स्क्रब टायफसवर हायकोर्टाने व्यक्त केली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 10:54 PM2018-09-05T22:54:26+5:302018-09-05T22:55:25+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी शहरातील अस्वच्छतेसंदर्भातील प्रकरणावर सुनावणी करताना सध्या सर्वांना घाबरवून सोडलेल्या स्क्रब टायफस आजारावर चिंता व्यक्त केली. तसेच, असे जीवघेणे आजार पसरू नये यासाठी शहरामध्ये सर्वत्र स्वच्छता ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले.

Concerned by the High Court on the scrub typhus | स्क्रब टायफसवर हायकोर्टाने व्यक्त केली चिंता

स्क्रब टायफसवर हायकोर्टाने व्यक्त केली चिंता

Next
ठळक मुद्देअस्वच्छतेत वाढ : नगरसेवकांना विचारले तुम्ही काय करताय?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी शहरातील अस्वच्छतेसंदर्भातील प्रकरणावर सुनावणी करताना सध्या सर्वांना घाबरवून सोडलेल्या स्क्रब टायफस आजारावर चिंता व्यक्त केली. तसेच, असे जीवघेणे आजार पसरू नये यासाठी शहरामध्ये सर्वत्र स्वच्छता ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले.
शहरातील अस्वच्छतेसंदर्भात पूनम प्राईड कन्डोमिनिअमचे अध्यक्ष एस. सी. बेरा व व्यावसायिक अनिल आग्रे यांनी वेगवेगळ्या जनहित याचिका दाखल केल्या आहेत. त्या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, आग्रे यांच्या वकील अ‍ॅड. सेजल लाखाणी यांनी कचरा नियमित उचलला जात नसल्यामुळे शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता पसरली असल्याचे सांगितले तसेच अस्वच्छतेमुळे डासांची संख्या व विविध आजार वाढल्याचा दावा केला. त्यानंतर न्यायालयाने गेल्या काही महिन्यांत अनेकांचे प्राण घेणाऱ्या स्क्रब टायफस आजाराचा उल्लेख केला. अस्वच्छता अशा अनेक आजारांचे मूळ कारण आहे. स्थानिक प्रशासनासह नगरसेवकांनीही याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. नागरिकांच्या समस्या सोडवणे हे नगरसेवकांचे कर्तव्य आहे. शहरातील नगरसेवक याकरिता काय करीत आहेत, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला व नगरसेवकांना यावर चार आठवड्यात उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.
स्वच्छ व आरोग्यवर्धक वातावरण हा नागरिकांचा घटनादत्त अधिकार आहे. परंतु, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. जैविक व अजैविक कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्या जात नाही. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Concerned by the High Court on the scrub typhus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.