नागपुरात पासपोर्टसाठी अर्जदारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 09:56 AM2019-07-18T09:56:13+5:302019-07-18T10:04:24+5:30

विदेश मंत्रालयाच्या पासपोर्ट प्रक्रियेसाठी असलेल्या अधिकृत वेबसाईटच्या नावाशी मिळतेजुळत्या अनेक वेबसाईट गुगलवर उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांची दरदिवशी फसवणूक होत आहे.

The fraud of applicants for passports in Nagpur | नागपुरात पासपोर्टसाठी अर्जदारांची फसवणूक

नागपुरात पासपोर्टसाठी अर्जदारांची फसवणूक

Next
ठळक मुद्देबोगस वेबसाईटचा बसतोय फटका दुप्पट, तिप्पट शुल्क वसुलीशासनाची ऑनलाईन वेबसाईट अधिकृत

मोरेश्वर मानापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वच क्षेत्रात बोगस वेबसाईटचा सुळसुळाट झाला असून त्यावर नियंत्रण आणण्यात शासनाला अपयश आले आहे. अशा वेबसाईटचा ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे. अशातच विदेश मंत्रालयाच्या पासपोर्ट प्रक्रियेसाठी असलेल्या अधिकृत वेबसाईटच्या नावाशी मिळतेजुळत्या अनेक वेबसाईट गुगलवर उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांची दरदिवशी फसवणूक होत आहे. या बोगस वेबसाईटपासून अर्जदारांना सावध राहण्याचे आवाहन पासपोर्ट विभागाने केले आहे. शासनाची www.passportindia.gov.in अधिकृत वेबसाईट असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
केंद्रीय विदेशी मंत्रालयातर्फे पासपोर्ट विभागाचे संचालन करण्यात येते. त्याकरिता मंत्रालयाने अधिकृत वेबसाईट जारी केले आहे. त्यावर ऑनलाईन अर्ज भरण्यापासून ते पासपोर्ट घरपोच प्राप्त होण्याची प्रक्रिया सरळसोपी आहे. नवीन, नूतनीकरण आणि तात्काळ आदी पासपोर्टसाठी शासनाने शुल्क निर्धारित केले आहे. नवीनकरिता १५०० आणि तात्काळसाठी ३५०० रुपये शुल्क आहे. अर्जदार अर्ज भरण्यासाठी वेबसाईटवर जातो तेव्हा त्याला शासनाच्या वेबसाईटसारखी अनेक बोगस वेबसाईट सर्वात वर दिसून येतात. त्यातच अर्जदार फसतो. त्यावर नवीन पासपोर्टसाठी ४ ते ५ हजार आणि तात्काळसाठी ६ ते ७ हजार रुपये अर्थात शासनाच्या निर्धारित शुल्कापेक्षा दुप्पट आणि तिप्पट रक्कम बँकेच्या माध्यमातून भरतो. पुढे हे अर्ज बोगस वेबसाईटवरून अधिकृत वेबसाईटवर ट्रान्सफर केले जातात. अर्जदाराला शासनाच्या अधिकृत केंद्रात कागदपत्रे तपासणीसाठी केवळ अपॉर्इंटमेंट दिली जाते. पण त्याला लॉगईन आयडी सर्च करता येत नाही. त्याचवेळी अर्जदाराला फसल्याचे लक्षात येते. या साईटचा शोध घेतल्यानंतर अर्जदाराला ठोस काहीही मिळत नाही. या संदर्भात केंद्रीय विदेश मंत्रालयाने बोगस वेबसाईटची गुगलकडे तक्रार केली आहे. बोगस वेबसाईट काढून टाकण्यास सांगितले आहे. कारवाईनंतर त्या साईट काही दिवस दिसत नाहीत. पण पुढे पुन्हा सर्वात वर झळकत असतात. त्यामुळे अर्जदाराने जागरूक राहून शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्जप्रक्रिया करावी, असे पासपोर्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

लोकांनी बोगस वेबसाईटचा उपयोग करू नये
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून पासपोर्टकरिता अर्ज भरण्यासाठी बोगस वेबसाईट वाढल्या आहेत. त्यांची नावे शासनाच्या अधिकृत वेबसाईटशी मिळतीजुळती आहेत. जागरूकतेअभावी लोक फसतात. या वेबसाईटवर अर्जदाराला केवळ अपॉर्इंटमेंट मिळते. लॉगईन आयडी चेक करता येत नाही. अर्जदारांकडून दुप्पट, तिप्पट शुल्क आकारण्यात येत आहे. यामुळे लोकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. लोकांनी पासपोर्ट प्रक्रियेसाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटचा उपयोग करावा.
- सी.एल. गौतम,
प्रादेशिक अधिकारी,
प्रादेशिक पासपोर्ट विभाग.


अशा आहेत बोगस वेबसाईट

www.applypassport.org, 
www.online-passportindia.com, 
www.passport.india.org, 
www.onlinepassport.org

Web Title: The fraud of applicants for passports in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.