Five crore for medical: Guardian Minister Bavankule's assurance | मेडिकलसाठी पाच कोटी : पालकमंत्री बावनकुळे यांची ग्वाही

ठळक मुद्दे २० व्हेंटिलेटरसह आवश्यक उपकरणांची होणार खरेदी

आॅनलाईन लोकमत
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) २० व्हेंटिलेटरसह नेत्ररोग विभागातील उपकरण व इतरही आवश्यक उपकरणांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
कामठीत १६ व १७ डिसेंबर रोजी झालेल्या महाआरोग्य शिबिरात सहभागी रुग्णांवर मेडिकलमध्ये आवश्यक औषधोपचार व शस्त्रक्रिया होत आहे. बुधवारी डोळ्यांची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची पालकमंत्री बावनकुळे यांनी भेट घेऊन आस्थेने चौकशी केली. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व इतर विभाग प्रमुखांशी झालेल्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली.
कामठीच्या महाआरोग्य शिबिरात ६०० रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला आहे. या सर्व शस्त्रक्रिया क्रमाक्रमाने मेडिकलच्या नेत्ररोग विभागात होणार आहे. या शिवाय शस्त्रक्रियेनंतर डोळ्यांची तपासणी व नंबरचे चष्मे वाटपाचे शिबिरही कामठीत आयोजित करण्यात येणार आहे. मेडिकलमध्ये शस्त्रक्रियेच्या दरम्यान लागणारे सर्व साहित्य, औषध, जेवण व निवास व्यवस्थेची जबाबदारी मेडिकल प्रशासनाने घेतली आहे. या सर्व स्थितीचे अवलोकन पालकमंत्री बावनकुळे यांनी केले. त्यांनी घेतलेल्या बैठकीत अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी व्हेंटिलेटर, नेत्ररोग विभागात आवश्यक असलेले उपकरण व इतरही विभागाच्या उपकरणाच्या खरेदीचा मुद्दा उपस्थित केला. यावर पालकमंत्री बावनकुळे यांनी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची ग्वाही दिली.