभेच्छांचा फोन आला की ती मनातून सुखावते, आनंदी होते. कारण प्रत्येकासाठी स्वत:चा वाढदिवस ही अत्यंत जिव्हाळ््याची बाब असते. अजयभाऊ नेमका हाच आनंद अनेकांच्या जीवनात गेली कित्येक वर्षांपासून पेरत आहेत. त्यांच्या डायरीमध्ये अशा सुमारे अडीच हजारांच्या वर लोकांच्या वाढदिवसांच्या तारखांची नोंद आहे. इथे आप्तेष्टांच्या, नातेवाईकांच्या, मित्र-मंडळींच्याच तारखा लक्षात ठेवताना पुरेवाट होते, त्या पाशर््वभूमीवर हा माणूस खूप मोठा आणि अफलातून वाटत राहतो. एखादं व्रत स्वीकारल्यासारखं ते असे वाढदिवसाचे फोन अव्याहतपणे करीत आहेत. कधी कधी तर एकेका दिवशी आठ-नऊ फोन करायचे असतात, तरीही ते न कंटाळता नेमाने फोन करतात. प्रत्येक पानावर त्यांनी असा अनेकांचा आनंद पेरून ठेवला आहे. सकाळी उठलं की पहिले प्रथम डायरी उघडून त्या दिवशीच्या वाढदिवसाचं पान ते उघडून ठेवतात. १ जुलैला तर एकूण ३७ जणांचे वाढदिवस येतात. आणि विशेष म्हणजे अजयभाऊ त्या साऱ्यांना फोन करून शुभेच्छा देतात. त्यामागे आजकाल मेन्टेन ठेवतात तसल्या कुठल्या ‘पीआर’ची भावना नसते. काही साधून घेण्याचा मतलबी विचारही त्यामागे नसतो. त्यात असतं ते केवळ निस्पृहपण...
ज्यांचा इमोशनल कोशंट बेताचा, सुमार आहे, अशी माणसं हे सारं हसणेवारी नेतात. ‘‘अहो व्हॉट्सपचा जमाना आहे, सरळ मॅसेज पाठवून द्यावा. आपल्या खिशातले उगाच पैसे कशाला खर्च करता’’... वगैरे वगैरे शहाजोगी सल्लेही अजयभाऊंना मिळतात. पण ते आपल्या निश्चयापासून ढळत नाहीत. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर समोरच्या व्यक्तीला होणारा आनंद हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आणि त्यांना अपार आनंद देणारा असतो.
मुंजे हल्लीच इरिगेशनमधील डेप्युटी एिक्झक्युटिव्ह इंजिनीअर या पदावरून निवृत्त झाले आहेत. पण या सरळ-साध्या माणसाच्या वागण्या-बोलण्यात कुठेही आॅफिसरकी थाट नाही, की पदामुळे आलेल्या अहंकाराचा दर्प नाही. या ‘बर्थ-डे मॅन’चा हा अनोखा छंद ते नोकरीत असल्यापासूनचा आहे. नोकरीनिमित्त त्यांचे विदर्भातल्या अनेक गावांमध्ये वास्तव्य झाले आहे. कवियत्री अनुपमा मुंजे ही त्यांची सहचारिणीही त्यांना साजेशीच आहे. हे जोडपंच मुळात अत्यंत सरळ-साधं अन विलक्षण प्रेम करणारं आहे. बरं आपण करीत असलेल्या या गोष्टींचा समोरच्यावर भार येऊ नये याचीही ही दोघं काळजी घेतात. पण होतं असं कधी कधी की इतकं टोकाचं चांगुलपण समजून घेण्याची, ते पचवण्याची कुवत प्रत्येकातच असते असं नाही. त्यामुळे काटे नसलेली फुलं खूप सहजतेने खुडली जातात. भुसभुशीत जमीन लगेच उखरली जाते. हळव्या-ओल्या माणसांना फार लवकर गृहीत धरलं जातं. पण त्याचा खेद-खंत न बाळगता प्रेम, आनंद वाटणं हे जणु या दाम्पत्यानं अंगिकारलेलं व्रत असल्यासारखं ते निभवतात. मग ते परके असोत, आपले असोत, शेजारी असोत... इतकंच काय, यांच्या घरी काम करणार्या मुलींनाही ही दोघं पोटच्या मुलींसारखं वागवतात, जवळ जेवायला घेऊन बसतात, त्यांच्या मुलांचे वाढदिवस त्यांच्या घरी जाऊन साजरे करतात. त्या मुलांना कपडे घेऊन देतात. एखाद्याच्या दु:खात मिसळणं तसं सोपं असतं, पण इतरांच्या आनंदात मनापासून आनंद मानायला आभाळाएवढं मन असावं लागतं. एखाद्यासाठी आनंदी होण्याचं नाटक वठवता येत नाही. त्या आनंदाचा उगम आतूनच असावा लागतो. अशा मनांमध्ये असूया, ईर्ष्येला स्थान नसते. म्हणूनच की काय या दाम्पत्याचे आनंदी चेहरे सदैव समाधानाने भरलेले असतात! आयुष्यात समस्या, दु:ख प्रत्येकाच्याच वाट्याला येतं, ही दोघंही त्याला अपवाद नाहीत, मात्र आपल्या वाट्याला आलेल्या वैषम्याच्या भावना एखाद्या पुरचुंडीत बांधून ठेवत ही माणसं इतरांसाठी मात्र आनंदाची कुपी सदोदित उघडी ठेवतात.

Web Title: Hello, Wish You're Happy Birthday ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.