मणप्पुरम गोल्ड दरोड्यातील गुंडाचे बिहारमध्ये एन्काऊंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:07 PM2019-03-18T12:07:02+5:302019-03-18T12:08:59+5:30

जरीपटक्यातील मणप्पुरम गोल्ड बँकेत पिस्तुलाच्या धाकावर दरोडा घालून तेथील ३१ किलो सोने तसेच १० लाखांची रोकड लुटणाऱ्या सुबोधसिंग टोळीतील प्रमूख गुंड मनीषकुमार सिंग याला बिहार पोलिसांच्या विशेष पथकाने (एसटीएफ) एन्काऊंटरमध्ये ठार मारले.

An encounter in Bihar in Manappuram Gold robbery | मणप्पुरम गोल्ड दरोड्यातील गुंडाचे बिहारमध्ये एन्काऊंटर

मणप्पुरम गोल्ड दरोड्यातील गुंडाचे बिहारमध्ये एन्काऊंटर

Next
ठळक मुद्देएसटीएफसोबत झाली चकमक तिघांची शरणागती, मोठा शस्त्रसाठा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जरीपटक्यातील मणप्पुरम गोल्ड बँकेत पिस्तुलाच्या धाकावर दरोडा घालून तेथील ३१ किलो सोने तसेच १० लाखांची रोकड लुटणाऱ्या सुबोधसिंग टोळीतील प्रमूख गुंड मनीषकुमार सिंग याला बिहार पोलिसांच्या विशेष पथकाने (एसटीएफ) एन्काऊंटरमध्ये ठार मारले. यावेळी मनीषकुमारच्या तीन साथीदारांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यांच्याकडून एके-४७ सह पिस्तूल आणि मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
जरीपटक्यातील मणप्पुरम गोल्डच्या कार्यालयात शिरून बिहारचा मोस्ट वाँटेड गुंड सुबोध सिंग आणि त्याच्या साथीदारांनी २८ सप्टेंबर २०१६ ला ३१ किलो सोने तसेच १० लाख रुपये लुटून नेले होते. राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या या लुटमारीत कुख्यात सुबोध सिंगसोबत बिहारमधील कुख्यात दरोडेखोर मनीष सिंग सहभागी होता.
या टोळीने नंतर कोलकाता, मुझफ्फरपूर, कोटा, बालासोरसह अनेक ठिकाणच्या खासगी फायनान्स कंपनीत दरोडे घालून १७५ किलो सोने लुटून नेले होते. नागपूर पोलिसांनी सुबोध आणि मनीष सिंगला अटक करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र तो हाती लागला नाही. त्यामुळे पोलिसांनी सुबोधची पत्नी जान्हवी हिला अटकही केली होती.
तिकडे सुबोध-मनीष सिंगच्या टोळीने महाराष्ट्रासह कोलकाता, बिहार, चेन्नई, पंजाब या राज्यात सोने लुटण्याचा सपाटाच लावला होता. परिणामी देशभरातील ठिकठिकाणचे पोलीस या टोळीचा शोध घेत होते. बिहारमधील वैशाली जिल्ह्यात बहलोलपूर दियारा परिसरात स्पेशल टास्क फोर्स(एसटीएफ)ने मिळालेल्या माहितीच्या आधारे शनिवारी पहाटे मनीष सिंग साथीदारांसह लपून बसलेल्या ठिकाणी छापा घातला. पोलिसांची कुणकुण लागताच त्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात एसटीएफने केलेल्या गोळीबारात मनीष सिंग आणि त्याचे दोन साथीदार ठार झाले तर, तिघांनी नंतर एसटीएफसमोर शरणागती पत्करली.

महिनाभर शोधाशोध
रविवारी भल्या सकाळी ही बातमी व्हायरल झाली. नागपूर पोलिसांनाही त्याची माहिती कळाली. सुबोध आणि मनीष सिंगचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे एपीआय ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या नेतृत्वात एक पोलीस पथक तब्बल महिनाभर बिहारमध्ये छापेमारी करीत फिरले. मात्र, हे दरोडेखोर त्यांच्या हाती लागले नव्हते. अखेर आज मनीष सिंग एसटीएफकडून मारला गेल्याचेच वृत्त नागपूर पोलिसांना कळले.

टोळी संपली !
सोन्यावर कर्ज (गोल्ड लोन) देणाऱ्या मणप्पुरम, मुथ्थुट फायनान्ससारख्या देशातील विविध शहरात असलेल्या वित्तीय संस्थांमध्ये पिस्तुलाच्या धाकावर दरोडा घालून सोने लुटण्यासाठी कुख्यात सुबोध-मनीष सिंगची टोळी कुप्रसिद्ध आहे. टोळीचा म्होरक्या सुबोध सध्या बिहारमधील पटना कारागृहात बंदिस्त असून, चार ते पाच जण अन्य कारागृहात बंदिस्त आहेत. सुबोधला ताब्यात घेण्यासाठी नागपूर पोलिसांनी अनेकदा प्रयत्न केले मात्र, बिहार पोलिसांनी दाद दिली नाही. त्यामुळे त्याला नागपुरात आणता आले नाही. दुसरीकडे सुबोधसह अन्य साथीदार कारागृहात असूनही ही टोळी संचलित करणारा मनीष सिंग आणि अन्य दोघे एसटीएफकडून बिहारमध्ये मारले गेल्याने आणि तिघांनी शरणागती पत्करल्याने आता ही टोळी संपल्यात जमा झाली आहे.

Web Title: An encounter in Bihar in Manappuram Gold robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.