FDA's campaign to prevent milk adulteration in Nagpur division | नागपूर विभागात दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी ‘एफडीए’ची मोहीम
नागपूर विभागात दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी ‘एफडीए’ची मोहीम

ठळक मुद्देदूध संकलन केंद्रावर आॅन दी स्पॉट तपासणी नागपूर विभागात २३ कारवाया

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुधामध्ये भेसळ करून विक्री होत असल्याचे प्रकार अहमदनगर, पुणे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळले आहे. पौष्टिक दुधाच्या नावावर लोकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. दुधामध्ये भेसळ होत असल्याचा प्रकार थांबविण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मोहीम राबविली आहे. नागपूर विभागात २३ ठिकाणी दूध संकलन केंद्रावर एफडीएच्या पथकाने तपासणी कारवाया केल्या आहे.
नागपूर विभागात रोज लाखो लिटर दुधाची विक्री होते. भंडारा, नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक दुधाची निर्मिती होत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने डेअरीत येणाऱ्या दुधाची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन दिवसात नागपूर विभागात २३ डेअरीतील दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागाचे उपायुक्त शशिकांत केकरे यांनी सांगितले की, दुधातील भेसळीला आळा घालण्यासाठी त्यांची डेअरीत तपासणी करण्यात येत आहे. यासाठी अन्न तपासणाऱ्या विभागाचीही मदती घेण्यात येत आहे. नागपुरातील सात, भंडारा येथील चार, वर्ध्यातील एक तर गडचिरोली जिल्ह्यातील पाच डेअरीमधील दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्याच प्रमाणे भंडारा येथील सहा डेअरींमधील दुधाचे जागीच नमुने तपासण्यात आले. यात एकाही ठिकाणीचे नमुने अयोग्य आढळले नाही. उर्वरित १७ नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. त्यांचा अहवाल आल्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 


Web Title: FDA's campaign to prevent milk adulteration in Nagpur division
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.