नागपुरातील विकास कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करा ; नितीन गडकरी यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:45 PM2018-12-24T23:45:51+5:302018-12-24T23:53:32+5:30

शहरातील रस्ते, पाणी, वीज यासारख्या मूलभूत गरजांची पूर्तता करा, शहरातील विविध भागातील सिमेंटचे रस्ते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे बांधण्यात येत असलेले उड्डाण पूल, नागपूर मेट्रो अंतर्गत सुरू असलेली विकास कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी दिले.

Complete the development works of Nagpur in the prescribed period; Nitin Gadkari directives | नागपुरातील विकास कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करा ; नितीन गडकरी यांचे निर्देश

नागपुरातील विकास कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करा ; नितीन गडकरी यांचे निर्देश

Next
ठळक मुद्दे१९ जानेवारीला ऑरेंज सिटी स्ट्रीटचे भूमिपूजन व रामझुल्याचे लोकार्पणमेट्रो, केंद्रीय महामार्ग, उड्डाण पूल, मैदानांचा विकास कामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील रस्ते, पाणी, वीज यासारख्या मूलभूत गरजांची पूर्तता करा, शहरातील विविध भागातील सिमेंटचे रस्ते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे बांधण्यात येत असलेले उड्डाण पूल, नागपूर मेट्रो अंतर्गत सुरू असलेली विकास कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी दिले.
वनामती येथील सभागृहात शहरातील विविध विकास कामांचा आढावा नितीन गडकरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदाताई जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, उपमहापौर दीपराज पार्डीकर, नागपूर मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशनचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, मध्य रेल्वेचे डीआरएम एस.एस. उप्पल, केंद्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, स्मार्ट सिटीचे प्रकल्प संचालक रामनाथ सोनवणे आदी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ऑरेंजसिटी स्ट्रीटच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम मेट्रोतर्फे करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच रामझुला टप्पा दोनचे उद्घाटन येत्या १९ जानेवारीला करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने विकास कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिलेत.
रेल्वे स्टेशन रस्त्याच्या विकासाठी २३४.२१ कोटी
रेल्वे स्टेशन रस्त्याच्या विकासाठी २३४.२१ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. नागपूर महामेट्रोमार्फत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये जुना भंडारा रोड ते सुनील हॉटेल रस्त्याचे व केळीबाग रोडचे रुंदीकरण तसेच नागपूर रेल्वेस्टेशन ते जयस्तंभ चौक व मानस चौक या रस्त्यांचा विकास करण्यासंदर्भात आढावा गडकरी यांनी घेतला.
ऑरेंजसिटी स्ट्रीटच्या कामाला सुरुवात करा
ऑरेंजसिटी स्ट्रीट मेट्रोमॉल पहिल्या टप्प्यातील ३ हजार ३०८चौरस मीटर क्षेत्रफळावर विकास कामासंदर्भात तातडीने सुरुवात करावी. सिमेंट रस्त्यासंदर्भात रिंगरोडवरील कामे १ मार्चपूर्वी पूर्ण करावीत. यासंदर्भात महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन निर्णय घ्यावा, असेही गडकरी यांनी सांगितले.
तातडीने पट्टे वाटप करा
रेल्वेच्या जागेवर वसलेल्या झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देताना मध्य रेल्वेला तिसरी व चौथी रेल्वे लाईन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून दिल्यानंतर इतर जागेवरील झोपडपट्टीधारकांना पट्टे देताना महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी एकत्र बसून यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, अशी सूचना यावेळी करण्यात आली.
अनधिकृत अभिन्यासाचा विकास करा
शहरातील अनधिकृत अभिन्यासासंदर्भात नागपूर सुधार प्रन्यासकडे असलेले अभिन्यास नागपूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावे. तसेच या संपूर्ण अभिन्यासात पिण्याचे पाणी, रस्ते आदी सुविधा महापालिकेने उपलब्ध कराव्यात. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सुरू असलेल्या शासन पोर्टलवर प्रमाणीकरण करून पात्र लाभार्थ्यांची यादी नासुप्रला सादर करण्यात आली आहे.
बाजारांचा विकास
बुधवार बाजार, महाल, सोमवारी पेठ (सक्करदरा), नेताजी मार्केट, कमाल चौक मार्केट आणि मटन मार्केट, मच्छी मार्केट यासाठी जागा निश्चित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. शहरातील विविध खेळांच्या मैदानाबाबत सात कोटींचे विनियोजन करण्यात आले आहे. शहरातील खेळांची मैदाने सुसज्ज असावीत, यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भर दिला.
शहरालगतच्या भागात अमृत योजना
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर शहराच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अमृत योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना दिली. याअंतर्गत अनधिकृत, अधिकृत अभिन्यासामध्ये पाणीपुरवठा प्रणालीचे विस्तारीकरण, उन्नतीकरण व बळकटीकरण यासाठी २७३ कोटी ७८ लक्ष रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

Web Title: Complete the development works of Nagpur in the prescribed period; Nitin Gadkari directives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.