आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 01:26 AM2017-09-06T01:26:48+5:302017-09-06T01:27:05+5:30

प्रतिकूल परिस्थितीतही आश्रमशाळेत शिक्षण घेणाºया आदिवासी विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे.

 Bring the students of the ashram school to the mainstream | आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणा

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणा

Next
ठळक मुद्देमायाताई इवनाते : शिक्षकदिनी ३१ मुख्याध्यापक, ४२ शिक्षकांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रतिकूल परिस्थितीतही आश्रमशाळेत शिक्षण घेणाºया आदिवासी विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील प्रकट अवगुण आणि सुप्त गुण ओळखून त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार द्यायला पाहिजे. आजची आव्हाने आणि भविष्यातील समस्या यांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याचे ध्येय शिक्षकांचे असावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या सदस्य मायाताई इवनाते यांनी केले.
आदिवासी विकास विभागातर्फे मंगळवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे शिक्षक दिन व बालकांचे हक्क या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या वेळी आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे, प्रमुख मार्गदर्शक बालरोगतज्ज्ञ डॉ. रवी भोन्सुले, उपायुक्त सुरेंद्र सावरकर, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी दिगंबर चव्हाण, सहायक आयुक्त दीपक हेडावू, सहायक प्रकल्प अधिकारी नयन कांबळे उपस्थित होते.
याप्रसंगी आदिवासी विकास विभागांतर्गत येणाºया शासकीय व अनुदानित आश्रम शाळेकरिता उल्लेखनीय काम करणारे ३१ मुख्याध्यापक व ४२ शिक्षकांचा ग्रामगीता देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी ‘बालकांचे हक्क’पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे म्हणाल्या, दुर्गम भागातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना घडविण्याचे अत्यंत कठीण काम शिक्षक करत आहे. शिक्षकांचे व्यक्तिमत्त्व जेवढे प्रभावी, परिणामकारक, ज्ञान समृद्ध असेल तेवढे ते विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असते. कारण पालक आणि शिक्षक यांच्या समन्वयातून उद्याची पिढी घडणार आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, सावित्रीबाई फुले यांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवल्यास दुर्गम आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थीही स्पर्धेत मागे पडणार नाहीत. संचालन रेणुका देशकर यांनी केले. आभार प्रकल्प अधिकारी दिगंबर चव्हाण यांनी मानले.

Web Title:  Bring the students of the ashram school to the mainstream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.