सीबीएसई बारावी निकाल जाहीर : यंदाही मुलींचाच टक्का भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 08:52 PM2019-05-02T20:52:41+5:302019-05-02T22:03:16+5:30

‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा अनपेक्षितपणे गुरुवारी दुपारी निकाल जाहीर झाला. यंदादेखील उत्तीर्णांमध्ये विद्यार्थिनींचे प्रमाण जास्त असून विज्ञान, मानव्यशास्त्र व वाणिज्य शाखेतील अव्वल क्रमांक पटकाविणाऱ्यांमध्ये मुलीच आघाडीवर राहिली आहेत. शहरातून प्रथम येण्याचा मान हा विज्ञान शाखेतील श्रेयशी साहा या विद्यार्थिनीने पटकाविला. जैन इंटरनॅशनल स्कूल येथील श्रेयशी हिला ९८.६० टक्के गुण प्राप्त झाले.

CBSE 12th results declared:This year also girls top | सीबीएसई बारावी निकाल जाहीर : यंदाही मुलींचाच टक्का भारी

सीबीएसई बारावी निकाल जाहीर : यंदाही मुलींचाच टक्का भारी

googlenewsNext
ठळक मुद्देश्रेयशी साहा ‘टॉप’

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा अनपेक्षितपणे गुरुवारी दुपारी निकाल जाहीर झाला. यंदादेखील उत्तीर्णांमध्ये विद्यार्थिनींचे प्रमाण जास्त असून विज्ञान, मानव्यशास्त्र व वाणिज्य शाखेतील अव्वल क्रमांक पटकाविणाऱ्यांमध्ये मुलीच आघाडीवर राहिली आहेत. शहरातून प्रथम येण्याचा मान हा विज्ञान शाखेतील श्रेयशी साहा या विद्यार्थिनीने पटकाविला. जैन इंटरनॅशनल स्कूल येथील श्रेयशी हिला ९८.६० टक्के गुण प्राप्त झाले.  


बारावीच्या निकालात यंदाही विद्यार्थिनींनीच आपली जादू कायम ठेवली. सीबीएसईने कुठलीही गुणवत्ता यादी जाहीर केली नाही. मात्र शाळांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तीर्ण झालेल्यांमध्ये सर्वात जास्त संख्या ही विद्यार्थिनींचीच आहे. विज्ञान, वाणिज्य शाखेत मुलींचाच वरचष्मा दिसून आला. वाणिज्य शाखेत बी.पी.भवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स येथील तन्मय चिंडालिया व निधी पुनिया यांनी ९७.४० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. तर मानव्यशास्त्र शाखेत बी.पी.भवन्स विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर येथील ईशा रेड्डी या विद्यार्थिनीने ९७.२० टक्के गुणांसह अव्वल क्रमांक मिळविला.
नागपूर विभागातून दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या परीक्षेत बहुतांश शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. दुपारच्या सुमारास सीबीएसईच्या संकेतस्थळावर निकाल घोषित करण्यात आला. परीक्षेला शहरातील २० शाळांमधून सुमारे १७५० विद्यार्थी बसले होते. जवळपास २०० विद्यार्थ्यांना ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण आहेत. यात विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त असल्याची माहिती शाळांतर्फे देण्यात आली आहे.
हा तर निकालाचा ‘स्ट्राईक’च
साधारणत: मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यानंतर ‘सीबीएसई’तर्फे बारावीचे निकाल जाहीर करण्यात येतात. मात्र यंदा कुणाच्याही ध्यानीमनी नसताना मे महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर झाले. अनेक विद्यार्थी व पालक सुट्यांसाठी बाहेरगावी गेले आहेत. अशास्थितीत सर्वांसाठीच हा मोठा धक्का ठरला. शाळांमध्येदेखील यासंदर्भात फारशी तयारी नव्हती. ‘सीबीएसई’ने निकालाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’च केला आहे, अशी भावना एका मुख्याध्यापिकेने बोलून दाखविली. निकाल लागल्यानंतर शाळांमध्ये आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये उत्साह होता व नेमके किती गुण मिळाले, हे कळल्यानंतर तर त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. एकीकडे निकाल पाहत असतानाच ‘व्हॉटस्अ‍ॅप अन् फेसबुक’च्या माध्यमातून मित्र-मैत्रिणींना नेमके किती मार्क्स मिळाले, याची माहिती घेणेदेखील सुरूच होते.

