पर्यावरण म्हणजे केवळ वाघ नव्हे

By admin | Published: December 28, 2016 03:29 AM2016-12-28T03:29:00+5:302016-12-28T03:29:00+5:30

सध्याच्या काळात सर्वत्र वाघाला फार महत्त्व दिले जाते. वाघाचे संरक्षण म्हणजेच वन व पर्यावरणाचे संरक्षण, असा प्रचार केला जात आहे.

Environment is not just tiger | पर्यावरण म्हणजे केवळ वाघ नव्हे

पर्यावरण म्हणजे केवळ वाघ नव्हे

Next

मारुती चितमपल्ली : अनिल पिंपळापुरे यांना वन्यजीव संवर्धन पुरस्कार प्रदान
नागपूर : सध्याच्या काळात सर्वत्र वाघाला फार महत्त्व दिले जाते. वाघाचे संरक्षण म्हणजेच वन व पर्यावरणाचे संरक्षण, असा प्रचार केला जात आहे. मात्र जंगलामध्ये अनेक प्रकारच्या प्राणी, पक्ष्यांचा अधिवास असतो. आजच्या परिस्थितीत वनांमधील विविध प्राणी, पक्षी आणि वनस्पतींच्याही संवर्धनाला तेवढेच महत्त्व देणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ वाघाचे संरक्षण म्हणजे पर्यावरणाचे संवर्धन नव्हे, असे परखड मत आणि त्याची खंत वनमहर्षी मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केली.
वनराई फाऊंडेशनच्यावतीने पक्षितज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे अभ्यासक डॉ. अनिल पिंपळापुरे यांना स्व. लक्ष्मीकांत हरकरे स्मृती वन्यजीव संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. धनवटे सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात सर्वाच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, आमदार मितेश भांगडिया, वनराईचे अध्यक्ष अनंत घारड, गिरीश गांधी, डॉ. पिनाक दंदे, डॉ. गोपाळ ठोसर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. मारुती चितमपल्ली यांनी वेद, पुराणातील दाखले देत पक्षी, प्राण्यांविषयी असलेले मिथक सांगत पक्षिशास्त्राच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाची गरज व्यक्त केली.
याप्रसंगी माजी न्या. विकास सिरपूरकर यांनीही पर्यावरण ऱ्हासावर चिंता व्यक्त केली. लहानपणी अवतीभवती दिसणाऱ्या चिमण्या आज दिसेनाशा झाल्या. श्राद्ध घालायच्या वेळीही कावळे शोधत फिरावे लागते. पक्षी, प्राणी व माणसांचा एवढा घनिष्ठ संबंध होता की, आमचे साहित्यविश्व त्या कथा, कादंबऱ्यांनी व्यापून गेले आहे. मात्र शहरीकरण आणि आधुनिकीकरणाच्या पिपासेपायी सर्व नष्ट होत आहे. आम्ही आपली संस्कृती विसरत चाललो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. अनिल पिंपळापुरे यांनी माळढोक, ग्रे हॉन बील या पक्ष्यांवर केलेल्या अभ्यासाबाबत माहिती दिली.
२० वर्षांपूर्वी ११ राज्यांत अडीच हजाराच्यावर असलेल्या माळढोक पक्ष्यांची संख्या आज शंभर-सव्वाशेवर उरली आहे. वरोरा, उमरेड भागात १० वर्षांपूर्वी २० ते २५ पक्षी आम्ही शोधले होते. हवा तसा लोकसहभाग मिळत नसल्याने या पक्ष्यांची संख्या नाममात्र उरली आहे. येणाऱ्या काळात विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पूर्वी शहराबाहेर गावाच्या वाटेने गेले की हिरवेगार माळरान, तलाव आणि पक्ष्यांचे थवे दिसायचे. आज शहरीकरणाच्या झपाट्यात ते सर्व लुप्त होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. संचालन वनराईचे अजय पाटील यांनी केले तर नितीन जतकर यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)

Web Title: Environment is not just tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.