उपराजधानीसाठी प्रदूषणाबाबत धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:49 AM2019-03-23T11:49:28+5:302019-03-23T11:51:36+5:30

उपराजधानीची गणना देशातील ‘ग्रीन’ शहरांत होत असली तरी विविध जागतिक संघटना व संस्थांनी जारी केलेली आकडेवारी भविष्यातील धोक्यांचे संकेत देणारी आहे.

Dangers about pollution for Nagpur | उपराजधानीसाठी प्रदूषणाबाबत धोक्याची घंटा

उपराजधानीसाठी प्रदूषणाबाबत धोक्याची घंटा

Next
ठळक मुद्दे‘पीएम २.५’च्या प्रमाणात नागपूर राज्यात तिसऱ्या स्थानीनियंत्रणाचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीची गणना देशातील ‘ग्रीन’ शहरांत होत असली तरी विविध जागतिक संघटना व संस्थांनी जारी केलेली आकडेवारी भविष्यातील धोक्यांचे संकेत देणारी आहे. मागील वर्षी ‘वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन’च्या अहवालातून ‘पीएम २.५’चे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले होते. ‘एअर व्हिज्युअल’-‘ग्रीनपीस’ने जारी केलेल्या २०१८ च्या अहवालानुसार निर्धारित पातळीहून नागपुरात ‘पीएम २.५’चे (पर्टिक्युलेट मॅटर)प्रमाण फार जास्त आहे. विशेष म्हणजे ‘पीएम २.५’च्या प्रमाणात नागपूरचा राज्यात तिसरा क्रमांक आहे.
‘एअर व्हिज्युअल’-‘ग्रीनपीस’ने २०१८ सालातील सर्वात प्रदूषित शहरांची आकडेवारी जारी केली. यानुसार २०१८ साली नागपुरातील वातावरणातील ‘पीएम २.५’चे सरासरी वार्षिक प्रमाण ४६.६ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतके होते. राज्यात मुंबई व औरंगाबादनंतर नागपूरचा तिसरा क्रमांक होता. तर देशात नागपूर ४१ व्या स्थानी होते. २०१७ मध्ये ‘पीएम २.५’चे सरासरी प्रमाण ५६.२ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतके होते. २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये ‘पीएम २.५’चे प्रमाण घटले असले तरी निर्धारित पातळीहून हा आकडा अधिकच आहे.

काय म्हणतात ‘डब्लूएचओ’चे आकडे
वायुप्रदूषणासंदर्भात ‘पीएम २.५’ हे ‘पीएम १०’पेक्षा जास्त घातक मानण्यात येते. नागपुरातील ‘पीएम २.५’चे प्रमाण २०१३ साली ३३ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतके होते. २०१४ मध्ये हेच प्रमाण ३४ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटरवर गेले. तर २०१६ हाच आकडा चक्क ८४ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटरवर पोहोचला होता. ‘वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन’ची निर्धारित पातळी १० मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतकी आहे. तर भारतात ही पातळी ४० मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतकी आहे. या पातळीहून नागपुरात हे प्रमाण फार जास्त असून संवेदनशील समूहांसाठी हे धोकादायक मानण्यात येते.

काय आहेत ‘पीएम’
हवेत असलेले अतिसूक्ष्म कण, धूळ, मातीचे कण, वायू इत्यादींचे मिश्रण होऊन ‘पीएम’ (पर्टिक्युलेट मॅटर) तयार होतात. ‘पीएम २.५’ (पर्टिक्युलेट मॅटर २.५ मायक्रॉन), ‘पीएम १०’ (पर्टिक्युलेट मॅटर १० मायक्रॉन) तसेच ‘एमएसपीएम’ (सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर) अशा ३ श्रेणींमध्ये विभाजित करण्यात येते. ‘पीएम २.५’ ला जास्त धोकादायक मानण्यात येते. याचा आकार २.५ मायक्रोमीटरहूनदेखील लहान असतो. हे सूक्ष्मकण श्वासनलिकेवाटे थेट शरीरात शिरण्याचा धोका असतो.

वातावरणासाठी धोकादायक
‘पीएम २.५’च्या वाढलेल्या प्रमाणामुळे ‘व्हिजिबिलिटी’वर परिणाम होण्याची शक्यता असते. शिवाय हे कण दूरवर वाहून जाऊ शकतात. या कणांमधील रासायनिक घटकांनुसार तलावांतील आम्लपणा वाढू शकतो. तसेच जमिनीची सुपिकतादेखील धोक्यात येऊ शकते. त्याचप्रमाणे ‘अ‍ॅसिड रेन’चे प्रमाणदेखील वाढण्याचा धोका असतो.

राज्यातील शहरांतील पीएम २.५ चे प्रमाण
शहर                       पीएम २.५ (मायक्रोग्रॅम प्रति
                               क्युबिक मीटर)
मुंबई                        ५८.६
औरंगाबाद                ४७.४
नागपूर                      ४६.६
पुणे                          ४६.३
चंद्रपूर                       ४१.४

Web Title: Dangers about pollution for Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.