विज्ञान शाखा
१    श्रेयसी साहा                जैन इंटरनॅशनल स्कूल                        ९८.६० %
२    सार्थक आडे                जैन इंटरनॅशनल स्कूल                        ९७.४० %
३    सत्यप्रकाश करशर्मा        केंद्रीय विद्यालय, वायुसेनानगर,                ९७.०० %
३    कशा सिंह                बी.पी.भवन्स विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर            ९७.०० %
४    मयंक चांडक                सेंट झेव्हियर्स हायस्कूल, हिंगणा मार्ग            ९६.८० %
५    अंकुशा झंवर                बी.पी.भवन्स विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर            ९६.६० %
५    प्रबल गुप्ता                केंद्रीय विद्यालय, वायुसेना नगर                ९६.६० %
६    अद्वैत देशपांडे                जैन इंटरनॅशनल स्कूल                        ९६.४० %

वाणिज्य शाखा
१    तन्मय चिंडालिया            बी.पी.भवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स            ९७.४० %
१    निधी पुनिया                बी.पी.भवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स            ९७.४० %
२    रजत वर्मा                बी.पी.भवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स            ९७.२० %
३    ईशिता वर्मा                बी.पी.भवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स            ९७.०० %
२    साक्षी नांदूरकर                बी.पी.भवन्स विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर                ९६.४० %
३    पार्थ देसाई                सेंटर पॉईंट, काटोल रोड                                 ९६.२० %
४    अर्चित दालमिया            सेंटर पॉईंट, काटोल रोड                        ९६.०० %
५    मोहन वेन्सियानी            बी.पी.भवन्स विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर                ९५.८० %
६    श्रुती श्रीवास्तव            सेंटर पॉईंट, काटोल रोड                        ९५.६० %

मानव्यशास्त्र शाखा    
१    ईशा रेड्डी                    बी.पी.भवन्स विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर                ९७.२० %
२    लुबना डोंगरे                सेंटर पॉईंट स्कूल, काटोल रोड                           ९७.०० %
३    सचिन पटेल                केंद्रीय विद्यालय, वायुसेनानगर                    ९७.०० %
४    अल्हाद राऊत                  सेंटर पॉईंट स्कूल, काटोल रोड                       ९६.६० %
५    आकांक्षा मिश्रा            सेंटर पॉईंट स्कूल, काटोल रोड                           ९६.०० %
६    मयूर दुर्गे                    बी.पी.भवन्स विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर                ९५.६० %

यंदा विज्ञानची बाजी
मागील काही वर्षांपासून वाणिज्य शाखेतील विद्यार्थी अव्वल येत असल्याचे दिसून आले. मात्र यंदा विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी अव्वल स्थान पटकाविले. वाणिज्यमध्येदेखील विद्यार्थ्यांना मिळालेली गुणांची टक्केवारी चांगली आहे.‘मेट्रो’ शहरांप्रमाणे नागपुरात देखील वाणिज्य शाखेला मागणी वाढत असून, अनेक गुणवंत विद्यार्थी इकडे वळत आहेत. येणाऱ्या काळात वाणिज्य शाखेवर विद्यार्थ्यांचा जास्त भर नक्कीच दिसून येईल, असा विश्वास अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी बोलून दाखविला. 

बहुतांश शाळांचे निकाल १०० टक्के
शहरातील बहुतांश शाळांचे निकाल १०० टक्के लागले. काही शाळांमध्ये ‘टॉपर्स’चा टक्का मात्र खालावला व ९० टक्के गुण मिळविणारे कमी विद्यार्थी दिसून आले. शाळांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बी.पी.भवन्स विद्यामंदिर (सिव्हिल लाईन्स), बी.पी.भवन्स विद्यामंदिर (श्रीकृष्णनगर),सेंटर पॉईंट (काटोल रोड), जैन इंटरनॅशनल स्कूल, केंद्रीय विद्यालय (वायुसेनानगर) या शाळांमध्ये सर्वात जास्त ‘टॉपर्स’ आहेत.

Web Title: CBSE 12th results declared:This year also girls top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.