नागपूर जिल्ह्यातील घोटीच्या जंगलात वणवा : वाघांसह इतर वन्यजीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 11:41 PM2019-04-03T23:41:17+5:302019-04-03T23:42:19+5:30

वन विकास महामंडळाच्या पवनी वनपरिक्षेत्रांतर्गत घोटी (ता. रामटेक) परिसरातील जंगलाला वणवा लागला आहे. हा वणवा बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास लागल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, रात्रीपर्यंत तो विझविण्यासाठी वन विभागाकडून कोणत्याही हालचाली करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे हा वणवा नजीकच्या बांबूच्या वनापर्यंत पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, वणव्यामुळे या जंगलातील वाघांसह इतर वन्यजीव धोक्यात आले आहेत.

Fire in the forest of Ghoti in Nagpur district: Other wildlife hazards along with tigers | नागपूर जिल्ह्यातील घोटीच्या जंगलात वणवा : वाघांसह इतर वन्यजीव धोक्यात

नागपूर जिल्ह्यातील घोटीच्या जंगलात वणवा : वाघांसह इतर वन्यजीव धोक्यात

Next
ठळक मुद्देआग बांबूच्या वनात पसरण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (हिवराबाजार) : वन विकास महामंडळाच्या पवनी वनपरिक्षेत्रांतर्गत घोटी (ता. रामटेक) परिसरातील जंगलाला वणवा लागला आहे. हा वणवा बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास लागल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, रात्रीपर्यंत तो विझविण्यासाठी वन विभागाकडून कोणत्याही हालचाली करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे हा वणवा नजीकच्या बांबूच्या वनापर्यंत पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, वणव्यामुळे या जंगलातील वाघांसह इतर वन्यजीव धोक्यात आले आहेत.
हा वणवा वन विकास महामंडळाच्या घोटी परिसरातील कूप क्रमांक - ४३० मध्ये लागली आहे. या कूपमध्ये मोठ्या प्रमाणात सागवान असून, सुरुवातीच्या भागात हा वणवा लागला. वेळीच नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात न आल्याने वणवा शेजारच्या कूप क्रमांक ४२४ आणि ४२५ पर्यंत पोहोचला. त्या दोन्ही कूपमध्ये आडजात वृक्ष आहेत. शेजारी कूप क्रमांक ४२९ असून, त्यात मोठ्या प्रमाणात बांबू आहेत. आग बांबूच्या वनापर्यंत पोहोचल्यास ती आटोक्यात आणणे अवघड जाणार असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.
या जंगलात वाघ, बिबट, सांबर, चितळ, नीलगाय, रानडुक्कर यासह इतर वन्यप्राणी आणि मोर व अन्य पक्षी वास्तव्याला आहेत. वणव्यामुळे येथील वन्यजीव व सरपटणारे पाणी धोक्यात आले असून, ते आगीच्या भीती व उष्णतेमुळे नागरी वस्त्यांकडे येण्याची शक्यताही बळावली आहे. आगीत कूप क्रमांक - ४३० मधील सागवानाची झाडे जळाल्याने मोठे नुकसानही झाले आहे. वणव्याने बांबूचे वन कवेत घेतल्यास नुकसान वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सध्या जंगलात मोट्या प्रमाणात झाडांची पाने पडलेली असून, ती सुकली असल्याने आग पसरण्याचा वेग थोडा अधिक असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा वणवा शमविण्यासाठी वन विभागाने रात्रीपर्यंत कुठलेही प्रयत्न केले नव्हते, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
आग लावल्याची शक्यता
या जंगलात तेंदूपत्ता व मोहफूल झाडे आहेत. त्यामुळे तेंदूपत्ता संकलन कंत्राटदार व त्याच्या कामगारांचा जंगलात राबता असतो. तेंदूपत्ता कामगार सहसा सकाळी जंगलात जातात. त्यांच्यापैकी कुणीतरी पेटती बिडी अथवा सिगारेट कचऱ्यात फेकल्याने वणवा लागला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तेंदूपत्ता झाडे छाटणीची कामे बरेच दिवस चालतात. मात्र, या जंगलात ही कामे कंत्राटदाराने केवळ तीन दिवस केलीत. नवीन पालवीसाठी झाडे छाटली जातात. या छाटणीला पर्याय म्हणून वणवा लावला असावा, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.
टांगल्याच्या जंगलातही आग
हिवराबाजार नजीकच्या असलेल्या टांगला (ता. रामटेक) परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असून, तिथेही वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. घोटीच्या जंगलातील वणव्याबाबत माहिती देण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधला असता, त्याने सांगितले की, टांगल्याच्या जंगलातही वणवा लागला आहे. तो शांत करण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी तिथे व्यस्त आहेत. घोटीच्या जंगलातील वणवा विझविण्यासाठी प्रयत्न करण्यात न आल्याने तो अंदाजे सात कि.मी.च्या परिसरात पसरल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Fire in the forest of Ghoti in Nagpur district: Other wildlife hazards along with tigers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.