लोकमतच्या वृत्ताची दखल : तडीपार गुंडांच्या बंदोबस्तासाठी ‘हिट स्क्वॉड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:12 AM2018-09-17T10:12:19+5:302018-09-17T10:16:54+5:30

तडीपार गुंडांचा शहराबाहेर नव्हे तर उपराजधानीतच डेरा असून, ते गुन्हेगारीतही सक्रिय असल्याचे उघड झाल्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शनिवारी तडकाफडकी प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘हिट स्क्वॉड’ तयार करण्याचे आदेश दिले.

Effect of Lokmat: 'hit squad' for watch on criminals | लोकमतच्या वृत्ताची दखल : तडीपार गुंडांच्या बंदोबस्तासाठी ‘हिट स्क्वॉड’

लोकमतच्या वृत्ताची दखल : तडीपार गुंडांच्या बंदोबस्तासाठी ‘हिट स्क्वॉड’

Next
ठळक मुद्देपोलीस आयुक्तांचे आदेश२४ तास घेणार तडीपारांचा शोध

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तडीपार गुंडांचा शहराबाहेर नव्हे तर उपराजधानीतच डेरा असून, ते गुन्हेगारीतही सक्रिय असल्याचे उघड झाल्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. या गुंडांना त्यांच्या मूळ जागी पाठविण्यासाठी त्यांनी शनिवारी तडकाफडकी प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘हिट स्क्वॉड’ तयार करण्याचे आदेश दिले.
एक अधिकारी आणि तीन कर्मचारी असे चौघे जण या ‘हिट स्क्वॉड’मध्ये राहणार असून, तडीपार गुंड आणि सशस्त्र हाणामारी करणाऱ्या गुंडांना जेरबंद करण्याची एकमात्र जबाबदारी या चौघांवर देण्यात आली आहे. कर्तव्यात हयगय केल्यास ‘हिट स्क्वॉड’मधील अधिकारी-कर्मचाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
वारंवार गंभीर गुन्हे करून सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आणि नागरिकांच्या जानमालासाठी धोका निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलीस उपायुक्त तडीपार करतात. त्याचा गुन्हेगारी अहवाल बघून त्याला सहा महिन्यासाठी, एक वर्षासाठी किंवा दोन वर्षांसाठी तडीपार केले जाते. एखाद्या गुन्हेगाराला तो राहत असलेल्या शहरातून तर त्याच्यापेक्षा खतरनाक असलेल्या गुन्हेगाराला जिल्ह्यातून तडीपार केले जाते. त्यानुसार, संबंधित पोलीस ठाण्यातील कर्मचारी त्या गुन्हेगाराला त्याच्या बाहेरगावी राहणाऱ्या नातेवाईकांकडे नेऊन सोडतात. संबंधित पोलीस ठाण्यात तशी नोंद केली जाते आणि तडीपारीच्या कालावधीत न्यायालयीन कामकाजाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही निमित्ताने शहरात फिरकणार नाही, अशी लेखी हमी त्याच्याकडून घेतली जाते. त्या गुन्हेगाराला ज्या ठिकाणी सोडले त्या ठिकाणच्या पोलिसांकडे त्याने नियमित हजेरी लावून तो तेथेच आहे, हे पटवून द्यावे, अशी पूर्वीचे पोलीस व्यवस्था करीत होते.
आता मात्र त्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याने खतरनाक गुन्हेगार त्याचा पुरेपूर गैरफायदा घेतात. दुसऱ्या गावात सोडून निघालेल्या पोलिसांच्या मागेच हे गुन्हेगार नागपुरात परततात आणि नंतर येथे पूर्वीसारखीच गुन्हेगारीही करतात. शहरात तडीपार गुंडांचे वास्तव्य आणि गुन्हेगारीतील त्यांची सक्रियता लोकमतने वेळोवेळी प्रकाशित केली आहे. दोन दिवसांपूर्वी पाचपवलीत सुमित ढेरिया नामक युवकाची तडीपार कुख्यात गुन्हेगार विशाल मेश्राम आणि त्याच्या साथीदारांनी निर्घृण हत्या केली.
या हत्याकांडाच्या वेळी दुसरा कुख्यात गुंड शुभम खापेकर तेथेच असल्याची माहिती चर्चेला आली. ऐन वाढदिवसाच्या दिवशी सुमितची क्षुल्लक कारणावरून हत्या होणे आणि एकाच वेळी दोन दोन तडीपार गुंडांचे नागपुरात वास्तव्य ही बाब लोकमतने शनिवारी ठळकपणे प्रकाशित केली. (यापूर्वीही तडीपार गुंडांचा उपराजधानीत वावर म्हणून लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते.) त्याची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी तडकाफडकी एक आदेश काढून प्रत्येक पोलीस ठाण्यात हिटस् स्क्वॉड निर्माण करण्याचे आदेश जारी केले. एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचारी या स्क्वॉडमध्ये असतील.
प्राणघातक हल्ले करण्यात आरोपी असलेल्या आणि तडीपार करण्यात आलेल्या गुंडांवर २४ तास नजर ठेवण्याची एकमात्र जबाबदारी या पथकावर राहणार आहे. त्यांना दुसरे कोणतेच काम राहणार नाही. कोणत्या तडीपार गुंडाला कुठे नेऊन सोडण्यात आले, त्याचा तडीपारीचा कालावधी किती आणि तो तडीपारीच्याच ठिकाणी आहे की नागपुरात येऊन गुन्हेगारी करतो, याची सूक्ष्म माहिती हिटस् स्क्वॉडवर राहणार आहे.
बरेचदा तडीपार गुंड आपले राहते ठिकाण आणि पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र सोडून दुसऱ्या ठिकाणी राहतात. पोलिसांशी मधूर संबंध असल्यामुळे अशा गुन्हेगारांना पोलिसांचा फारसा त्रास होत नाही. त्यामुळे त्यांची गुन्हेगारी सुरू राहते आणि सुमितसारख्या तरुणाचा नाहक जीव जातो. असे प्रकार पुन्हा घडू नये म्हणून पोलीस आयुक्तांनी या स्क्वॉडची निर्मिती केली. त्यांना दुसरे कोणतेही काम देण्यात येणार नाही. त्यामुळे तडीपार गुंड त्यांच्या हद्दीत आढळल्यास हिटस् स्क्वॉडमधील अधिकारी कर्मचाऱ्यांना गरम कारवाईचा सामना करावा लागू शकतो.

सराईत गुन्हेगार वारंवार गुन्हे करतात. त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होतो. कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीती असते. ते होऊ नये म्हणून सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करून त्यांना हाकलून लावले जाते. मात्र, ते लगेच परत येतात अन् गुन्हेही करतात. त्यामुळे पोलिसांच्या मुळ उद्देशालाच फाटा मिळतो. एक तडीपार गुंड शहरात आहे असे कळल्यास दुसरा तडीपारही नागपुरात येतो. तसे होऊ नये म्हणून हिटस् स्क्वॉड निर्माण करण्यात आले आहे. हे स्क्वॉड तडीपारांना वठणीवर आणण्याचे काम करणार आहेत.
- डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त

Web Title: Effect of Lokmat: 'hit squad' for watch on criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.