माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 08:33 AM2019-01-03T08:33:58+5:302019-01-03T10:22:37+5:30

ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, व्यासंगी लेख, प्रभावी वक्ते आणि मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती पद्मभूषण चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे बुधवारी रात्री १ वाजता निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.

chief justice chandrashekhar dharmadhikari passed away | माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे निधन

माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे निधन

Next
ठळक मुद्देज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, व्यासंगी लेख, प्रभावी वक्ते आणि मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती पद्मभूषण चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे बुधवारी निधन झाले.मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला सामाजिक सेवेत वाहून घेतले होते.२०१४ मध्ये धर्माधिकारी यांच्या समितीने बारबालांवर पूर्णपणे बंदी आणण्याची शिफारस राज्य सरकारला केली होती.

नागपूर : ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, व्यासंगी लेख, प्रभावी वक्ते आणि मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती पद्मभूषण चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे बुधवारी रात्री १ वाजता निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. हृदयविकाराचा धक्का आल्यामुळे त्यांच्यावर एका स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यापश्चात दोन मुले सत्यरंजन (न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय) व आशुतोष (ज्येष्ठ वकील), एक मुलगी अरुणा पाटील आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचे पार्थिव आज सकाळी १० वाजता भोले पेट्रोल पंपाजवळील विनोबा विचार केंद्रात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल, त्यानंतर ४ च्या सुमारास अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

न्यायदानाच्या क्षेत्रात असतानाही विधायक राजकारणाविषयी वाटणारी कळकळ, सुधारणावादी असूनही संस्कृती व मूल्ये यांच्याविषयीचा अभिमान, काळाबरोबर बदलण्याची क्षमता असूनही गांधी विचारांवर श्रद्धा, ज्ञानवंतअसूनही सर्वज्ञतेच्या ऐटीपासून दुरावा, कायद्याच्या क्लिष्ट विषयात गढून गेले असतानाही सभा - संमेलने, व्याख्याने, परिचर्चा यासारख्या कार्यक्रमात भाग घेण्याची वृत्ती आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबत सामाजिक बांधिलकीचे भान यासारख्या विविध पैलूंनी न्या. धर्माधिकारी यांचे आयुष्य समृद्ध आणि संपन्न होते.

न्या. धर्माधिकारी सर्वोदयी कार्यकर्ते होते. लहाणपणीच मनावर झालेले गांधीवादी विचारांचे संस्कार त्यांनी अंतिम श्वासापर्यंत जपले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला सामाजिक सेवेत वाहून घेतले होते. वर्धा येथील नवभारत विद्यालयात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले तर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजनागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून त्यांनी एलएलबी पदवी प्राप्त केली. २५ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांना सनद मिळाली. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय केला. 

न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सेवानिवृत्तीपर्यंत म्हणून २० नोव्हेंबर १९८९ पर्यंत तब्बल १७ वर्षे न्यायदानाचे कार्य केले. दरम्यान, ते काही दिवस प्रभारी मुख्य न्यायमूर्ती होते. त्यांनी महिला, आदिवासी, लहान मुले, मनोरुग्ण, बंदिवान आदींच्या मूलभूत अधिकारांवर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय दिले.

आणीबाणीच्या काळात नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर दिलेला त्यांचा निर्णय फार गाजला. त्या निर्णयामुळे ठोस पुरावे नसलेल्या स्थानबद्ध आंदोलकांना सरकारला सोडावे लागले होते. २०१४ मध्ये धर्माधिकारी यांच्या समितीने बारबालांवर पूर्णपणे बंदी आणण्याची शिफारस राज्य सरकारला केली होती.

धर्माधिकारी यांचा जन्म मध्य प्रदेशातील रायपूर (सध्या छत्तीसगड) येथे २० नोव्हेंबर १९२७ रोजी झाला होता. त्यांचे बालपण स्वातंत्र्यलढ्याने भारावलेल्या वातावरणात गेले. त्यांचे वडील आचार्य दादा धर्माधिकारी हे स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होते. आई दमयंती यांचादेखील गांधीवादावर विश्वास होता. त्यामुळे त्यांच्यावर लहाणपणीच गांधीवादी विचार व समाजसेवेचे संस्कार झाले होते.

Web Title: chief justice chandrashekhar dharmadhikari passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर